आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्र्बाबू नायडू वारंवार वायएसआर काँग्रेस पक्षाविरोधात (वायएसआरसीपी) आक्रमक होताना दिसत आहेत. गुरुवारी आंध्र प्रदेश विधानसभेच्या कामकाजादरम्यान, तेलुगू देसम पार्टी (टीडीपी) प्रमुख चंद्र्बाबू नायडू यांनी त्या सर्व आमदारांना उभे राहण्यास सांगितले, ज्यांच्याविरुद्ध पूर्वीच्या वायएसआरसीपी सरकारने खटले दाखल होते. त्यानंतर जवळपास १६० आमदार आपल्या जागेवर उभे राहिले. यादरम्यान वायएसआरसीपीचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी सभागृहात अनुपस्थित होते. उभ्या राहिलेल्या आमदारांमध्ये टीडीपी, त्यांच्या सत्ताधारी आघाडीचे भागीदार जनसेना पक्ष (जेएसपी) आणि भाजपातील आमदारांचा समावेश होता. या दरम्यान भाजपाचे सी. अय्यान्ना पात्रुडूदेखील उभे झाले होते. त्यांच्यावर पूर्वीच्या सरकारमध्ये अनेक खटले दाखल करण्यात आले होते. चंद्राबाबू नायडू ५३ दिवस तुरुंगात चंद्राबाबू नायडू यांनी जगनमोहन रेड्डी यांच्यावर पोलीस आणि इतर राज्य यंत्रणांचा वापर करून सूडाचे राजकारण केल्याचा आरोप केला. वायएसआरसीपी सरकारच्या काळात स्वतः नायडूंवरही अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते. अशाच एका प्रकरणात, कौशल्य विकास महामंडळातील कथित घोटाळाप्रकरणी चंद्राबाबू नायडूंना गेल्या वर्षी ९ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती आणि जामीन मिळण्यापूर्वी ते ५३ दिवस तुरुंगात होते. त्यावेळी गुन्हे अन्वेषण विभागाच्या आंध्र प्रदेश शाखेच्या म्हणण्यानुसार, कॉर्पोरेशनसाठी राखून ठेवण्यात आलेले किमान २४१ कोटी रुपये पाच इतर कंपन्यांकडे वळवण्यात आले होते. हेही वाचा : Budget and BJP : भाजपाने जाहीरनाम्यामध्ये दिलेली आश्वासने बजेटमध्ये किती उतरली? पवन कल्याण ते नायडूंचा मुलगा नारा लोकेशवरही खटले वायएसआरसीपी सरकारच्या अंतर्गत खटल्यांचा सामना करणाऱ्या आणि नायडूंच्या आग्रहावर उभे राहिलेल्या इतरांमध्ये जेएसपी प्रमुख के.पवन कल्याण यांचा समावेश होता. त्यांच्यासह नारायणा ग्रुप ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्सचे संस्थापक पी.नारायणा, टीडीपीचे माजी राज्य प्रमुख के. अचन्नयडू, नायडू यांचा मुलगा नारा लोकेश, टीडीपीचे माजी राज्यमंत्री के. कलावेंकट राव, एन चिनाराजप्पा, वायएसआरसीपीचे माजी खासदार आणि आता टीडीपीचे आमदार के. रघु रामकृष्ण राजू, खाण आणि भूविज्ञान मंत्री कोल्लू रवींद्र, टीडीपीचे माजी सरचिटणीस बोंडा उमामहेश्वर राव, टीडीपीचे माजी व्हीप डी. नरेंद्र कुमार आणि अर्थमंत्री पय्यावुला केशव यांच्यावरही खटले दाखल करण्यात आले होते. हे सर्व आंध्र प्रदेशच्या राजकारणातील प्रमुख चेहरे आहेत. मुख्यमंत्री नायडू यांनी त्यांच्यावरील खटले उभे राहण्याआधी विधानसभेत एक कागदपत्र सादर केले होते; ज्यामध्ये त्यांनी दावा केला होता की २०१९ ते २०२४ दरम्यान ५९१ टीडीपी नेत्यांवर जगन सरकारने गुन्हे दाखल केले, त्यापैकी १६२ जणांना अटक करण्यात आली होती. त्यात २४ जेएसपी, १६ भाजपा आणि १२ काँग्रेस नेत्यांवरही खटले चालविल्याचा दावा करण्यात आला होता. कोणावर किती खटले? यंदा पुन्हा निवडून आलेल्या आमदारांपैकी चिंतामनेनी