अल्पसंख्याकमंत्री अब्दुल सत्तार हे कधी कोणाबरोबर सूत जुळवतील हे सांगता येत नाही. शिवसेनेबरोबरच्या प्रासंगिक कराराच्या वक्तव्यानंतर त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन केले. एवढे दिवस रावसाहेब दानवेंबरोबर जुळवून घेणारे मंत्री सत्तार आता कल्याण काळेंबरोबर जुळवून घेत आहेत. कल्याण काळे यांनीही सत्तार यांची मैत्री जणू स्वीकारली. नुकतेच ते म्हणाले, ‘सिल्लोडच्या कार्यकर्त्यांनी मला मदत केली. पण त्यांना मदत करायला कोणी सांगितली हे मला माहीत नाही.’ काळे यांच्या वक्तव्यामुळे सत्तार-काळे मैत्र पर्व सुरू झाल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. रावसाहेब मात्र चिडलेत म्हणे. वेगळीच भीती लोकसभा निवडणुकीतील यशाने काँग्रेसच्या गोटात साहजिकच उत्साहाचे वातावरण पसरले आहे. निवडणुकीची तयारीही सुरू झाली आहे. येत्या २० ऑगस्टला पक्षाध्यक्ष खरगे आणि राहुल गांधी यांच्या उपस्थितीत प्रचाराचा नारळ वाढविला जाणार आहे. जागावाटपाच्या वाटाघाटींसाठी दोन समित्याही स्थापन करण्यात आल्या. वातावरण काँग्रेसला अनुकूल असल्याने महाविकास आघाडीतील जागावाटपात चांगले प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे, अशी नेतेमंडळींची अपेक्षा असणे स्वाभाविक. पण सर्वच नेत्यांना दिल्लीची भीती. लोकसभा निवडणुकीत सांगलीत विशाल पाटील निवडून येतील हे सारेच सांगत होते, पण सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गटाने स्वत:च्या पदरात पाडून घेतली. शिवसेना नेतृत्वाने दिल्लीत संपर्क साधला आणि सांगलीच्या जागेवर काँग्रेसला पाणी सोडावे लागले. सांगलीची जागा प्रतिष्ठेच्या केलेल्या शिवसेनेला अनामतही वाचविता आली नाही हे वेगळे. पण विधानसभा निवडणुकीत सांगलीची पुनरावृत्ती होणार नाही याची काँग्रेस नेत्यांनाही खात्री नाही. जागावाटपाच्या चर्चेत आपण एकेका जागेसाठी ताणून धरायचे आणि शरद पवार किंवा उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत संपर्क साधल्यावर नमते घेण्याचा निरोप येणार याची जागावाटपाच्या वाटाघाटींसाठी नेमलेल्या समितीमधील नेत्यांमध्ये धाकधूक आहेच. हेही वाचा >>> निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार, राज ठाकरे यांच्या यात्रा तर उद्धव ठाकरे यांचे मेळावे दोन डगरींवर कोण? विधानसभा निवडणुकीची सर्वच राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झाली असून यानिमित्ताने काही राजकीय पक्षांनी सर्व्हे सुरू केले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून जिल्हा परिषद, पंचायत समितीसह नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नसल्याने अनेकांना आता थेट आमदारपदाचीच स्वप्ने पडू लागली आहेत. यासाठीची प्राथमिक तयारी पूर्ण झाली असून पक्षाची अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर झाली की पहिल्या यादीतच आपले नाव असल्याचे काही इच्छुक सांगत आहेत. कार्यकर्त्यांसाठी रविवारी आखाडीही साग्रसंगीत साजरी करण्यास अर्थपुरवठाही एका तालुक्यातील नेत्याने आवर्जून केला. पोटात आकाबाई गेली की माणूस खरे बोलतो म्हणतात, यामुळे एका कार्यकर्त्यांने नेत्याला सुनावलंच, साहेब, दोन डगरींवर हात ठेवून वागणाऱ्याचा कपाळमोक्ष कधी होईल हे सांगता येत नाही. आता हे नेत्याला उद्देशून होते की कार्यकर्त्यांना हे मात्र गुलदस्त्यातच राहिलं. कारण तोपर्यंत मटणाचा रस्सा, सुक्कं समोर आलं होतं. कोण कोणाचे लाड पुरविणार? निवडणुका जवळ येऊ लागतात तसा नगरमधील विद्यामान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे व माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात या दोन नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोप, आव्हान-प्रतिआव्हानांचा कलगीतुरा दिवसेंदिवस अधिकच रंगू लागला आहे. राज्यातील सत्तांतरानंतर महसूलमंत्रीपदावरून थोरात पायउतार झाले व हे पद त्यांचेच परंपरागत विरोधक, महायुतीमधील विखे यांच्याकडे आले. त्या वेळी असाच दोन नेत्यांमधील वाळू तस्करीच्या कारवाईवरून कलगीतुरा रंगला होता. आता दोन्ही नेते परस्परांच्या मतदारसंघात जाऊन थेट आव्हान देऊ लागले आहेत. नगर लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर मंत्री विखे यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे यांनी संगमनेर व राहुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे सांगितले. संगमनेर हा थोरात यांचा मतदारसंघ. थोरात यांनी लगेच मंत्री विखे यांना, मुलाचे लाड पुरवाच असे आव्हान दिले. त्यावर विखे यांनी मुलाचे लाड पुरवण्यास आम्ही समर्थ आहोत, असे प्रत्युत्तर दिले. आता राज्यातील तलाठी भरती कशी पारदर्शी ठरली व या भरतीत कसा भ्रष्टाचार झाला आहे, असे दावे करत या दोन्ही नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोपांचा नवा अंक सुरू झाला आहे.