नागपूर: नागपूर जिल्ह्यातील कामठी विधानसभा मतदारसंघाचे आमदार, विद्यमान महसूल मंत्री व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंगळवारी त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदाची सुत्रे नवनिर्वाचित अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचेकडे सोपवणार आहेत. दोन वर्ष अकरा महिने विदर्भातील बावनकुळे यांनी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. पायाला भिंगरी लावल्यागत संपूर्ण राज्य पालथे घालणा-या नेत्यांपैकी ते एक ठरले. त्यांच्या कारकिर्दीत पक्षाचा लोकसभेत झालेला पराभव होणे ही वाईट तर विधानसभेत पक्षाला नेत्रदीपक यश मिळणे ही सर्वोत्तम बाब ठरली.
वैदर्भीय नेत्यांमध्ये संघटन कौशल्याचा अभाव असतो. पाय ओढण्याची वृत्ती अधिक असते. बावनकुळे यांनी हा समज त्यांच्या कामातून खोटा ठरवला. त्यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली त्यावेळी परिस्थिती त्यांना अनुकूल नव्हती. २०१९ मध्ये मंत्री असताना त्याचे विधानसभेचे तिकीट कापण्यात आले तेंव्हा बावनकुळे यांची राजकीय कारकीर्द संपली असाच अंदाज राजकीय वर्तुळात बांधला जात होता. राज्यात भाजप सत्तेबाहेर होता. त्यामुळे बावनकुळेंची राजकीय पुनर्वसन अवघड होते. अशा परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा वाद ऐरणीवर आला अन् हीच बाब बावनकुळेंच्या पत्थ्यावर पडली.
विदर्भात बहुसंख्येने असलेला बहुजन समाज आणि त्यात लक्षणीय वाटा असलेल्या तेली समाजाचे बावनकुळे प्रतिनिधित्व करीत असल्याने भाजपने बावनकुळेंच्या रुपात ओबीसी प्रदेशाध्यक्ष दिला. १२ ऑगस्ट २०२२ मध्ये त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली तेंव्हा पासून आजपर्यंत बावनकुळे यांनी मागे वळून बघितले नाही. या दरम्यान राज्यात विधानसभेच्या पोटनिवडणुका, शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात निवडणुका झाल्या, यात भाजपला अपेक्षित यश मिळवता आले नाही. भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा राज्यात पराभव झाला.
भाजपचा बालेकिल्ला गणल्या जाणा-या विदर्भात भाजपची पिच्छेहाट झाली. खुद्द बावनकुळे यांचा कामठी मतदारसंघ ज्या रामटेक लोकसभा मतदारसंघात येतो तेथे महायुती पराभूत झाली होती. एकूणच ही निवडणूक बावनकुळे यांची परीक्षा पाहणारी ठरली. पण त्यांच्या प्रयत्नांवर कोणी शंका घेतली नाही. लोकसभेतील पराभव पचवून बावनकुळे यांनी नव्या दमाने संपूर्ण महाराष्ट्रात पिंजून काढला. गाव, तालुका, जिल्हा, विभागाला भेटी दिल्या. पायाला भिंगरी लागल्यागत ते पक्षाच्या कामासाठी फिरले.
अन्य पक्षाच्या नेत्यांना भाजपमध्ये आणले. भाजपची संघटनात्मक निवडणुकीचे शिवधनुष्य त्यांनी उत्तमपणे पार पाडले. विधानसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या यशात त्यांचाही वाटा आहे. महायुती सरकारमध्ये त्यांना महसूल सारखे अत्यंत महत्त्वाचे खाते देऊन पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवला. जिल्ह्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे दिग्गज नेत्यांशी उत्तम समन्वय साधून त्यांनी वाटचाल केली.