राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडून अजित पवार बाहेर पडण्याच्या घटनेला आता एक महिन्याहून अधिकचा काळ होऊन गेला आहे. त्यानंतर शरद पवार आणि पक्ष नंतरच्या परिणामांशी झगडत आहे. पक्षफुटीनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी पहिल्यांदाच ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सविस्तर मुलाखत दिली आहे. पक्षातील फुटीला त्यांनी भाजपाला जबाबदार धरले आहे. तसेच अजित पवार यांच्या गटाशी त्यांचा वैचारिक विरोध असून, कुटुंब म्हणून अजूनही ते एक आहेत आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळकट करणे, हेच त्यांचे एकमेव ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. ‘द इंडियन एक्स्प्रेस’चे संदीप सिंह आणि आलोक देशपांडे यांनी सुप्रिया सुळे यांच्याशी संवाद साधला. या मुलाखतीचा अंश प्रश्नोत्तराच्या स्वरूपात खालीलप्रमाणे …
प्रश्न : अजित पवार यांच्या बंडाकडे तुम्ही कसे पाहता? याला तुम्ही विभाजन म्हणणार नाही का?




माझ्यासाठी हे खूपच दुर्दैवी आणि निराशाजनक आहे. कारण- हा विचारधारा आणि तत्त्वांचा लढा आहे. आम्ही भाजपाविरोधात निवडणूक लढलो आणि जेव्हा आमचाच एक गट त्यांनाच जाऊन मिळतो, तेव्हा पक्ष नक्कीच विस्कळित होतो, हे निश्चितच दुर्दैवी आहे. होय, हे एक भावनिक विभाजन आहे. राजकारण हे विचारसरणी आणि तत्त्वांशी संबंधित आहे. हा काही व्यवसाय किंवा नोकरी नाही की, मला एके ठिकाणी काम करणे आवडत नाही म्हणून मी दुसरीकडे जातो. राजकारण आणि व्यवसाय यांच्यामध्ये विचारसरणी हाच महत्त्वाचा धागा आहे; जो त्यांना वेगळा ठरवतो.
प्रश्न : अजित पवार यांचे बाहेर पडणे आश्चर्यकारक होते?
मला नाही वाटत की, बाहेर पडण्यासाठी काही विशिष्ट कारण होते आणि त्यांनीही काही आरोप केलेले नाहीत. भाजपाबरोबर हातमिळवणी करायची की नाही, एवढाच प्रश्न होता. पक्षातील काही सदस्यांना याबाबत कोणतीही अडचण नव्हती; परंतु आम्ही याला हरकत घेतली होती. मला वाटते, हेच एकमेव कारण असावे. हे (पक्षातील फूट) काही पहिल्यांदा होत नाही; भूतकाळातही असे प्रयत्न अनेकदा झालेले आहेत. भाजपा त्यांच्या रणनीतीमध्ये अनेकदा बदल करीत असतो. सुरुवातीला अपयश आल्यानंतर त्यांनी तिसऱ्या वेळेस आणखी मोठे नियोजन केले. आजच्या राजकीय परिस्थितीमध्ये विचारधारेची मोडतोड होतेय, हे फारच दुर्दैवी आहे. माध्यमे म्हणत आहेत की, हे सत्तेसाठी आहे, काही म्हणतात विकासासाठी, तर काही म्हणतात यामागे केंद्रीय यंत्रणा आहेत. कारण काहीही असू शकते; जे लोक भाजपामध्ये गेले आहेत, तेच याचे योग्य कारण देऊ शकतात.
हे वाचा >> “मी घराणेशाहीचं प्रॉडक्ट आहेच, पण भाजपा…”, लोकसभेत सुप्रिया सुळे प्रचंड आक्रमक
प्रश्न : अजित पवार गटातील काही नेत्यांनी फुटीसाठी तुम्हाला जबाबदार धरले आहे?
