सुहास सरदेशमुख

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

औरंगाबाद: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेतून फुटून काँग्रेसमध्ये जाणार होते,  असे आपणास आमदार संजय शिरसाठ यांनी काही वर्षांपूर्वी सांगितले होते. तेव्हा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे सरकार होते. पण पृथ्वीराज चव्हाण यांनी ते काही होऊ दिले नाही, असा नवा गौप्यस्फोट करत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी अशोक चव्हाण यांच्या वक्तव्यात नवी भर टाकत एकनाथ शिंदे यांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

दरम्यान चंद्रकांत खैरे यांना मानसिक उपचाराची गरज असल्याची तिखट प्रतिक्रिया आमदार संजय शिरसाठ यांनी दिली. 

हेही वाचा >>> हिमाचल प्रदेश काँग्रेसमध्ये गळती सुरूच, पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षचाच भाजपामध्ये प्रवेश

२०१४ ते २०१९ या कालावधीमध्ये युतीचे सरकार असताना त्यातून फुटून काँग्रेस व राष्ट्रवादीबरोबर सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव घेऊन शिवसेनेतर्फे एकनाथ शिंदे व इतर नेते आले होते  असा खळबळजनक दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी ‘ लोकसत्ता’च्या माध्यमातून केला. या त्यांच्या वक्तव्याला दुजोरा देत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे म्हणाले की, एकनाथ शिंदे हे त्यापूर्वीही काँग्रेससोबत जाण्यास इच्छुक होते.‌ पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते.  एकनाथ शिंदे एक गट घेऊन काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारी आहेत.

हेही वाचा >>> पुण्यात काँग्रेसच्या स्वबळाच्या वल्गना

मलाही जायचे आहे, असे संजय शिरसाठ यांनी मला सांगितले होते असे विधान चंद्रकांत खैरे यांनी केले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी  तेव्हा या लोकांना काँग्रेसमध्ये स्थान दिले नाही. तेव्हा एकनाथ शिंदे व शिरसाठ यांच्यामध्ये नुकतीच मैत्री सुरू झाली होती, असेही खैरे म्हणाले. अशोक चव्हाण यांच्या वक्तव्यानंतर आता शिवसेना नेते खैरे यांनी नवी भर टाकल्याने शिंदे गटातील आमदार शिरसाठ व मुख्यमंत्री यांची कोंडी करण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. शिंदे गटातील आमदार आणि मंत्र्यांवर आता एका पाठोपाठ एक आरोप होत असून खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या गटातील आमदारांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे. 

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrakant khaire open new secrets of eknath shinde by quoting sanjay shirsath print politics news zws
First published on: 29-09-2022 at 19:03 IST