संतोष प्रधान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिर्डीत शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने विचारविनिमय करण्यात येणार आहे. महाविकास आघाडी सत्तेत असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पहिला क्रमांक पटकविण्याचा निर्धार अजित पवार, जयंत पाटील आदी नेत्यांनी केला होता. सर्वाधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य ठरविण्यात आले होते. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यात सत्ताबदल झाला आणि सारीच राजकीय समीकरणे बदलली. राष्ट्रवादी काँग्रेस मुख्य विरोधी पक्षाच्या भूमिकेत गेला. सत्ता असताना आणि सत्तेबाहेर असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाणे केव्हाही वेगळे असते. यामुळेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हे राष्ट्रवादीसाठी आव्हान असेल.

हेही वाचा… देवानंद पवार : शेतकऱ्यांसाठी लढणारा नेता

राष्ट्रवादीचा मूळ पाया हा ग्रामीण भागातील. या तुलनेत शहरी भागांत पक्षाला फारसे भरीव यश मिळालेेले नाही. गणेश नाईक हे पक्षात असताना त्यांच्यामुळे नवी मुंबई किंवा अजित पवार यांच्या प्रभाव क्षेत्रातील पिंपरी-चिंचवड वा पुण्यात राष्ट्रवादीला सत्ता मिळाली. पण शहरी किंवा मोठ्या महानगरांमध्ये राष्ट्रवादीची तेवढी छाप पडलेली नाही. नगरपालिका किंवा छोट्या शहरांमध्ये राष्ट्रवादीची बऱ्यापैकी ताकद आहे. पक्षाची मूळ ताकद जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये आहे. पहिला क्रमांक पटकावण्यासाठी महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांमध्ये चांगले यश संपादन करावे लागेल. २०११-१२ मध्ये राष्ट्रवादी सत्तेत असताना झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाला राज्यात सर्वाधिक यश मिळाले होते. तेव्हा उपमुख्यमंत्रीपदी असलेल्या अजित पवार यांनी सारे नियोजन केले होते. वास्तविक तेव्हा मुख्यमंत्रीपद काँग्रेसकडे होते. पण अजित पवार यांनी जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि नगरपालिकांवर लक्ष केंद्रित करून पक्षाला यश संपादन करून दिले होते. २०१७ मध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना राज्यात भाजपला पहिला क्रमांक मिळाला होता. महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या सर्वच संस्थांमध्ये भाजपला पहिला क्रमांक मिळाला होता. २००१-०२ आणि २००६-०७ मधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या वेळी विलासराव देशमुख मुख्यमंत्रीपदी असताना काँग्रेसला यश मिळाले होते. यावरून सत्ताधारी पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये यश मिळते हे सिद्ध होते.

हेही वाचा… राजकीय इच्छाशक्तीअभावी रुपी बँकेचा अस्त; बापट,पवार,फडणवीस सर्वांचे प्रयत्न अपयशी

राष्ट्रवादीसाठी आणखी काही मुद्दे प्रतिकूल ठरणारे आहेत. पक्षाने वेगवेगळे प्रयोग करूनही गेल्या २३ वर्षांत मुंबईत राष्ट्रवादीला अद्यापही बाळसे धरता आलेले नाही. मुंबईत ताकद वाढविण्याकरिता पक्षाध्यक्ष शरद पवार, छगन भुजबळ आदी साऱ्याच नेत्यांनी प्रयत्न केले. पण राष्ट्रवादीला मुंबई कधीच मानवले नाही. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना, भाजप आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत होते. मनसेने काही काळ जम बसविला होता. पण राष्ट्रवादीला मुंबईकरांनी कधीच आपलेसे केले नाही. सध्या तर मुंबईत पक्षाची अवस्था केविलवाणी आहे. माजी अध्यक्ष नवाब मलिक तुरुंगात आहेत. पक्षाने दोन कार्याध्यक्षांकडे पक्षाची सूत्रे सोपविली आहेत. मुंबईत काही जण स्वत:च्या ताकदीवर पालिकेत निवडून येतात. मुंबईत राष्ट्रवादीने कधीच नगरसेवकांचा दुहेरी आकडा गाठलेला नाही. विदर्भातही राष्ट्रवादीला फारसे यश मिळालेले नाही. प्रफुल्ल पटेल यांच्यामुळे भंडारा वा गोंदिया जिल्हा परिषदांमध्ये राष्ट्रवादीला सत्ता मिळाली. पण हे यश प्रफुल्ल पटेल यांचे वैयतक्तिक होते. विधानसभा निवडणुकीतही विदर्भात राष्ट्रवादीला मर्यादितच यश मिळते. मुंबई आणि विदर्भ वगळूनच राष्ट्रवादीला यशाची गणती करावी लागते, अशी मार्मिक प्रतिक्रिया पक्षाच्या नेतृत्वाकडून व्यक्त केली जाते.

हेही वाचा… श्वेतपत्रिका : केवळ राजकीय हिशेब चुकते करणारे हत्यार; कारभारात सुधारणा शून्य

पुणे वा पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात ठाणे व रायगड आणि रत्नागिरी तसेच खान्देशवर राष्ट्रवादीची सारी मदार असते. पश्चिम महाराष्ट्र या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपने आव्हान उभे केले आहे. अशा वेळी राष्ट्रवादीला यश मिळविण्यासाठी जोर लावावा लागेल. सत्ता गेल्याने कार्यकर्त्यांमधील उत्साह मावळला आहे. राष्ट्रवादीत येण्याच्या तयारीत असलेल्या अन्य पक्षातील प्रभावी नेतेमंडळींचा प्रवेशही रखडला. कारण राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत नसल्याने हवशा-नवशांसाठी राष्ट्रवादीचे आकर्षण नाहीसे झाले. कुंपणावरील कार्यकर्त्यांना आता शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचा पर्याय मिळाला आहे. अन्य पक्षातून येणाऱ्यांचा ओघ आटला त्याशिवाय पक्षातील कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावण्याचे दुहेरी आव्हान आता राष्ट्रवादीसमोर आहे. यातूनच शिर्डीच्या शिबिरात शरद पवार हे कार्यकर्त्यांना संदेश देतील, अशी शक्यता आहे.

हेही वाचा… शिंदे गटात सहभागी होण्याबाबत कृषीमंत्री सत्तार यांची माजी आमदार सुभाष झांबड यांना गळ

राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून काँग्रेस विचारांचा मुख्य पक्ष म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न शरद पवार यांनी केला होता. पण १९९९ ते २०१९ या काळात काँग्रेसपुढे राष्ट्रवादीला दुय्यम भूमिका बजवावी लागली होती. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने आघाडी घेतली. काँग्रेस कमकुवत झाल्याचा फायदा उठविण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न होता. महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात राजकीयदृष्ट्या सर्वधिक लाभ हा राष्ट्रवादीने उठविला होता. सत्तेच्या माध्यमातून पक्ष विस्तारण्यासाठी राष्ट्रवादीने प्रयत्न केले होते. त्याचा पक्षाला लाभही झाला. २०१४ ते २०१९ या अपदाव वगळता स्थापनेपासून राष्ट्रवादी काँग्रेस सतत सत्तेतील भागीदार राहिला आहे. सत्तेचा पक्षाने पुरेपूर राजकीय लाभ करून घेतला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या असतानाच सत्ता गमवावी लागल्याने राष्ट्रवादीला या निवडणुकांमध्ये त्याचा फटका बसू शकतो.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Challenge ahead of ncp to achieve success without power print politics news asj
First published on: 03-11-2022 at 10:51 IST