हो आणि त्यांनी त्याचे स्पष्टीकरणही दिलेले आहे. त्यामुळे मला आता या विषयावर फार काही बोलायचे नाही. भूतकाळात झालेल्या गोष्टींमध्ये अडकून राहण्याची आवश्यकता मला वाटत नाही. कारण- भारतासमोर यापेक्षाही मोठमोठ्या अडचणी आहेत. महागाई वाढली आहे, बेरोजगारी, डेटा प्रोटेक्शन ॲक्ट यांसारखे महत्त्वाचे प्रश्न देशासमोर असताना, कोण काय बोलले याची चर्चा का करावी?
प्रश्न : अजित पवार बाहेर पडल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले; याकडे तुम्ही कसे पाहता?
दुःखद आणि भावनिकदृष्ट्या वेदनादायी .. हीच माझी प्रतिक्रिया आहे. पण मी लोकशाहीमधील संवादाला अधिक महत्त्व देते. आम्ही शत्रू नाही; तर आमच्यात वैचारिक फरक आहे.
प्रश्न : त्यामुळेच पवारांनी भेटीगाठी सुरू ठेवल्या आहेत का?
काही नाही? आणि तसेही शरद पवार यांनी फुटीनंतर जाहीर सभांमधून ज्या प्रकारे भूमिका मांडल्या आहेत, त्यावरून शरद पवारांचा त्यांना (अजित पवार गट) पाठिंबा आहे, असे कुणालाही वाटणार नाही. शेवटी आरोप त्यांनीच केलेले आहेत; आम्ही आरोपही केलेले नाहीत आणि असंसदीय भाषाही वापरलेली नाही.
प्रश्न : पण या बैठकांमुळे महाविकास आघाडीत अस्वस्थता आहे?
तसे न करणे लोकशाहीच्या विरोधात ठरेल. लोकशाहीमध्ये कुणीही कुणाला भेटणे कसे काय टाळू शकतो? हे खरे आहे की, आम्ही आघाडीतील मित्रपक्षांना उत्तरदायी आणि जबाबदार आहोत. त्यामुळे त्यांना अस्वस्थता वाटत असेल, तर त्यात गैर काही नाही. ही आमची जबाबदारी आहे की, या भेटीमागील सत्य त्यांच्यापर्यंत पोहोचवले पाहिजे; जे आम्ही नक्कीच करू. याच कारणासाठी राजकारणात संवादाचे अधिक महत्त्व आहे.
प्रश्न : अजित पवार यांनी परतावे यासाठी तुम्ही दारे उघडी ठेवत आहात?
त्यांचा निर्णय निराशाजनक आहेच. पण, संवाद साधणे हा परत येण्याचा मार्ग असू शकत नाही आणि ते परत येतील का? यावर मला प्रतिक्रिया द्यायची नाही. पण मला विश्वास आहे की, आमच्या बाजूने आम्ही कुटुंब एकत्र ठेवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू. राजकारण घरात न आणण्याचा प्रयत्न आम्ही करू. लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला दिलेल्या अधिकारानुसार त्यांनी स्वतःचा निर्णय घेतला. त्यामुळे राजकीय लढाई आम्ही आमच्या नात्यात का आणावी? ही तर वैचारिक लढाई आहे. आम्ही कुटुंब म्हणून एकत्र आहोतच; पण आमच्यात वैचारिक लढाई सुरूच राहील.
प्रश्न : भाजपाने पहिल्यांदा एकनाथ शिंदे यांना जवळ केले आणि आता अजित पवार; या खेळीकडे तुम्ही कसे पाहता?
मला भाजपाच्या १०६ आमदारांसाठी दुःख वाटते. इथपर्यंत येण्यासाठी त्यांनी किती मेहनत घेतली असेल. मी जर त्यांच्या जागी असते, तर मला खूप दुःख झाले असते.
हे वाचा >> अजित पवारांना गद्दार म्हणणार का? सुप्रिया सुळे म्हणाल्या, “जिथे पक्षाचा प्रश्न येईल तिथे…”
प्रश्न : पक्षफुटीसाठी तुम्ही कोणाला जबाबदार धराल?
