शिंदे सेना -भाजपा युतीने लातूरमध्ये लाभापेक्षा तापच अधिक|chandrasekhar bawankule clarified shinde group will alliance with bjp all elections it seems that will problem in latur | Loksatta

शिंदे सेना -भाजपा युतीने लातूरमध्ये लाभापेक्षा तापच अधिक

लातूर ग्रामीण मतदार संघ ऐनवेळी शिवसेनेला देण्यात आला व औसा विधानसभा मतदारसंघ भाजपने घेतला. भाजपला याचा लाभ औशात झाला मात्र लातूर ग्रामीण मधील शिवसेनेच्या उमेदवाराची अनामत रक्कम जप्त झाली.

शिंदे सेना -भाजपा युतीने लातूरमध्ये लाभापेक्षा तापच अधिक
लोकसत्ता ग्राफिक्स टीम

प्रदीप नणंदकर

लातूर : शिवसेनेचा एकनाथ शिंदे गट व भाजपा यांची ग्रामपंचायत पासून सर्व निवडणुकात युती राहणार असल्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. या नव्या युतीचा लाभ होण्याऐवजी तापच अधिक होईल अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

लातूर जिल्ह्यात शिवसेनेचे अस्तित्व जवळपास नगण्यच आहे. १३ वर्षांपूर्वी औसा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे दिनकर माने हे विजयी झाले होते. त्यांचा पराभव झाल्यानंतर शिवसेनेचे जिल्ह्यातील अस्तित्वच कमी झाले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत लातूर ग्रामीण मतदार संघ ऐनवेळी शिवसेनेला देण्यात आला व औसा विधानसभा मतदारसंघ भाजपने घेतला. भाजपला याचा लाभ औशात झाला मात्र लातूर ग्रामीण मधील शिवसेनेच्या उमेदवाराची अनामत रक्कम जप्त झाली. लातूर जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. पूर्वीच्या शिवसेनेच्या सोबत औसा विधानसभा ही एकमेव जागा शिवसेनेकडे होती उर्वरित पाच ठिकाणी भाजपा निवडणूक लढवत असे.

हेही वाचा: रुपाली चाकणकर : आश्वासक नेतृत्व

भाजपा शिवसेनेने स्वबळावर जेव्हा २०१४ची निवडणूक लढवली तेव्हा लातूर शहरासह सर्व ठिकाणी भाजपने उमेदवार उभे केले होते. शिवसेनेच्या उमेदवारांची दखल घ्यावी अशी मते मिळालेली नव्हती. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा ,लोकसभा कोठेही शिवसेनेला दखलपात्र मते मिळाले नाहीत. आता शिवसेनेचे दोन गट झाले व शिवसेना, जनता दल ,भाजपा ,शिवसेना व आता एकनाथ शिंदेच्या सेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून काम करणारे ॲड. बळवंत जाधव यांनी पदभार स्वीकारल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपण संपूर्ण ताकतीने सर्व निवडणुका लढवणार असल्याचे घोषित केले. शिवसेनेची पूर्वी जशी ताकद होती तशी ताकद आपण उभी करणार असल्याचे जाधव यांचे म्हणणे आहे. ग्रामपंचायत निवडणुकीपासून सर्व निवडणुका शिवसेना शिंदे गट ताकतीने लढवणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ग्रामपंचायत निवडणुका ह्या बहुतांश गाव पातळीच्या राजकारणावर असतात पक्षीय राजकारण फारसे नसते त्यामुळे या निवडणुकीत फारसे मतभेद असणार नाहीत.

हेही वाचा: समृद्धी महामार्गाचा पाहणी दौरा: उपमुख्यमंत्र्यांनी चालवलेल्या वाहनाच्या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राच्या वादानंतर झटपट नूतनीकरण

मात्र पंचायत समिती ,जिल्हा परिषद ,महानगरपालिका, नगरपरिषद या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला किती जागा द्यायच्या हा वादाचा विषय होऊ शकतो .भाजपने जिल्ह्यात आपली ताकद उभी केली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका यात स्वबळावर सत्ता स्थापन केली आहे. आता शिंदे गटाला नव्याने वाटा द्यावा लागणार आहे, तो वाटा अव्वाच्या सव्वा मागितला तर नवे प्रश्न निर्माण होणार आहेत व हे प्रश्न आता सुटू शकले नाहीत तर विधानसभा व लोकसभा निवडणुकीला ही अडचण निर्माण होऊ शकते. त्यातही प्रामुख्याने लातूर शहर विधानसभा मतदारसंघात भाजपकडे योग्य उमेदवार नाही. आत्तापर्यंत ही जागा काँग्रेसला बाय दिल्यासारखीच भाजपची भूमिका राहिली आहे. त्यामुळे लातूर शहर विधानसभा मतदारसंघावर शिवसेना शिंदे गट नव्याने दावा करेल. ग्रामीण भागात आमचे काम आहे असे म्हणत लातूर ग्रामीणवरही ते दावा करू शकतात कारण मागील विधानसभा निवडणुकीत ही जागा शिवसेनेकडे दिली होती.

भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड हे लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यांच्या इच्छेला मान द्यायचा तर लातूर ग्रामीण ऐवजी लातूर शहर हा एक तरी विधानसभा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाला सोडावा लागेल. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख ॲड. बळवंत जाधव यांची विधानसभा निवडणूक लढवण्याची सुप्त इच्छा अपुरी राहिली आहे .असे झाले तर त्यांची ही इच्छा पूर्ण होईल, मात्र शहर भाजपातील मंडळी याकडे कसे बघतील हाही प्रश्न आहे. केवळ एक जागा दिल्यामुळे शिवसेना शिंदे गट समजुतीची भूमिका घेणार का, हाही प्रश्न निर्माण होणार आहे.

हेही वाचा: राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाणांवर विसंबून राहणे शिवसेनेला भोवले

विधानसभा निवडणुकांना आणखीन वेळ असला तरी पंचायत समिती, जिल्हा परिषद,नगरपंचायत, नगरपालिका व महापालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाबरोबर युती करायची असेल तर जागा द्याव्या लागतील व तो वाद कसा सोडवला जातो यावर युतीचे भवितव्य अवलंबून आहे. आधीच भाजपात अनेक गट आहेत, आता नव्याने शिवसेना शिंदे गटाच्या सोबत चर्चा करण्याची अडचण निर्माण होणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 11:04 IST
Next Story
रुपाली चाकणकर : आश्वासक नेतृत्व