प्रभाकर यांच्यावर सर्वाधिक खटले दाखल आहेत. त्यांच्यावर ४८ खटले दाखल करण्यात आले असून १५ वेळा अटक करण्यात आली आहे. त्यानंतर पाच नेत्यांवर किमान २० खटले दाखल आहेत. चंद्राबाबू नायडू आणि त्यांच्या मुलावर प्रत्येकी १७ खटले दाखल आहेत. माजी टीडीपी आमदार जे. सी. प्रभाकर रेड्डी या यादीत सर्वात वरच्या स्थानावर आहेत. वायएसआरसीपी सरकारच्या अंतर्गत त्यांच्या विरोधात ६६ खटले दाखल करण्यात आले असून ४६ वेळा अटक करण्यात आली आहे. २०१४ ते २०१९ दरम्यान ज्या माजी मंत्री आणि टीडीपी आमदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते, त्यापैकी बहुतेकांची नावे अमरावती राजधानी प्रदेशातील जमिनीवर कथित अंतर्गत व्यवहारासाठी किंवा अमरावती राजधानीच्या हद्दींच्या पुनर्संरचनेदरम्यान काही जमीनदारांना फायदा मिळवून देण्यासाठी समोर आली होती. पवन कल्याण यांच्यावर नोव्हेंबर २०२२ मध्ये रॅश आणि निष्काळजीपणे ड्रायव्हिंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. २०२२ मध्ये एका संस्थेतील शिक्षकाने प्रश्नपत्रिका लीक केल्याचा आरोप केल्यानंतर पी. नारायणा यांना अटक करण्यात आली होती. २०२० मध्ये, कर्मचारी राज्य विमा (ईएसआय) रुग्णालये आणि दवाखान्यांमधील औषधे आणि इतर साहित्य खरेदीतील कथित घोटाळ्याच्या प्रकरणात के. अचन्नायडू यांना अटक करण्यात आली होती. राज्याचे गृहमंत्री व्ही. अनिथा आणि माजी टीडीपी आमदार जे.सी. दिवाकर रेड्डी यांच्यावर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. विधानसभेत नक्की काय घडले? "चंद्राबाबू नायडू यांनी सभागृहात जगन सरकारने आमच्यापैकी किती जणांवर किमान एक तरी खटला दाखल केला आहे, असे विचारले तेव्हा अनेक आमदारांनी हात वर केले आणि नंतर उभे राहून त्यांच्या डावीकडे किंवा उजवीकडे पाहिले आणि सगळे एकमेकांना बघून हसले. ते फारच मजेशीर होते. जगन यांनी कोणालाही सोडले नाही. टीडीपीशी संबंधित प्रत्येकावर त्यांनी एक तरी गुन्हा दाखल केलाच आहे, ” असे उमामहेश्वर राव म्हणाले. नोव्हेंबर २०२१ मध्ये वायएसआरसीपी आमदारांच्या वर्तनाच्या निषेधार्थ नायडू विधानसभेतून बाहेर पडले होते आणि वायएसआरसीपीच्या आमदारांनी त्यांच्या पत्नीच्या चारित्र्याला लक्ष्य केले असल्याचा आरोप केला होता. त्यांनी पक्ष पुन्हा सत्तेवर आल्यास पत्नीचा सन्मान परत मिळवून देण्याची शपथ घेतली होती. हेही वाचा : अर्थसंकल्पात बिगर-एनडीएशासित राज्यांकडे दुर्लक्ष? विरोधक संसदेत अर्थसंकल्पाला विरोध का करत आहेत? वायएसआरसीपीचा दिल्लीत निषेध वायएसआरसीपीने टीडीपी सत्तेवर आल्यानंतर राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचा आरोप केला असून पक्ष निषेध करण्यासाठी नवी दिल्लीत तळ ठोकून आहे. वायएसआरसीपीच्या आमदारांनी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांवर हल्ले होत असल्याची बाब उपस्थित केली. त्यानंतर राज्याच्या गृहमंत्री व्ही.अनिथा यांनी विचारले की अशा महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करायची असताना जगन अनुपस्थित का होते. दिल्लीत नाटक करून राज्याची प्रतिमा मलिन करण्याऐवजी वायएसआरसीपीने तपशील द्यावा. आम्ही चौकशी करून कारवाई करू,” असे त्या म्हणाल्या.