माजी केंद्रीय अर्थमंत्री पी.चिदंबरम यांच्या घरावर आणि इतर मालमत्तेवर असे एकाच वेळी नऊ ठिकाणी छापे मारण्यात आले. सीबीआयने चिदंबरम यांच्या घराची झडती घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी चिदंबरम ट्विटरवर व्यक्त झाले आहेत. चिदंबरम यांनी सांगितले की सीबीआयच्या शोध पथकाला काहीही सापडले नाही आणि काहीही जप्त करण्यात आले नाही. यासोबतच त्यांनी धाडींच्या वेळेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पी.चिदंबम यांचे चिरंजीव कार्ती चिदंबरम यांच्याशी संबंधित एका प्रकरणात ह्या धाडी टाकण्यात आल्या आहेत. कार्ती चिदंबरम यांनीसुद्धा यावर एक ट्विट करत सीबीआयला खोचक टोला लगावला आहे. 

ट्विटरवर चिदंबरम नक्की काय म्हणाले ?

“आज सकाळी सीबीआयच्या पथकाने चेन्नई येथील माझ्या निवासस्थानाची आणि दिल्लीतील माझ्या अधिकृत निवासस्थानाची झडती घेतली. या पथकाने मला एक एफआयआर दाखवली ज्यामध्ये माझे नाव आरोपी म्हणून कुठेच नव्हते. शोध पथकाला काहीच सापडले नाही आणि काहीच जप्त केले नाही. शोधाची वेळ मनोरंजक आहे हे मी सूचित करू इच्छितो”.

यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, चिदंबरम हे देशभक्त आहेत. त्यांची देशाशी असलेली बांधिलकी निर्विवाद आहे. ” सीबीआयने माजी अर्थमंत्र्यांवर बिनबुडाचे आरोप लावणे हे राजकीय दिवाळखोरीचे लक्षण आहे. यावर काँग्रेसचे सरचिटणीस अजय माकन म्हणाले की पक्ष चिदंबरम यांच्या पाठीशी उभा आहे. या धाडसत्रांचा मूळ उद्देश हा त्यांना त्रास देणे हाच आहे. १२ वर्षांपूर्वी ते गृहमंत्री होते. आता १२ वर्षांनंतर या गोष्टी का समोर येत आहेत ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. 

दरम्यान, या विषयावर पी चिदंबरम यांचे चिरंजीव कार्ती चिदंबरम यांनीसुद्धा या धाडींबाबत एक खोचक ट्विट करत टोला हाणला आहे.

कार्ती चिदंबरम यांचे छापेमारी संदर्भात ट्विट

” खूप वेळा छापे मारल्यानंतर सीबीआयला हे नक्की समजलं असेल की चिदंबरम यांच्याकडे धोतराचे किती जोड आहेत”

मिळालेल्या माहितीनुसार कार्ती चिदंबरम हे सध्या घरी नाहीत. ते लंडनला आहेत. सीबीआयने काही दिवसांपूर्वीच कार्ती यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण २०१० ते २०१४ च्या दरम्यानचे आहे. परदेशात पैसे पाठण्याचा आरोप कार्ती यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याबाबत प्राथमिक चौकशी करून सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.