नाशिक – कुंभमेळा कामांच्या निविदा प्रक्रियेत आक्षेप घेणारे राजकीय नेते आणि छोटी, छोटी कामे एकत्र करून स्थानिकांना डावलल्याच्या तक्रारी करणाऱ्या मक्तेदार संघटना यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक संदेश देत या कामांतील राजकीय अडथळे दूर केले आहेत.
शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून विकास कामांविषयी वारंवार आक्षेप घेतला जात होता. तर भाजपच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी नाशिकच्या मक्तेदारांना काम मिळत नसल्याचा मुद्दा मांडला होता. सिंहस्थ कामांच्या शुभारंभावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी या कामात अवरोध आणणाऱ्यांना योग्य तो इशारा दिला.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आगामी कुंभमेळ्यासाठी सुमारे सहा हजार कोटींच्या कामांचे भूमीपूजन करण्यात आले. सिंहस्थाची कामे दर्जेदार आणि पारदर्शक पद्धतीने करून नाशिकला सुंदर आणि आधुनिक शहर करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. कुंभमेळा हिंदू धर्मियांंचा सर्वात मोठा उत्सव मानला जातो.
प्रयागराजनंतर नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यात सात ते आठ कोटी भाविक येण्याचा अंदाज आहे. केंद्र आणि राज्य सरकारने नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी तब्बल २५ हजार कोटींच्या व्यापक कामांचे नियोजन केले आहे. पहिल्या टप्प्यातील कामांत राजकीय अडथळे येण्यास सुरुवात झाल्याचे समोर आले होते.
नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत आधीपासून संघर्ष सुरू आहे. कुंभमेळ्यावर प्रभाव राखण्यासाठी शिवसेना (एकनाथ शिंदे) या पदासाठी आग्रही आहे. सर्वाधिक आमदारांच्या बळावर राष्ट्रवादीने (अजित पवार) प्रयत्न सोडले नाहीत. यामुळे मंत्री गिरीश महाजन यांना जाहीर झालेले पालकमंत्रीपद मिळू शकले नाही.
कुंभमेळामंत्रीपद महाजन यांना मिळाल्यानंतर महायुतीतील मतभेदांचे प्रतिबिंब कुंभमेळा कामांवर पडले. शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांनी पाणी पुरवठा योजना, रस्ते, मसनिस्सारण योजना आदी कामांतील अटी-शर्तींवर आक्षेप घेत ते विशिष्ट ठेकेदारांना दिल्याच्या तक्रारी केल्या होत्या. या संदर्भात चौकशीची मागणी शिंदे गटाकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली होती.
ठेकेदार संघटना छोटी कामे एकत्र करून बड्या ठेकेदारांना दिल्याच्या तक्रारी करीत होत्या. त्यामुळे भाजपच्या आमदारांनी स्थानिकांना काम देण्या्ची मागणी मध्यंतरी नेतृत्वाकडे केली होती. भाजपचे आमदार राहुल ढिकले यांनी एका कामात अटी-शर्तीचे पालन होत नसल्याची तक्रार केली होती.
विरोधी शिवसेना ठाकरे गटाकडूनही तोच मार्ग अवलंबला गेला. या संदर्भातील बातम्याही प्रसारित झाल्या होत्या. हाच धागा पकडून मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माध्यमांच्या आडून कुंभमेळा कामात अडथळे आणणाऱ्यांना तंबी दिल्याचे मानले जात आहे.
कुंभमेळ्याची सर्व कामे अधिकारी पारदर्शक पद्धतीने करतील. त्यात आमचा हस्तक्षेप नाही. चांगल्या दर्जाचे काम करण्यासाठी चांगले कंत्राटदार लागतील. कुणाला झुकते माप दिले जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाविकांना सर्वोत्तम सुविधा मिळाव्यात, यासाठी शासन कटिबध्द असून माध्यमे तसेच नेत्यांनी कोणत्या ठेकेदाराला काम दिले, याकडे लक्ष देऊ नये, असे सूचित करीत मुख्यमंत्र्यांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.
