नागपूर : महाराष्ट्राच्या राजकारणात एखादा व्हिडिओ व्हायरल होणे ही आता नवी बाब राहिलेली नाही; मात्र त्यामागील राजकीय संदर्भ जाणून घेतले तर तो प्रसारित करण्यामागच्या हेतूचा उलगडा होतो. भाजपचे ओबीसी नेते, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संदर्भातील व्हायरल व्हीडीओचा वादही त्याला अपवाद नाही. बावनकुळे यांच्याकडे हजारो एकर जमीन आहे, असा दावा व्हीडीओत करण्यात आला होता तर हा दावा कसा खोटा आहे हे बानकुळे यांनी सांगितले वरकरणी हे प्रकरण एक “आरोप विरुद्ध खुलासा” इतकेच वाटत असले तरी त्यामागील राजकारणाचा कानोसा घेतला तरयावर भाजपमधील ओबीसी विरुद्ध मराठा या वादाची छाया असल्याचे दिसून येते.
राज्यात नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्या राजकीय कनेक्शनची जोरात चर्चा सुरू असतानाच अचानक एक व्हीडीओ व्हायरल होतो, त्यात एक व्यक्ती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कुटुंबीयांच्या नावे ११४७ एकर जमीन असल्याचा दावा करतो. त्यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडते. बावनकुळे यांच्याकडून याबाबत खुलासा केला जातो. त्यांच्याकडे केवळ २८.४४ एकर जमीन असल्याचे तहसीलदाराच्या प्रमाणपत्राच्या आधारे सांगितले जाते. या प्रकरणी बदनामी केल्याप्रकरणी बावनकुळे यांच्या तक्रारीवरून कोराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होतो. पोलीस तपासात हा व्हीडीओ व्हायरल करणारा संभाजीनगरमधला असल्याचे निष्पन्न होते. त्यामुळे हा राजकीय षडयंत्राचा भाग आहे का? या अनुषंगानेही या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू आहे. त्यातून सत्य बाहेर येईल. पण बावनकुळे यांच्या विरोधात अचानक व्हायरल झालेल्या व्हीडीओची भाजपच्या वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. या माध्यमातून कोणीतरी बावनकुळे यांना राजकीयदृष्ट्या अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहे का? सरकारमधील एका महत्वाच्या खात्याच्या मंत्र्यावर आरोप करण्याचे परिणाम काय होऊ शकतात याची कल्पना ते करणाऱ्याला नसावी का ? जर असेल तर ते करायला लावण्यामागे राजकीय शक्तीचा हात आहे का ? असे अनेक प्रश्न या निमित्ताने विचारले जात आहेत. व्हीडीओ व्हायरल करणाऱ्याचा उगम मराठवाड्यातील संभाजीनगर मध्ये सापडल्याने तर या चर्चेची दिशा वेगळ्या वळणावर गेली आहे
पक्षांतर्गत संघर्षातून बानकुळे लक्ष्य ?
राजकारणातील संघर्ष हा केवळ सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये मर्यादित नसतो; उलट पक्षांतर्गत स्पर्धा अनेकदा अधिक तीव्र असते. विशेषतः एखादा नेता झपाट्याने पुढे येत असेल, संघटन आणि सत्ताकेंद्र या दोन्ही स्तरांवर आपली पकड मजबूत करत असेल, तर त्याच्याविरोधात अनेक विरोधक निर्माण होतात . बावनकुळे यांच्या बाबतीतही हेच चित्र दिसून येते. मागील एक दशकाच्या काळात ते राज्याच्या राजकीय पटलावर एक प्रमुख नेते म्हणून उदयास आले आहेत. धडाडीचा कार्यकर्ता, संपूर्ण महाराष्ट्र पालथा घालणारा प्रदेशाध्यक्ष, आणि कार्यक्षम मंत्री म्हणून त्यांनी संघटना आणि सरकार या दोन्ही पातळीवरील छाप सोडली. ओडिशामध्ये नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी बावनकुळे यांची पक्षाने निरीक्षक म्हणून नियुक्ती केली होती. या निवडणुकीतही त्यांनी राजकीय चणाक्षपणा दाखवत पक्षाला एक अतिरिक्त जागा मिळवून दिली होती. त्यामुळे ते केंद्रीय नेतृत्वाच्या अदिक जवळ गेले होते. पक्षातील अनेक जुन्या नेत्यांना ही बाब खटकण्याची शक्यता आहे. राजकारणात झपाट्याने होणारी प्रगती ही अनेकदा पुढील राजकीय वाटचालीत अडसर ठरते. बावनकुळे यांच्यावर विविध माध्यमातून होणाऱ्या आरोपाकडे याच अनुषंगाने बघितले जात आहे.
