पुणे : मूळचे कोल्हापूरचे असलेले चंद्रकांत पाटील यांना कोथरूडकरांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काहीशा नाराजीने का होईना निवडून दिले. स्थानिक आणि आयात या मुद्द्याभोवती ती निवडणूक केंद्रित राहिली. आता पाच वर्षे जुने झालेले पाटील यांना कोथरूडकरांनी मनापासून स्वीकारले का, हे आगामी निवडणुकीतून स्पष्ट होणार आहे. यंदा पाटील यांच्यासमोर शिवसेना ठाकरे गटाचे आणि मनसेचेही आव्हान असण्याची शक्यता आहे. कोथरूड मतदारसंघ हा भाजपबहुल मतदारांचा मानला जातो. येथून हमखास विजयाची खात्री असल्याने तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना येथून उमेदवारी देण्यात आली. तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी यांना डावलण्यात आल्याने मतदारांसह भाजपमध्येही या निर्णयावरून नाराजी होती. त्याचे पडसाद मतदानामधूनही दिसून आले. त्या निवडणुकीत पाटील यांच्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक किशोर शिंदे यांनी निवडणूक लढवली. चंद्रकांत पाटील २५४९५ मतांनी निवडून आले. मात्र, तिसऱ्या क्रमांकाची मते ही ‘नोटा’ला मिळाली होती. ‘नोटा’ला ४०२८ मते मिळाल्याने पाटील यांना ऐन वेळी दिलेल्या उमेदवारीमुळे कोथरूडकरांमध्ये नाराजी असल्याची चर्चा झाली. हेही वाचा >>> जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने अजित पवार यांचा सर्व घटकांशी संवाद मागील पाच वर्षांत पाटील यांनी पुण्याचे पालकमंत्री आणि कोथरूडचे आमदार म्हणून पुण्यात जनसंपर्क वाढविला आहे. ते पुण्यात कायमचे स्थायिकही झाले आहेत. मात्र, तरीही या निवडणुकीत पाटील हे बाहेरचे उमेदवार असल्याचा प्रचार शिवसेना आणि मनसेकडून केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाटील यांना पुणेकरांनी स्वीकारले की नाही, हे स्पष्ट करणारी ही निवडणूक असणार आहे. महायुतीपुढे आव्हान कोथरूडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची फारशी ताकद नाही. बहुतांश पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे उद्धव ठाकरे यांच्या पक्षात आहेत. त्यामुळे पाटील यांना या मतदारसंघात शिवसेनेच्या युतीचा फारसा फायदा होईल, असे चित्र दिसत नाही. याउलट बाणेर, पाषाण या भागात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मतदार आहेत. त्यांची साथ मोकाटे किंवा सुतार यांना मिळण्याची शक्यता आहे. मनसेकडून नवीन चेहरा? २००९ पासून सलग तीन विधानसभा निवडणुकांमध्ये मनसेने माजी नगरसेवक किशोर शिंदे यांना संधी दिली आहे. मात्र, तिन्ही वेळा त्यांना अपयश आले. त्यामुळे या वेळच्या निवडणुकीत नवीन चेहरा म्हणून मनसेचे सरचिटणीस हेमंत संभूस हे उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. शिवसेनेकडून मोकाटे की सुतार? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माजी आमदार चंद्रकांत मोकाटे आणि माजी मंत्री शशिकांत सुतार यांचे चिरंजीव पृथ्वीराज सुतार हे दोघे इच्छुक आहेत. दोघेही स्थानिक आहेत. सन २००८ मध्ये शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे विभाजन करून कोथरूड हा नवीन विधानसभा मतदारसंघ तयार करण्यात आला. त्यानंतर झालेल्या २००९ मधील पहिल्याच निवडणुकीत शिवसेनेचे चंद्रकांत मोकाटे हे निवडून आले होते. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत मेधा कुलकर्णी यांनी मोकाटे यांचा पराभव केला होता. शशिकांत सुतार यांचे ९० च्या दशकात कोथरूडमध्ये वर्चस्व होते. १९९० आणि १९९५ च्या तत्कालीन शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून सलग दोन वेळा सुतार हे निवडून आले होते. आता पृथ्वीराज सुतार यांनी तयारी सुरू केली आहे.