scorecardresearch

चंद्रशेखर बावनकुळे : भाजपचा नवा ओबीसी चेहरा

प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची भारतीय जनता पक्षाचा ओबीसी चेहरा अशी ओळख आहे.

चंद्रशेखर बावनकुळे : भाजपचा नवा ओबीसी चेहरा
( भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे )

चंद्रशेखर बोबडे
प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची भारतीय जनता पक्षाचा ओबीसी चेहरा अशी ओळख आहे. राज्यात ओबीसी आरक्षणाचा प्रश्न उद्भवल्यावर बावनकुळेंनी संपूर्ण राज्यभर फिरून पक्षाची भूमिका मांडली होती. महाविकास आघाडीच्या काळात या मुद्यावर आंदोलन करून सर्वांचे लक्ष वेधले होते. त्याचे बक्षीस त्यांना आता मिळाले.

मितभाषी, पक्षातील सर्व प्रवाहांशी जुळवून घेणारे अशीही त्यांची ओळख आहे. यामुळे उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष ही दोन्ही महत्वाची पदे विदर्भातील नागपूर जिल्ह्याला मिळाली आहेत. प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त झालेले ते विदर्भातील पाचवे अध्यक्ष आहेत. यापूर्वी पांडुरंग फुंडकर, नितीन गडकरी, सुधीर मुनगंटीवार, देवेंद्र फडणवीस या नेत्यांनी हे पद भूषवले. सामान्य कार्यकर्ता ते प्रदेशाध्यक्ष अशी त्यांची राजकीय कारकीर्द आहे. २००४ ते २०१४ या काळात सलग तीन वेळा ते कामठीचे आमदार होते. मात्र २०१९ मध्ये त्यांना पक्षाने अनपेक्षितपणे उमेदवारी नाकारली. त्याचा फटका पक्षाला नागपूर व विदर्भात अनेक ठिकाणी निवडणुकीत बसला. हे लक्षात आल्यावर त्यांच्या पुनर्वसनाचे प्रयत्न सुरू झाले.

वर्षभरापूर्वी त्यांना स्थानिक संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर संधी देण्यात आली. ही संधी मिळताच त्यांच्या नेतृत्वात भाजपने ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा राज्यभर पेटवला.त्यामुळे पक्षाचे ओबीसी नेते अशी त्यांची ओळख तयार झाली. राज्यातील पक्षाचे प्रमुख नेते नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस या दोघांचेही ते विश्वासू सहकारी आहेत. सर्व सामान्यांशी निगडीत प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणारा नेता म्हणून कार्यकर्ते त्यांच्याकडे पाहतात. या नियुक्तीमुळे नागपुरात पक्षाचे तिसरे सत्ताकेंद्र तयार झाले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.