Champai Soren Reaction on rumor over Joining BJP : या वर्षाच्या सुरुवातीला झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक झाली. अटकेच्या काही तास आधी हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. सोरेन तुरुंगात गेल्यानंतर मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी चंपई सोरेन यांच्या हाती सोपवण्यात आली होती. मात्र, हेमंत सोरेन हे तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ३ जुलै रोजी चंपई सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि हेमंत सोरेन यांनी पुन्हा एकदा राज्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. मात्र चंपई सोरेन यांच्या मनाविरुद्ध त्यांच्याकडून राजीनामा घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चालू आहे. त्यामुळे चंपई सोरेन नाराज असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, आता ते भाजपात प्रवेश करणार असल्याच्या अफवा पसरत आहेत.

चंपई सोरेन यांनी या अफवांचं खंडण केलं आहे. ते म्हणाले, “मी नाराज असल्याची अफवा कशी पसरली, याबाबत मला कल्पना नाही. प्रसारमाध्यमं कोणत्या बातम्या चालवत आहेत, याबाबत मला अजिबात कल्पना नाही. मी जिथे होतो, तिथेच आहे.” यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंनी चंपई सोरेन यांना विचारलं की तुम्ही दिल्लीला कधी जाणार आहात? यावर ते म्हणाले, “आता तरी मी घरी जातोय, पुढचं काही सांगू शकत नाही.”

दरम्यान, भाजपा व झारखंड मुक्ती मोर्चामधील सुत्रांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितलं की चंपई सोरेन हे दिल्लीला जाणार आहेत. पाठोपाठ काही प्रसारमाध्यमांनी दावा केला आहे की चंपई सोरेन हे दिल्लीत दाखल झाले आहेत. तिथेच त्यांचा भाजपा पक्षप्रवेश होऊ शकतो. मात्र हेमंत सोरेन यांचे दिल्लीतले सहकारी व निकटवर्तीय चंपई सोरेन यांना थांबवण्याचा प्रयत्न करू शकतात.

मुख्यमंत्रिपद नव्हे ‘या’ कारणामुळे नाराजी

जेएमएममधील सूत्रांनी सांगितलं की झारखंडच्या आगामी विधानसभा निवडणुकीत चंपई सोरेन यांनी घाटशीला मतदारसंघातून त्यांच्या मुलासाठी उमेदवारी मागितली होती. मात्र त्यांची विनंती नाकारल्यानंतर त्यांचे पक्षाशी मतभेद झाले आहेत. ते आता केवळ काही राजकीय समीकरणं बसवण्याचा प्रयत्न करत आहेत. ते कोलकाता येथे जाऊन भाजपा नेत्यांना भेटून आल्याचे दावे केले जात आहेत. ते भाजपात कधी दाखल होणार हे लवकरच स्पष्ट होईल.

हे ही वाचा >> महाराष्ट्र आणि हरियाणात जातीच्या पगड्याचा समान धागा, कोणाला फटका बसणार ?

मनी लाँडरिंगप्रकरणी तुरुंगात असलेले हेमंत सोरेन २८ जून रोजी तुरुगातून सुटले. त्यानंतर हेमंत सोरेन यांच्यासाठी चंपई सोरेन यांना मुख्यमंत्रिपद सोडावं लागलं होतं. त्यांना मुख्यमंत्रिपद सोडायला सांगितल्यानंतर सुरुवातीला ते तयार नव्हते, अशा काही बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र पक्षातील इतरांपुढे त्यांचं काही चाललं नाही.

राज्याच्या विधानसभेतील स्थिती काय?

८१ सदस्य असलेल्या झारखंड विधानसभेत इंडिया आघाडीचे एकूण ४५ सदस्य आहेत. इंडिया आघाडीची राज्यात सत्ता आहे. झारखंड मुक्ती मोर्चाचे राज्यात २६ आमदार आहेत. तर, त्यांच्याबरोबर काँग्रेसचे १७, राजदचा एक व कम्युनिस्ट पार्टीच्या एका आमदाराचा समावेश आहे. दुसऱ्या बाजूला झारखंडच्या विधानसभेत भाजपाचे २४, ऑल झारखंड स्टुडंट्स युनियनचे तीन, राष्ट्रवादी काँग्रेसचा एक (अजित पवार गट), संयुक्त जनता दलाचा एक आणि एका अपक्ष आमदारासह एनडीएकडे एकूण ३० आमदारांचं संख्याबळ आहे.

हे ही वाचा >> Madhya Pradesh: सर्वोच्च न्यायालयाचा भाजपा मंत्र्याला दणका; जमिनीच्या वादातून एका व्यक्तीला गायब केल्याची चौकशी होणार

चंपई सोरेन यांनी मुख्यमंत्रिपद सोडण्यास नकार दिलेला?

मुख्यमंत्रिपद सोडण्याआधी चंपई सोरेन पक्षातील प्रमुखांसमोर म्हणाले होते की विधानसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे. अशातच आत्ता मुख्यमंत्री बदलल्यास लोकांमध्ये चांगला संदेश जाणार नाही. तसेच हेमंत सोरेन हे पूर्णपणे निर्दोष मुक्त झालेले नाहीत. ते केवळ जामिनावर तुरुंगाबाहेर आले आहेत. त्यामुळे सरकार अस्थितर होऊ शकतं. मात्र पक्षातील वरिष्ठांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष करत चंपई यांना राजीनामा देण्यास सांगितलं.

पक्षातील आदिवासी नेते शिबू सोरेन यांच्या कुटुंबाच्या पालखीचे भोई : भाजपा

झारखंड मुक्ती मोर्चामधील अंतर्गत बाबींवरून टीका करताना झारखंड भाजपा प्रदेशाध्यक्ष बाबूलाल मरांडी म्हणाले होते की शिबू सोरेन यांच्या कुटुंबाबाहेरील आदिवासी नेते पक्षात केवळ कामचलाऊ (कामापुरते) असतात. त्यांना महत्त्वाची पदं दिली जात नाहीत. पक्षातील इतर नेते हे केवळ शिबू सोरेन यांच्या कुटुंबाच्या पालखीचे भोई म्हणून काम करत असतात.