नागपूर : राजकारणात परिस्थितीनुसार नेत्यांची ओळख बदलत जाते. कार्यकर्तानंतर नेता म्हणून ओळखला जातो, नेता मंत्री झाल्यावर त्याला त्याच्या खात्याची ओळख मिळते, तुम्ही जार संघटनेत काम करीत असाल तर कालांतराने कुशल संघटक ही ओळख मिळते. वेगवेगळ्या पातळीवर ती विकसीत होत जााते. कधी ती तारक ठरते तर कधी मारक. भाजप नेते राज्याचे महसूल मंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा राजकीय प्रवासही अशाच अनेक ओळखींचा आहे. ओडिशामध्ये नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत त्यांनी पक्ष निरीक्षक म्हणून बजावलेल्या कामगिरीमुळे भाजपला एक जागा अधिक जिंकता आली. त्यामुळे त्यांना “कुटनीतीकार’ अशी नवी ओळख मिळाली. आहे. ती त्याच्यासाठी तारक ठरते की मारक हे पाहणे उत्सूकतेचे ठरणार आहे.

२०१४ पूर्वीपर्यंत बावनकुळे यांचे राजकारण हे त्यांच्या कामठी विधानसभा मतदारसंघापुरतेच मर्यादित होते. जिल्ह्याचे नेते अशीच त्यांची ओळख होती. पण नंतरच्या एक दशकाच्या काळात ते जिल्ह्याचे नव्हे तर राज्यातील भाजपच्या प्रमुख नेत्यांपैकी एकनेते म्हणून ओळखले जाऊ लागले. केद्रीय नेतृत्वाने त्यांची नियुक्ती ओडिशाचे निरीक्षक म्हणून केल्यावर तर त्यांच्या राजकारणाची व्याप्ती अधिक विस्तारली गेली.हे सांगायचे कारण असे की बावनकुळे यांना त्यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळी ओळख मिळत गेली. त्याचे संधीत रुपांतर करत त्यांनी पुढचा प्रवास केला.

वेगवेगळ्या टप्प्यावर वेगळी ओळख

नागपूर जिल्हा परिषदेत आक्रमक विरोधी पक्षनेता, काम करणारा आमदार, धडाडीचा मंत्री, पक्षाचा ओबीसी चेहरा, मेहनती प्रदेशाध्यक्ष,आणि आता कार्यक्षम महसूल मंत्री म्हणून त्यांची ओळख आहे. प्रत्येक टप्प्यावर मिळत गेलेल्या ओळखीचे त्यांनी नव्या संधीत रुपांतर केले. जि.प. सदस्य असताना आक्रमक भूमिका बजावल्याने त्यांचे नाव झाले, त्याचा फायदा त्यांना कामठीचे आमदार होण्यास झाला. कार्यक्षमआमदार म्हणून मिळालेली ओळख त्यांना २०१४ मध्ये भाजपची सत्ता आल्यावर मंत्री होण्यासाठी कामी आली. २०१४ ते२०१९ या काळात कार्यक्षम मंत्री म्हणून त्यांनी छाप सोडली. पण यावेळी त्याचा अंदाज चुकला. कार्यक्षम मंत्री ही ओळख त्यांच्या कारकीर्दीला ब्रेक लावणारी ठरली. २०१९ मध्ये पक्षाने त्यांना विधानसभेचे तिकीट नाकारले जाणे हा त्यांच्या कारकिर्दीतील कठीण टप्पा होता, पण त्यांनी त्यातून पुनरागमन केले. यातून त्यांनी संघर्षशील, निष्ठावान नेता अशी ओळख मिळाली.

ओबीसी चेहरा

राज्यात ओबीसी आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला, ओबीसी ही भाजपचा मतदार हे ओळखून त्यांनी स्वत:ला पक्षाचा ओबीसी चेहरा म्हणून पुढे केले. त्याच ते यशस्वी झाले. ही त्यांची आणखी एक ओळख होती. त्यामुळेच त्यांना पक्षाने प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. यानिमित्ताने त्यांनी संपूर्ण राज्यात दौरे केले. पायाला भिंगरी बांधणारा प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची ओळख झाली. २०२४ मध्ये लोकसभा निवडणुका त्यांच्याच नेतृत्वाखाली पक्ष लढला. पण महाराष्ट्रात पक्षाला अपयश आले. पण विधानसभा निवडणुकीत पक्ष सत्तेत येताच त्यांना त्यांच्या परिश्रमाचे फळ मंत्रिपदाच्या रुपात मिळाले. अत्यंत महत्वाचे मानले जाणारे महसूल खाते त्यांना देण्यात आले. या खात्यात वर्षभरात त्यांनी लावलेला निर्णयाचा धडाका लक्षात घेता त्यांची एक कार्यक्षम मंत्री म्हणून ओळख निर्माण झाली.

नवी ओळख अन् आव्हाने

पक्षाने दिलेली कामगिरी चोखपणे पार पाडणे हा बावनकुळेचा हतखंडा. त्यामुळे राज्यात ते मुख्यमंत्र्यांचे तर केंद्रात केंद्रीय गृहमंत्र्याचे विश्वसून अशी त्यांची पक्षात ओळख आहेच. याच कारणामुळे वैदर्भीय बावनकुळे यांना राज्यसभेच्या निवडणुकीसाठी थेट ओडिशा राज्याचे निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आली. तेथेही त्यांनी झेंडा फडकावला. भाजपकडे दोन जागा जिंकण्या इतकेच संख्याबळ असताना पक्षाने तीन जागा जिंकल्या. बावनकुळे यांची कुटनीती यशस्वी, अशा बातम्या झळकल्या. कुटनीतीकार ही त्यांना आणखी एक नवी ओळख मिळाली. भाजपमध्ये ‘कुटनीतीकार’ हे विशेषण प्रामुख्याने केंद्रीय मंत्री अमित शाह आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्याशी जोडले जाते. या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांच्यासाठी ही नवी ओळखफायदेशीर ठरेल की भविष्यात अडचणी निर्माण करेल? असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. कारण भाजपमध्ये राजकीय परिस्थिती कधीही बदलू शकते याचा अनुभव बावनकुळे यानांच २०१९ मध्ये आला आहे हे येथे उल्लेखनीय.