BJP Kirtikumar Bhangdiya vs Congress Satish Warjurkar in Chimur Vidhan Sabha Constituency चंद्रपूर : चिमूर क्रांतिभूमीत २०१९ च्या विधानसभा निवडणुकीप्रमाणे यंदाही भाजपचे आमदार कीर्तीकुमार ऊर्फ बंटी भांगडिया विरुद्ध काँग्रेसचे डॉ. सतीश वारजूकर यांच्यात थेट लढत होणार आहे. येथे माना समाजाच्या मतदारांची निर्णायक भूमिका राहणार आहे.
आधी काँग्रेसचे वर्चस्व असलेला चिमूर मतदारसंघ २०१४ पासून भांगडिया यांच्या ताब्यात आहे. ते सलग तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत, तर डॉ. सतीश वारजुकर सलग दुसऱ्यांदा लढणार आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भांगडिया यांनी डॉ. वारजुकर यांचा दहा हजार मतांनी पराभव केला होता. मात्र यावेळी परिस्थिती बदललेली दिसते आहे. आमदार भांगडिया यांच्याबाबत मतदारांमध्ये काहीसा नाराजीचा सूर बघायला मिळत आहे. त्याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे. वारजुकर या एकाच कुटुंबात सातत्याने उमेदवारी दिली जात असल्याने काँग्रेसमधील एक गट नाराज आहे. हा नाराज गट नेहमीप्रमाणे भांगडिया यांना छुप्या पद्धतीने मदत करण्याची शक्यता आहे. विरोधी पक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार लगतच्या ब्रम्हपुरी मतदारसंघातून निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे वडेट्टीवार स्वतः डॉ. वारजुकर यांना किती मदत करतात, हे देखील बघण्यासारखे आहे.
हेही वाचा >>>Murbad Assembly Constituency : मुरबाड भाजपमधील लाथाळ्या समोर, आमदाराच्या विरोधात माजी खासदाराची विरोधकांना साथ ?
या मतदारसंघात चिमूर, नागभीड या दोन तालुक्यांचा समावेश आहे. आदिवासी माना समाजाचे मतदार येथे सर्वाधिक आहेत. त्यानंतर कुणबी मतदार अधिक आहेत. माना समाजातून येणारे माजी मंत्री डॉ. रमेश गजबे यांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. तसेच महायुतीत सहभागी शिवसेना शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या पक्षाती ताकद तुलनेने खूप कमी आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षांची ताकद बऱ्यापैकी आहे. मात्र महायुती व महाविकास आघाडीमधील हे पक्ष अधिकृत उमेदवारांना किती मदत करतात, यावरदेखील लढतीचे चित्र अवलंबून असेल.
हेही वाचा >>>महाराष्ट्रात खरंच राष्ट्रपती राजवट लागू शकते का? संजय राऊतांच्या दाव्यात किती तथ्य? नियम काय सांगतो?
मतदारसंघातील लढतींचा इतिहास
– १९६२ : काँग्रेसचे मारोतराव तुम्मापल्लीवार विजयी, जनसंघाचे बालाजी बोरकर पराभूत.
– १९६७ : काँग्रेसचे मारोतराव तुम्मापल्लीवार विजयी.
– १९७२ : काँग्रेसचे जी. बिर्जे विजयी, अपक्ष आडकू सोनवणे पराभूत.
– १९७८ : काँग्रेस (आय)चे आडकू सोनवणे विजयी, जनता पक्षाचे गोपाळ कोरेकर पराभूत.
– १९८० : काँग्रेस (आय)च्या यशोधरा बजाज विजयी (जिल्ह्यातील पहिल्या महिला आमदार)
– १९८५ : भुजंगराव बागडे विजयी, अपक्ष मोहम्मद रहमतुल्ला पराभूत.
– १९९० : काँग्रेसचे बाबूराव वाघमारे विजयी, शिवसेनेचे बाबा उर्फ योगेंद्र जैस्वाल पराभूत.
– १९९५ : अपक्ष रमेश गजबे विजयी, भाजपचे रामदास गभणे पराभूत.
– १९९९ : काँग्रेसचे डॉ. अविनाश वारजूकर विजयी, अपक्ष रमेश गजबे पराभूत.
– २००४ : शिवसेनेचे विजय वडेट्टीवार विजयी, काँग्रेसचे अविनाश वारजूकर पराभूत.
– २००९ : काँग्रेसचे विजय वडेट्टीवार विजयी, भाजपचे वसंत वारजूकर पराभूत.
– २०१४ व २०१९ : भाजपचे बंटी भांगडिया विजयी.