राज्यात महानगरपालिका निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये वाद होत असल्याचे दिसून आले आहे. काँग्रेस व शिवसेना (ठाकरे) यांच्यातील दरी आणखी वाढत चालली आहे. तसेच दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील काही नेते अजित पवारांच्या राष्ट्रवादीबरोबर विलीनीकरण करण्याची मागणी करत असल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडीत कटुता निर्माण होण्याचे ताजे कारण म्हणजे चंद्रपूर महानगरपालिका आहे. चंद्रपूरमध्ये काँग्रेसचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले, तरी देखील काँग्रेसला त्यांचा महापौर निवडून आणता आला नाही. त्याचे कारण म्हणजे शिवसेनेने (ठाकरे) भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, “शिवसेना (ठाकरे) हा पक्ष महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचा घटक पक्ष आहे. त्यांनी चंद्रपूरमध्ये आम्हाला समर्थन देणे अपेक्षित होते. चंद्रपूरमध्ये त्यांनी (शिवसेना-ठाकरे) जो निर्णय घेतला त्याची किंमत त्यांना संपूर्ण राज्यात मोजावी लागेल. काँग्रेसने पण असाच निर्णय परभणीबाबत घ्यावा का?” असा सवाल सपकाळ यांनी उपस्थित केला. दरम्यान, परभणीत शिवसेना (ठाकरे) व काँग्रेस पक्षाने एकत्र येऊन महापौर पदाची निवडणूक जिंकली आहे.
मंगळवारी सकाळपर्यंत शिवसेनेच्या (ठाकरे) नेत्यांनी चंद्रपुरात भाजपाला समर्थन देणार नसल्याचे म्हटले होते. परंतु, त्यानंतर चंद्रपुरातील स्थानिक नेत्यांनी भाजपाला महापौर निवडणुकीत पाठिंबा दिला. शिवसेनेतील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रपूरमधील नेत्यांवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. शिवसेना (ठाकरे) नेते अनिल परब म्हणाले, “असे निर्णय स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून घेतले जातात. हा आमच्या पक्षाचा किंवा महाविकास आघाडीचा निर्णय नाही.” दरम्यान, काँग्रेस व शिवसेनेत (ठाकरे) वादाची ठिणगी मागील काही महिन्यांपासून सतत पडत आली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणूक काँग्रेसबरोबर एकत्रपणे लढवण्याची शिवसेना ठाकरे गटाची इच्छा होती. परंतु, काँग्रेसने निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय घेतला. राज ठाकरेंचा मनसे पक्ष सोबत असल्याचे कारण काँग्रेसने पुढे केले होते. निवडणूक एकत्र लढण्यास नकार दिला होता.
“आमची (शिवसेनेची) गरज नाही असे काँग्रेस बऱ्याच कालावधीपासून म्हणत आहे. चंद्रपूर मध्ये देखील त्यांचे दोन गट आहेत. धानोरकर गटाने त्यांना आमची (शिवसेनेची) गरज नसल्याचे म्हटले होते. अशा परिस्थितीत आम्ही काय करायला हवे? चंद्रपूरमध्ये जे घडले त्याबाबत उद्धव ठाकरे निर्णय घेतली. सध्या आता कोणत्याच निवडणुका नाहीत.”, असे शिवसेनेच्या (ठाकरे) एका वरिष्ठ नेत्याने ‘द प्रिंट’ला म्हटले आहे. दरम्यान, महापालिकेतील पदांवरून चंद्रपूरमधील काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर व काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यात वाद झाला. हा वाद काँग्रेसच्या दिल्लीतील नेतृत्वापर्यंत पोहोचला. या सगळ्या गोंधळाचा फायदा उठवत भाजपाने शिवसेनेच्या (ठाकरे) सहा नगरसेवकांना गळाला लावून महापौर निवडणूक जिंकली.
उद्धव ठाकरेंची शिवसेना व काँग्रेसमधील वाद
२०१९ मध्ये महाविकास आघाडीची स्थापना झाली. त्यावेळी काँग्रेस व शिवसेना हे पक्ष महाविकास आघाडीत सहभागी झाले. दोन्ही पक्षांची भूमिका व विचारसरणी एकमेकांच्या कायम विरोधात राहिली होती. दोन भिन्न विचारसरणीचे पक्ष त्यावेळी एकत्र आले होते. २०२२ मध्ये शिवसेनेत फुट पडली. त्यानंतरही उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही काँग्रेस व राष्ट्रवादीबरोबर महाविकास आघाडीचा घटक पक्ष होती. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना (ठाकरे) व काँग्रेस पक्षात सांगलीच्या जागेवरून वाद झाला होता.
“सांगलीची जागा त्यांची (शिवसेना-ठाकरे) कधीच नव्हती. त्यांची तिथे जिंकून येण्याची काहीच शक्यता नव्हती. परंतु, फक्त आघाडी धर्मामुळे आम्ही ती जागा त्यांना सोडली. स्थानिक पातळीवर काय परिस्थिती आहे, ते न पाहता त्यांनी सांगलीचा आग्रह धरला होता. काय झालं…ते तिथे हरले. आमचा उमेदवार अपक्ष लढला आणि तिथून जिंकून आला.”, अशी माहिती काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘द प्रिंट’ला दिली आहे.
दोन राष्ट्रवादींमध्ये अडकली काँग्रेस?
महानगरपालिका निवडणुकीत पुणे व पिंपरी चिंचवड मध्ये अजित पवार व शरद पवार यांच्या राष्ट्रवादींनी एकत्रीत निवडणूक लढवली होती. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची चर्चा अधूनमधून सुरू होते. अजित पवारांची राष्ट्रवादी ही महायुतीतील घटक आहे, तर शरद पवारांची राष्ट्रवादी ही महाविकास आघाडीत आहे. काँग्रेस पक्ष या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबत काय भूमिका घेतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेत दोन्ही राष्ट्रवादींनी शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा देत तिन्ही पक्षांचा एक गट स्थापन केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची नेमकी भूमिका काय याबाबत काँग्रेसमध्ये संभ्रम असल्याची चर्चा आहे. २०२९ मध्ये होणाऱ्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढण्याची तयारी करत असल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर शिवसेना (ठाकरे) हा सर्वात मोठा विरोधी पक्ष ठरला. शिवसेनेने महापौर पदासाठी उमेदवार द्यावा अशी काँग्रेसची मागणी होती. भाजपाचा महापौर मुंबईत बिनविरोध निवडून आला. त्यामुळे देखील काँग्रेसने शिवसेनेवर नाराजी व्यक्त केली होती.

