scorecardresearch

Premium

केंद्रीय मंत्र्यानेच उघडकीस आणला भाजप आमदाराचा प्रताप

केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील आणि त्यांच्याच लोकसभा मतदारसंघातील मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे त्यांच्याच पक्षातील आमदार किसन कथोरे यांच्या गेल्या अनेक महिन्यांपासून संघर्ष सुरू आहे.

kisan kathore-kapil patil
दोन्हीही भाजप नेते एकमेकांना खिंडीत गाठण्याच्या प्रयत्नात आहेत. (फोटो सौजन्य- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

सागर नरेकर
एखादा आमदार स्वतःचा मतदारसंघ सोडून दुसऱ्याच्या मतदारसंघात विकास निधी देऊ शकतो का, असा प्रश्न उपस्थित करत मंगळवारी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री शंभूराज देसाई यांना निरूत्तर केले. काही आमदार आपला मतदारसंघ सोडून इतरांच्या मतदारसंघात विकासनिधी देत असून त्यामुळे त्या त्या मतदारसंघातील आमदारांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे, असे सांगत हा प्रकार थांबवण्याचे आवाहन कपिल पाटील यांनी केले आणि गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या कपिल पाटील आणि आमदार किसन कथोरे यांच्या संघर्षाचा आणखी एक अंक समोर आला.

केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील आणि त्यांच्याच लोकसभा मतदारसंघातील मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे त्यांच्याच पक्षातील आमदार किसन कथोरे यांच्या गेल्या अनेक महिन्यांपासून संघर्ष सुरू आहे. सुरूवातीला एकमेकांना अप्रत्यक्ष टोला लगावण्यातील हा संघर्ष गेल्या काही महिन्यात तीव्र झाला आहे. त्यामुळे दोन्हीही भाजप नेते एकमेकांना खिंडीत गाठण्याच्या प्रयत्नात आहेत. एकमेकांच्या कामातील त्रुटी काढणे, एकमेकांच्या कामांचे श्रेय घेण्याचे प्रकारही सुरू आहेत. त्यातून गेल्या काही दिवसात नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्येही असंतोष वाढतो आहे. या संघर्षाचा नवा अंक मंगळवारी झालेली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पाहायला मिळाला. खरे तर पूर्वनियोजीत कार्यक्रमामुळे आमदार किसन कथोरे या बैठकीत उपस्थित नव्हते. समितीची बैठक समाप्तीला येत असतानाच केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांना एक प्रश्न विचारून संपूर्ण सभागृहाला संभ्रमात टाकले. मी दुसऱ्या लोकसभा मतदारसंघात निधी देऊ शकतो का, असा प्रश्न पाटील यांनी देसाई यांना विचारला. त्यावर देसाई यांनी असे होऊ नये असे स्पष्ट केले.

Vijayraj Shinde vehicle hit by st bus
भाजपा नेत्याच्या वाहनाला भरधाव एसटीची धडक; एअर बॅग उघडल्याने…
Ajit Pawar group washim
वाशिम : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटात नाराजीनाट्य! सहकारमंत्र्यांच्या समोरच…
ganesh naik-eknath shinde
गणेश नाईकांचा नेम मुख्यमंत्र्यांच्या विरोधात?
B K Hariprasad
कर्नाटक : काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर, बड्या नेत्याची मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर टीका!

आणखी वाचा-राजनाथ सिंह म्हणाले, ‘इंडिया’ नाव भयानक; ‘इंडिया शायनिंग’चा भाजपाने धसका का घेतला?

केंद्रीय मंत्री पाटील यांच्या शब्दाला भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांनी दुजोरा देत थेट आमदार किसन कथोरे यांचे नाव घेत ते माझ्या मतदारसंघात विकासकामांसाठी निधी देत असल्याचा आरोप केला. ते माझ्या मतदारसंघात निधी देणार म्हणजे मी काही कामाचा नाही का, असा संतप्त सवाल शांताराम मोरे यांनी उपस्थित केला. आमच्या मतदारसंघात निधी देऊन त्याची जाहिरातबाजी केली जाते. मी हे केले मी ते केले, समाजमाध्यमांवर ते पसरवले जाते. त्यांनी ते केले मग आम्ही काहीच केले नाही का, असाही प्रश्न मोरे यांनी विचारला.

हे तर आमदारांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

दुसऱ्याच्या मतदारसंघात विकास कामांसाठी निधी देणे म्हणजे तिथल्या आमदाराच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यासारखे आहे, असे केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी टिच्चून सांगितले. त्यामुळे अशा कामांना यापुढे मंजुरी देऊ नये. असे प्रस्ताव नामंजूर करावेत अशी मागणी पाटली यांनी केली.

यापुढे ही ढवळाढवळ बंद

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपस्थित आमदारांच्या आक्षेपानंतर यापुढे सदस्यांनी आपला मतदारसंघ सोडून दुसरीकडे प्रस्ताव देऊ नये. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने अशा प्रस्तावांची माहिती मला पाठवावी. ज्या सदस्यांनी प्रस्ताव दिले ते त्यांच्याच मतदारसंघातील आहे का याची खातरजमा करावी असे स्पष्ट आदेश यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

भाजपमधील संघर्ष आणखी तीव्र

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या निमित्ताने ठाणे जिल्ह्यातील शिवसेना भाजप महायुती आणि त्यातही भाजपात अंतर्गत वाद टिपेला पोहोचल्याचे दिसून आले आहे. शिवसेना आमदार शांताराम मोरे यांनी केलेल्या आरोपानंतर भाजप आमदार त्यांच्या मतदारसंघात ढवळाढवळ करत असल्याचे उघड झाले आहे. तर केंद्रीय मंत्री कपिल पाटील आणि किसन कथोरे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याचे दिसून आले आहे. एकमेकांना कोंडीत पकडण्याची एकही संधी दोघेही सोडत नसल्याचे चित्र आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Clash between union minister kapil patil and mla kisan kathore print politcs news mrj

First published on: 06-09-2023 at 12:25 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×