अविनाश कवठेकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये पुण्याच्या कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले चंद्रकांत पाटील यांना मंत्रीपद मिळालेले असले तरी पुणेकरांना चंद्रकांत पाटील हे कायमच ‘बाहेर’चे वाटत आले आहेत. पुणे शहरातील भारतीय जनता पक्षाचा एक गट अद्यापही पाटील यांना आपले मानत नाही तर भाजप विरोधी राजकीय पक्षांकडूनही पाटील ‘बाहेरचे’च असल्याची टीका सातत्याने केली जात आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्या रूपाने पुण्याला मंत्रीपद मिळालेले असले तरी त्यांना पुणेकर म्हणून स्वीकारले जाणार का, हा प्रश्नच आहे. चंद्रकांत पाटील यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल, अशी चर्चा पहिल्यापासूनच होती. चंद्रकांत पाटील भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असून भारतीय जनता पक्षाचे नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे निकटवर्तीय असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा- भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन

त्यानुसार अपेक्षेप्रमाणे चंद्रकांत पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले असले तरी चंद्रकांत पाटील यांच्यापुढे ‘पुणेकर’ होण्याचे आव्हान असणार आहे. शिक्षक मतदारसंघातून चंद्रकांत पाटील विधानपरिषदेत आमदार म्हणून निवडून आले. प्रत्यक्ष लोकांतून निवडून येण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर त्यांना त्यांचा कोल्हापूर मतदारसंघ सुरक्षित वाटला नाही. त्यामुळेच भाजपच्या सर्वाधिक सुरक्षित असलेल्या कोथरूड मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली. त्यावरून भाजपमध्येही नाराजी उफाळून आली होती. सन २०१४ मध्ये भाजप-शिवसेना युती तुटल्यानंतर या मतदारसंघातून माजी आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी विजय प्राप्त केला. मात्र सन २०१९ च्या निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांच्यासाठी त्यांना मतदारसंघ सोडावा लागला, त्यामुळे त्या नाराज होत्या. या मतदारसंघातून माजी महापौर मुरलीधर मोहोळही निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. सुरक्षित मतदारसंघ असूनही या मतदार संघातून चंद्रकांत पाटील यांना सर्वाधिक मतांनी विजय प्राप्त करता आला नव्हता.

दवीधर मतदारसंघातून दोन वेळा विधान परिषदेवर निवडून गेलेल्या पाटील यांना यापूर्वीच्या भाजप-सेना युती सरकारमध्ये महसूल मंत्रीपद मिळाले. राज्यातील रस्त्यांचा प्रश्न चुटकीसरशी सोडवू, असे विधान करणाऱ्या पाटील यांना तो प्रश्न काही अंशानेही सोडवता आला नाही. कोथरूड विधानसभा मतदारसंघातून आमदार झाल्यानंतरही त्यांना पुणेकर नसल्याच्या टीकेला सामोरे जावे लागले होते. पुणेकरांच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रश्नही त्यांना योग्य पद्धतीने हाताळता आले नाहीत. चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा कोल्हापूरला जावे, अशी टीका विरोधी पक्षांकडून करण्यात आली. भारतीय जनता पक्षातील एका गटातही अशीच चर्चा आहे. त्यामुळे पुण्याचे नेतृत्व चंद्रकांत पाटील यांच्याकडे आल्यानंतरही त्यांचे नेतृत्व या गटाने स्वीकारलेले नाही.

हेही वाचा- वादाच्या रिंगणातील मंत्रीपद

विशेष म्हणजे आगामी महापालिका निवडणूक खासदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखालीच लढविली जाईल, असा दावा पक्षातील जुन्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून केला जात होता. ‘बाहेर’चा अशी टीका होत असल्याने चंद्रकांत पाटील यांनीही शहराचे नेतृत्व बापट यांच्याकडेच असल्याचे सातत्याने बोलून दाखविले होते. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांना मंत्रीपद मिळालेले असले तरी पुणेकर त्यांना पुण्याचे मंत्री म्हणून स्वीकारणार का, हा प्रश्नच आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrkant patil is always outsider for original punekars print politics news pkd
First published on: 09-08-2022 at 16:32 IST