हे खरे आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विस्कळित झाला. यावरून भाजपा पूर्णपणे महाराष्ट्रविरोधी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांनी कुटुंबाची मोडतोड केली, त्यांनी पक्षांमध्ये फाटाफूट केली. माझा संताप फक्त भाजपावर आहे. मी भाजपाव्यतिरिक्त इतर कुणावरही आरोप करणार नाही. त्यांचा प्रामाणिक लोकशाहीवर विश्वास नाही. नवा भाजपा आमच्याकडे शत्रू म्हणून पाहतो. हा एक उथळ आणि संकुचित दृष्टिकोन आहे.
प्रश्न : भाजपाशी कधीही हातमिळवणी करणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादीकडे का पाहिले जाते? इतर विरोधी पक्षांबाबत असे प्रश्न कधी उदभवत नाहीत.
कदाचित आमचे सर्वांशीच वैयक्तिक संबंध चांगले आहेत आणि आम्हाला अनेकदा प्रस्तावही देण्यात आले. आम्ही हे कधीही वैयक्तिकरीत्या घेत नाही; पण कुटुंबावर हल्ले करणे योग्य नाही. या सर्व अटकळी असूनही शरद पवारांनी कधीही भाजपाशी हातमिळवणी केली नाही, हेही तितकेच खरे आहे.
प्रश्न : तुम्हाला भाजपाकडून केंद्रात मंत्रिपदाची ऑफर आहे, अशी अफवा ऐकण्यात आली?
मला याबद्दल काही कल्पना नाही. जगातील कोणाशीही माझे वैयक्तिक वैर नाही. पण, वैचारिक स्तरावर भाजबाबाबत मला गंभीर समस्या आहेत. ज्या देशात एकमेकांच्या विरोधात द्वेष प्रकट करणे इतके सामान्य असेल आणि काही विषयांवर बोलताना भीती निर्माण होत असेल, तर मला हे अजिबात आवडणार नाही. सहकार संघराज्यवादाचा काळ आता संपला असून सर्व सत्ता केंद्रित झाली आहे.
प्रश्न : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय भवितव्याबाबत तुम्हाला चिंता वाटते?
अजिबात नाही. जेव्हा तुम्ही शून्यावर असता, तेव्हा फक्त वर जाण्याचाच मार्ग असतो. यश आणि अपयश हे स्पर्धेचे अविभाज्य घटक आहेत. शरद पवारांकडे बघा. जेव्हा त्यांचे सर्वच्या सर्व आमदार सोडून गेले होते. तेव्हा त्यांनी माध्यमांना सांगितले, “माझ्याकडे आज शून्य आमदार आहेत. हे सांगताना त्यांनी पापणीही हलविली नव्हती” मला कल्पना आहे की, माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघातही आव्हाने निर्माण केली जातील. भाजपा नेते, मंत्री दर १५ दिवसांनी मतदारसंघाचा दौरा करीत आहेत. ते आले तरी काही हरकत नाही. त्यांना स्पर्धा करू द्या.
प्रश्न : मग तुम्ही पक्षाचे भवितव्य कसे पाहता?
पक्षाचा एक गट सत्तेत आहे; तर दुसरा गट विरोधात आहे. पण, तांत्रिकदृष्ट्या पक्षात फूट पडलेली नाही. महाराष्ट्रातील काही आमदारांनी पक्षश्रेष्ठींची परवानगी न घेता, सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. शरद पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष आहेत. आम्ही हे निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांना कळवले आहे. आम्ही निवडणूक आयोगाच्या निर्णयाची वाट पाहत आहोत; जेणेकरून त्यानंतर आम्हाला न्यायालयात जाता येईल.
प्रश्न : निवडणूक आयोगाकडून काय अपेक्षा आहेत?
हे राजकारण आहे आणि तुम्हाला माहितीये की, ते (भाजपा) किती अन्यायकारक पद्धतीने वागू शकतात. लोकशाहीमधील यंत्रणांवर माझा अद्यापही विश्वास आहे. दुर्दैवाने ज्या संस्था आतापर्यंत स्वायत्त होत्या, त्या तेवढ्या स्वतंत्र राहिलेल्या नाहीत. जर गोष्टी योग्य पद्धतीने पार पडल्या नाहीत, तर आश्चर्य वाटणार नाही.