छत्रपती संभाजीनगर – आमदार धनंजय मुंडे यांच्या वैयक्तिक जीवनातील वाद, त्यातून झालेली बदनामी, निवडणुकीत धमकावून मतदान करवून घेतले जात असल्याचा आरोप, त्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पडलेली भर, त्यात मुंडे यांचा कारभारी वाल्मीक कराडचे नाव येणे अन त्यातून औष्णिक विद्युत केंद्रातील राखेसह अनेक गैरव्यवहाराचा राज्यभर उठलेला धुराळा, या सर्व कारणांमुळे परळीची नाचक्की झाली. तेव्हा या बदनाम शहराची प्रतिमा सुधारण्याचे मोठे आव्हान धनंजय मुंडेंसह, मंत्री पंकजा मुंडेंच्या समोर आहे. त्यामुळे निवडणुकीत कितीही रणधुमाळी उडो, परळीची बदनामी दूर कशी करणार, असा प्रश्न आहेच.
बदनामीच्या प्रकरणातूनच धनंजय मुंडे यांना मंत्रीमंडळातून पायउतार व्हावे लागले. पक्षातील वजनही घटले. “हाताला काम द्या” म्हणण्यासाठी रायगडापर्यंत जावे लागले. मग तूर्त ओबीसींसाठी काम करण्याचा सल्ला मिळणे, या सर्व फेऱ्यात अडकलेल्या धनंजय मुंडे यांच्यासाठी परळीतील विजय अत्यंतिक महत्त्वाचा मानला जात आहे.
ग्रामपंचायत सदस्यपदाची निवडणूकही मुंडे गंभीरतेने घेतात, अशी त्यांची ओळख आहे. बीडसह राज्यात अनेक ठिकाणी महायुतीतच फाटाफूट झाल्याचे चित्र असताना धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांनी त्यांच्यात ठरलेल्या “सामंजस्य करारा”च्या राजकारणानुसार महायुती पक्की करून मतांची विभागणी टाळण्यात यश मिळवले. तसा त्यांचा श्रीगणेशाही महायुतीचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आणण्यातूनही झाला आहे. सारी रणनीती धनंजय मुंडे ठरवत आहेत.
परळीचे नगराध्यक्षपद हे खुल्या वर्गातील महिलेसाठी आरक्षित असून, ब्राह्मण व मराठा उमेदवारामध्ये होणारी लढत लक्षवेधी ठरत आहे. महायुतीच्या पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी व राष्ट्रवादीच्या (शरद पवार) संध्या दीपक देशमुख या दोन्ही महिला उमेदवारांचे पती माजी नगराध्यक्ष राहिलेले आहेत. शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढत आहे. दीपक देशमुख हे धनंजय मुंडे यांचे कडवे समर्थक राहिलेले आहेत. मात्र आता ते मुंडे यांच्यापासून दुरावले आहेत. मुंडे हे पद देतात पण कोणालाच कारभार करू देत नाहीत. भरमसाठ निधी आणतात पण भ्रष्टाचारही कोटींमधून करतात, असे आरोप मुंडेंवर करून ते दूर झाले आहेत.
धनंजय मुंडे यांनी नगराध्यक्षपद राष्ट्रवादीकडे (अजित पवार) घेण्यापासून ते गतवेळपेक्षा अधिक काही जागा भाजप व दोन जागा शिंदेंच्या सेनेच्या पदरात टाकण्यापर्यंतची सूत्रे हाताळली आहेत. पंकजा या भाऊ ठरवेल त्याला पाठिंबा द्यायच्या भूमिकेत आहेत. त्यांच्या भगिनी माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे अद्याप सक्रिय झाल्या नाहीत.
परळीत काँग्रेस व वंचित बहुजन महासंघाची युती झाली आहे. काँग्रेसने मुस्लिम महिला उमेदवार दिलेला असून, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची परळीत सभा झालेली आहे. शरद पवार यांच्या पक्षाकडून खासदार बजरंग सोनवणे हे लक्ष घालत आहेत. त्यांच्या उमेदवाराकडून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना आणण्याची जुळवाजुळव सुरू असल्याची चर्चा असून, जरांगेची संभाव्य सभा मुंडे भावंडांच्या पथ्यावरच पडेल, असा तर्क लावला जात आहे. हक्काची ओबीसी मतपेढी व मागासवर्गीय, मुस्लिम व लिंगायत (मामुली) समुदायाची अधिकाधिक मते महायुतीच्या पारड्यात घेऊन परळीवर पकड असल्याचा संदेश देण्यासाठी धनंजय मुंडे जीवाचे रान करताना दिसत आहेत. त्यामागे शहरासह स्वप्रतिमा सुधरवण्याचे असलेले आव्हान मानले जात आहे.
