कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमागे भारत सरकारचा हात असल्याचा आरोप केला आहे. जस्टिन यांच्या या आरोपाला भारतानेही जशास तसे उत्तर दिले आहे. भारताने त्यांचे सर्व आरोप फेटाळले आहेत. जस्टिन यांच्या आरोपानंतर भारत आणि कॅनडा या दोन्ही देशांच्या परस्पर संबंधांत तणाव निर्माण झाला आहे. कॅनडाने भारताच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्याला त्यांचा देश सोडण्यास सांगितले. तर भारतानेदेखील कॅनडाच्या भारतातील सहायक उच्चायुक्तांना भारत देश सोडण्यास सांगितले. दरम्यान, जस्टिन यांच्या या आरोपांनंतर पंजाबमधील राजकारण तापले आहे. पंजाबमधील प्रदेश भाजपा आणि काँग्रेसे जस्टिन यांच्या विधानाचा निषेध केला आहे. तर अकली दलाने मोदी यांनी या प्रकरणाशी संबंधित तथ्य देशासमोर ठेवावेत, अशी मागणी केली. मोदींच्या भूमिकेनंतरच आम्ही भूमिका स्पष्ट करणार- आप काँग्रेस आणि भाजपाने कॅनडाच्या पंतप्रधानांचा निषेध केला आहे. तर शिरोमणी अकाली दल (एसएडी) पक्षाने जस्टिन यांनी केलेले आरोप हे गंभीर आहेत. भारताने हे आरोप गांभीर्याने घेतले पाहजेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या प्रकरणाशी संबंधित सर्व माहिती देशासमोर ठेवली पाहिजे, अशी भूमिका घेतली. तर पंजाबमध्ये सत्तेत असल्या आम आदमी पार्टीने या प्रकरणावर मोदींनी स्पष्टीकरण दिल्यावर आम्ही याबाबत आमची भूमिका स्पष्ट करू अशी भूमिका घेतली. कॅनडाचे पंतप्रधान भारताला थेट दोष देत आहेत- अमरिंदरसिंग राजा पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमरिंदरसिंग राजा यांनी 'इंडियन एक्स्प्रेस'शी बोलताना या प्रकरणावर सविस्तर भाष्य केले. "जस्टिन ट्रुडो यांनी फारच हास्यास्पद विधान केले आहे. कॅनडाचे पंतप्रधान भारताला थेट दोष देत आहेत. कोणताही पुरावा नसताना कोणताही देश असे आरोप कसे करू शकतो. त्यांनी केलेले विधान पंजाबसाठी धोकादायक ठरू शकते. त्यांनी केलेले विधान प्रक्षोभक आहे. पंजबामध्ये हजारो लोक खलिस्तानबद्दल बोलतात. कोणाचातरी खून झाला हे दुर्दैवी आहे. मात्र त्यासाठी भारताला कसे जबाबदार ठरवले जाऊ शकते. हे हास्यास्पद आहे," असे अमरिंदसिंग म्हणाले. भारतविरोधी शक्तींना कॅनडात पूर्ण स्वांतत्र्य- अमरिंदर सिंग भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य तथा पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनीदेखील जस्टिन ट्रुडो यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली. "व्होट बँकेच्या राजकारणात जस्टिन ट्रुडो दुर्दैवाने ट्रॅप झाले आहेत. असे विधान करून त्यांनी भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध धोक्यात आणले आहेत. जस्टिन ट्रुडो यांच्या प्रशासनाने कॅनडामध्ये भारतविरोधी शक्तींना पूर्ण स्वातंत्र्य दिलेले आहे," असे अमरिंदर सिंग म्हणाले. मी ९ दहशतवाद्यांची यादी दिली होती- अमरिंदर सिंग "भारतीय दूतावासावर हल्ला करणाऱ्यांविरोधात जस्टिन यांनी कारवाई केली आहे का? स्वत:च्या अपयशावरून लोकांचे लक्ष विचलित व्हावे म्हणून जस्टिन यांनी अशा प्रकारचे विधान केले आहे. जस्टिन २०१८ साली अमृतसर येथे आले होते. त्यावेळी मी तेव्हा पंजाबचा मुख्यमंत्री होतो. आमच्यात तेव्हा भेट झाली होती. या भेटीत मी त्यांना कॅनडाचा भारतविरोधी कारवायांसाठी कसा उपयोग होत आहे, हे सांगितले होते. तसेच त्यांना नऊ संशयित दहशतवाद्यांची एक यादी दिली होती. या यादीत खून झालेल्या निज्जर याचादेखील समावेश होता. मात्र कॅनडा सरकारने कोणत्याही उपायोजना केल्या नाहीत. कॅनडात भारतविरोधी कारवाया वाढल्या आहेत," असे अमरिंदर सिंग म्हणाले. अकाली दलची काय भूमिका? अकाली दल या पक्षाने एक्सच्या (पूर्वीचे ट्विटर) माध्यमातून या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी पंजाबमधील अनेकांनी बलिदान दिलेले आहे, त्याबाबत कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही. कॅनडा आणि भारत यांच्या संबंधाबाबत सध्या जे सुरू आहे, ते फार चिंताजनक आहे. पंजाबमधील अनेक विद्यार्थी कॅनडात आहेत. त्यांच्यासाठी तर हे फारच चिंताजनक आहे. कॅनडा आणि भारताने या प्रकरणावर लवकर तोडगा काढावा अशी विनंती शिरोमणी अकाली दल करतो," अशी भूमिका शिरोमणी अकाली दलाने घेतली आहे. मोदींनी देशासमोर सत्य परिस्थिती मांडावी- दिलजितसिंग चीमा अकाली दलचे प्रवक्ते दिलजितसिंग चीमा यांनीदेखील पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. "कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी भारतावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. त्यांनी केलेले आरोप हे भारतासाठी चिंताजनक आहेत. आपण यावर गंभीरपणे विचार करायला हवा. आपल्या देशाच्या प्रतिष्ठेशी निगडित हे प्रकरण आहे. आपण जगातील सर्वाधिक मोठा लोकशाही देश आहोत. आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी या प्रकरणाशी संबंधित खऱ्या बाबी देशासमोर मांडाव्यात. सध्या मोठ्या प्रमाणात भारतीय नागरिक कॅनडात वास्तव्यास आहेत. त्यामुळे पंतप्रधान देशासमोर सत्य परिस्थिती मांडतील अशी आशा आहे," असे दिलजितसिंग चीमा म्हणाले.