चंद्रपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘रोड शो’च्या माध्यमातून माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर व आमदार किशोर जोरगेवार या भाजप नेत्यांना एकत्र आणण्यात यश आले खरे, मात्र उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष म्हणून महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतलेल्या बंडखोरांनी भाजपच्या सत्ताप्राप्तीच्या मार्गात अडथळे निर्माण केले आहेत.

जिल्हा भाजपमध्ये पहिल्यांदाच प्रथमच टोकाची गटबाजी दिसून येत आहे. महापालिका निवडणुकीत मुनगंटीवार, अहीर आणि जोरगेवार यांच्यात एकमेकांचे उमेदवार नाकारण्याची जणू स्पर्धाच लागली होती. यामुळे प्रदेशाध्यक्षांनी तीनही नेत्यांच्या संमतीने ५७ उमेदवारांची यादी जाहीर केली. मात्र या यादीतील १७ नावे आमदार जोरगेवार व तत्कालीन महानगर जिल्हाध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांनी परस्पर बदलली. परिणामी, कासनगोट्टूवार यांची हकालपट्टी करण्यात आली. या प्रकारामुळे भाजपत इतका गोंधळ उडाला की, नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते संभ्रमित झाले. पक्षातील वातावरण गढूळ झाले.

नेत्यांमध्ये सुसंवाद व्हावा आणि निवडणुकीला सर्वांनी एकत्रित सामोरे जावे, यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी चंद्रपुरात माता महाकालीचे दर्शन घेवून भाजपच्या प्रचाराचा नारळ फोडला. ‘रोड शो’च्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी वातावरण निर्मिती केली. जनतेचा विशेषत: महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद याला मिळाला. यानिमित्ताने मुनगंटीवार-अहीर-जोरगेवार एका मंचावर आले. भाजपत मतभेद असले तरी मनभेद नाही, सर्व नेते एकत्र आहेत, असा संदेश देण्यात मुख्यमंत्री यशस्वी झाले.

मात्र, भाजपची खरी अडचण केली ती बंडखोरांनी. प्रदेशाध्यक्षांच्या यादीत समावेश असलेल्या, मात्र उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांनी बंडाचा झेंडा फडकवत अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. बंडखोरांची मनधरणी करण्याचे भाजपकडून प्रयत्न झाले, मात्र आता थांबायचे नाहीच, अशी भूमिका घेत या बंडखोरांनी भाजपच्या उमेदवारांसमोर कडवे आव्हान उभे केले आहे. यामुळे भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

बंगाली कॅम्प प्रभागात अजय सरकार, एमईएल प्रभागात पुजा पोतराजे, तर वडगाव प्रभागात रवी जोगी यांनी भाजप उमेदवारांसमोर तगडे आवाहन उभे केले आहे. तुकूम प्रभागात माजी नगरसेविका शिला चव्हाण, सुनील डोंगरे, विठ्ठल मंदिर प्रभागात विशाल निंबाळकर, बालू कोतपल्लीवार यांनी भाजप उमेदवारांना चांगलाच घाम फोडला आहे. हे अडथळे पार करूनच भाजपला समोर जावे लागणार आहे.