Premium

समाजवादी पक्षाचा ‘इंडिया’ आघाडीत खोडा? छत्तीसगडमध्ये काँग्रेस सरकारच्या विरोधात ४० जागा लढविणार

इंडिया आघाडी लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात येत आहे. त्याचा राज्याच्या विधानसभा निवडणुकीशी संबंध नाही, असे समाजवादी पक्षाकडून सांगण्यात येत आहे. अखिलेश यादव २५ सप्टेंबर रोजी रायपूर, छत्तीसगडचा दौरा करणार आहेत.

Samajwadi-Party-in-Chhattisgarh-Assembly-Election
समाजवादी पक्षाचा काँग्रेस पक्षाला छत्तीसगडमध्येही खो… (Photo – PTI)

इंडिया आघाडीचा घटक पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाने (सपा) मध्य प्रदेशनंतर छत्तीसगडच्याही विधानसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. भाजपाला रोखण्यासाठी इंडिया आघाडीची स्थापना करण्यात आली असली तरी लोकसभेपूर्वी पाच राज्यांत होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढविली जात असल्याचे काही राज्यांत दिसत आहे. इंडिया आघाडीत आता २८ पक्ष एकत्र आले असून त्यापैकी काँग्रेस महत्त्वाचा पक्ष आहे. काही दिवसांपूर्वीच समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव म्हणाले होते की, ज्या ठिकाणी जो पक्ष शक्तीशाली आहे, त्याला त्या ठिकाणी लढू दिले पाहिजे. असे असताना मध्य प्रदेशनंतर आता छत्तीसगड विधानसभा निवडणूक लढविण्याच्या समाजवादी पक्षाच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सूत्रांनी द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, समाजवादी पक्षाच्या छत्तीसगड संघटनेने राज्यातील विधानसभेच्या ९० जागांपैकी ४० मतदारसंघात निवडणूक लढविण्याचा प्रस्ताव दिला आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांत येत्या काही महिन्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस प्रमुख विरोधी पक्ष असून सत्ताधारी भाजपाला सत्तेपासून दूर करण्यातला प्रबळ दावेदार मानला जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीकडून उत्तर प्रदेशमध्ये अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी समाजवादी पक्षाकडून छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत उतरण्याची तयारी केली जात आहे. समाजवादी पक्ष उत्तर प्रदेशमध्ये सत्ताधारी भाजपाचा प्रमुख विरोधी पक्ष आहे.

हे वाचा >> ‘इंडिया’मध्ये एकत्र, राज्यात वेगळे; समाजवादी पक्ष मध्य प्रदेशची विधानसभा लढविण्यास इच्छुक

अखिलेश यादव यांनी मध्य प्रदेशमध्ये निवडणुकीसाठी धौहनी व चितरंगी विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर केले. उत्तर प्रदेशच्या सीमेलगत असलेल्या विंध्य प्रांतातील सिद्दी जिल्ह्यातील हे दोन मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. धौहनीमधून विश्वनाथ सिंह गौड मार्कम आणि चितरंगीसाठी श्रावणकुमार सिंह गौड यांना तिकीट देण्यात आले आहे.

छत्तीसगडमध्ये निवडणूक लढविण्यासंदर्भात राज्यातील नेत्यांशी चर्चा करण्यासाठी अखिलेश यादव २५ सप्टेंबर रोजी राज्याचा दौरा करणार आहेत. यावेळी राज्य कार्यकारिणीसोबत विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा करण्यात येईल. छत्तीसगडचे सपा प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष २५ सप्टेंबर रोजी रायपूर येथे येत आहेत. त्यांचे जंगी स्वागत करण्याची तयारी आम्ही केली आहे. एक छोटी मिरवणूक आणि काही सभा आणि बैठकांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

छत्तीसगडमध्ये २०१८ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत सपाने १० मतदारसंघात उमेदवार उभे केले होते. मात्र, एकालाही विजय मिळवता आला नव्हता. छत्तीसगडचे प्रदेशाध्यक्ष नवीन गुप्ता म्हणाले की, यावेळी आम्ही ४० मतदारसंघात उमेदवार उभे करण्याचा विचार करत आहोत. आम्ही इंडिया आघाडीमध्ये काँग्रेसशी आघाडी केलेली आहे. मात्र, ही आघाडी लोकसभा निवडणुकीसाठी आहे. विधानसभा निवडणुकीत ४० उमेदवार उभे करण्याची आमची पूर्ण तयारी आहे. सपाच्या या निर्णयामुळे इंडिया आघाडीवर परिणाम होतील का? असा प्रश्न विचारला असता गुप्ता म्हणाले की, त्याबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील.

समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते राजेंद्र चौधरी म्हणाले की, काँग्रेसशी चर्चा केल्यानंतर सपा छत्तीसगडमध्ये उमेदवार उभे करेल. आमची त्या ठिकाणी ताकद असल्यामुळेच आम्ही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. पण, अंतिम निर्णय घेण्याआधी आम्ही चर्चा जरूर करू. तसेच छत्तीसगडबाबत कोणताही निर्णय घेण्याआधी इंडिया आघाडीचा विचार डोक्यात ठेवूनच निर्णय घेतला जाईल.

दोन्ही पक्षातील सूत्रांनी सांगितले की, अखिलेश यादव हे छत्तीसगडमध्ये आल्यानंतर मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची भेट घेतील. सपाच्या सूत्रांनी सांगितले की, सदर भेटीबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयाला दिला आहे. आता मुख्यमंत्री बघेल भेट देणार की नाही? हे सर्व त्यांच्यावर आधारित आहे. पण, आम्ही मात्र मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधण्याचे कर्तव्य पार पाडले आहे.

नुकतीच देशभरात सात विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक संपन्न झाली. उत्तराखंडच्या बागेश्वर विधानसभा मतदारसंघात सपा-काँग्रेसमध्ये निवडणुकीवरून तणाव पाहायला मिळाला. उत्तराखंडच्या काँग्रेस संघटनेने पराभवासाठी समाजवादी पक्षाला जबाबदार धरले. सपाने उमेदवार दिल्यामुळेच भाजपाविरोधात झालेल्या अटीतटीच्या लढतीत काँग्रेसचा पराभव झाला, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. दुसऱ्या बाजूला उत्तर प्रदेशमधील घोसी विधानसभा मतदारसंघात मात्र काँग्रेसने सपाला पाठिंबा देताना उमेदवार जाहीर केला नाही. परिणामस्वरूप घोसीमध्ये सपाने भाजपाचा पराभव केला. समाजवादी पक्ष आघाडीचा धर्म पाळत नसल्याची यावरून टीका केली जात आहे. .

उत्तर प्रदेशमधील एका काँग्रेस नेत्याने सांगितले की, समाजवादी पक्षाची ज्या राज्यात ताकदच नाही, त्या ठिकाणी निवडणूक लढवून आघाडीचे नुकसान करू नये. छत्तीसगडमध्ये त्यांची काहीही ताकद नाही आणि त्यांना त्या ठिकाणी विधानसभा निवडणूक लढवायची आहे. पुढे बघू ते काय निर्णय घेतात. अखिलेश यादव मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची भेट घेणार आहेत, त्यानंतर ते कदाचित निवडणूक लढविण्याच्या निर्णयात बदल करतील.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Claiming plan to field 40 faces in chhattisgarh assembly poll samajwadi party turns heat on congress kvg

First published on: 21-09-2023 at 18:21 IST
Next Story
पिंपरी- चिंचवडमध्ये पार्थ पवार यांना रोहित पवार यांचे आ‌व्हान ?