मराठा विरुद्ध ओबीसी वाद ?
बावनकुळे यांच्याबाबत व्हायरल व्हीडीओमागे पक्षातील ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद असल्याचे सांगितले जाते. बावनकुळे पक्षाचे ओबीसी नेते आहेत. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बावनकुळे यांनी पुणे विभागातील महसूल खात्यातील आजवरचा सर्वात मोठ जमीन घोटाळा उघडकीस आणून चौकशीचे आदेश दिले होते. यामुळे विरोधी पक्षातील नेत्यांनी त्यांचे कौतूक केले असले तरी या निर्णयामुळे जमीन व्यवराशी संबंधित अधिकारी आणि त्यांच्यावर वरदहस्तअसलेली मराठा लाॅबी नाराज झाली. ही लाॅबी मराठवाड्यातही सक्रिय आहे. आणि बावनकुळे यांचा व्हीडीओ व्हायरल करणाराही संभाजीनगरचा आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक संरचनेत मराठा आणि ओबीसी या दोन घटकांमधील तणाव गेल्या काही वर्षांत प्रकर्षाने समोर आला आहे. सत्तेतील प्रतिनिधित्वाने त्याला राजकीय रूप दिले. परंपरागतपणे सत्तेच्या केंद्रस्थानी राहिलेल्या मराठा नेतृत्वासमोर आता ओबीसी नेतृत्व अधिक संघटितपणे पुढे येऊ लागले. ही पार्श्वभूमी लक्षात घेतल्यास बावनकुळे यांच्यावरील आरोप हे सत्तासमीकरणांच्या संघर्षाचा एक भाग असल्याचेही मानले जात आहे.
प्रादेशिक राजकारण
भाजपच्या वर्तुळात या प्रकरणाकडे पक्षातील प्रादेशिक वादाच्या अनुषंगानेही बघितले जात आहे. सध्या राज्याच्या राजकारणात विदर्भातील नेत्यांचा प्रभाव अधिक आहे. मुख्यमंत्री नागपूरचे असणे हे त्यामागचे प्रमुख कारण. दुसरीकडे महसूल हे महत्वाचे खाते बावनकुळे यांच्या रुपात विदर्भाकडेच आहे. याउलट, संभाजीनगर आणि मराठवाडा परिसरात पारंपरिक सामाजिक समीकरणे अद्याप प्रभावी आहेत. त्यामुळे प्रादेशिक वादही अशा घटनांमधून डोकावतो. महसूल खात्यावर चा जमीन व्यवहार, प्रशासकीय निर्णय आणि स्थानिक सत्ताकेंद्रे यांचा घनिष्ठ संबंध असतो. यात क्षेत्रात हस्तक्षेप केल्यास अनेक हितसंबंधांना धक्का बसू शकतो. बावनकुळे यांनी काही जमीन व्यवहारांवर कारवाई सुरू केल्याची पार्श्वभूमी लक्षात घेतल्यास त्यांच्या विरोधातील मोहिमेला केवळ राजकीय नव्हे तर आर्थिक हितसंबंधांचीही जोड असण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकूणच या प्रकरणामुळे भाजपमधील सत्तासंघर्ष, प्रादेशिक वाद आणि ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष उघड झालेला आहे.
