चंद्रपूर: विधानसभा निवडणुकीत सहा तिकीट मीच वाटणार असे जाहीर वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मात केली आहे. वडेट्टीवार चार समर्थकांना उमेदवारी मिळवून देण्यात यशस्वी झाले तर धानोरकर या केवळ स्वतःच्या भावाची उमेदवारी आणू शकल्या. राजुराचे आमदार काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे स्वतःची उमेदवारी आणण्यात समर्थ होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विधानसभा निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्यातील मतदारसंघात आपापल्या समर्थकाला उमेदवारी मिळावी, यासाठी काँग्रेस नेत्यांमध्ये चांगलीच स्पर्धा होती. नेत्यांमधील वादविवाद व भांडणे दिल्लीपर्यंत पोहचले. त्यामुळेच चंद्रपूर, वरोरा व बल्लारपूर या तीन मतदारसंघातील उमेदवार घोषित करण्यास काँग्रेसला बराच विलंब झाला. या तिन्ही जागांसाठी वडेट्टीवार व धानोरकर यांच्यात बरीच रस्सीखेच होती. या वादातून खासदार धानोरकर यांनी राजीनामा देण्याचा इशारा पक्षश्रेष्ठींना दिला. अनुसूचित जाती साठी राखीव चंद्रपूर मतदार संघातून धानोरकर यांनी मूळचे बल्लारपूर येथील रहिवासी तेलगू भाषिक राजू झोडे व सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक सुधाकर अंभोरे यांच्यासाठी आग्रह धरला होता. तर खासदार मुकुल वासनिक व वडेट्टीवार यांनी काँग्रेसचे सामान्य कार्यकर्ते प्रवीण पडवेकर यांच्यासाठी आग्रह धरला. बौध्द समाजाचा उमेदवार देवू असे पक्षाने ठरविले होते. बौद्ध समाजाने धानोरकर यांना लोकसभा निवडणुकीत भरभरून मतदान केल्यानंतर देखील त्यांनी पडवेकर यांच्या नावाला शेवट पर्यंत विरोध केला.

हेही वाचा >>>Palghar Vidhan Sabha Constituency : पालघरमध्ये शिवसेनेचे दोन्ही उमेदवार भाजपमधून आयात

शेवटी पक्षाने पडवेकर यांची उमेदवारी रविवारी जाहीर केली. त्याच प्रमाणे धानोरकर यांनी वरोरा मतदार संघातून स्वतःचा भाऊ प्रवीण काकडे याच्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली. येथे पक्ष भद्रावतीचे माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर अथवा डॉ. चेतन खुटेमाटे या दोघांपैकी एकाला उमेदवारी द्या, असे त्यांना शेवट पर्यंत सांगत होता. मात्र धानोरकर काहीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हत्या. धानोरकर यांनी या जागेसाठी स्वतःची खासदारकी पणाला लावली, अशी माहिती आहे. शेवटी पक्षाने धानोरकर यांचे स्विय सहायक म्हणून काम करणाऱ्या व काँग्रेस पक्षाशी काही एक संबंध नसलेल्या काकडे यांना उमेदवारी दिली. बल्लारपूर मतदार संघातून खासदार धानोरकर यांनी माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी यांचे तर वडेट्टीवार यांनी चंद्रपूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी डॉ. अभिलाषा गावतुरे यांच्यासाठी आग्रह धरला होता. मात्र शेवटी वडेट्टीवार समर्थक रावत यांनाच उमेदवारी दिली गेली. चिमूर मधून वडेट्टीवार यांच्याच प्रयत्नाने सतीश वारजुकर यांना उमेदवारी मिळाली. तर राजुरामधून काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांच्या व ब्रम्हपुरीमधून वडेट्टीवार यांच्या नावाला कोणी विरोध केला नाही. यावरून जिल्ह्यातील तिकीट वाटपात वडेट्टीवार यांनी खासदार धानोरकर यांच्यावर मात केल्याचे दिसून येते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrapur vidhan sabha constituency seat sharing congress vijay wadettiwar vs pratibha dhanorkar for maharashtra assembly election 2024 print politics news amy