लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसंकल्प अभियानातंर्गत शिवसेनेचे खासदार असलेल्या किंवा गेल्या वेळी लढलेल्या मतदारसंघांपुरताच हा दौरा मर्यादित ठेवण्यात आला आहे. शिरुर मतदारसंघावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना दावा केला असला तरी हा मतदारसंघ शिंदे सोडण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीत. कारण या मतदारसंघातही त्यांची सभा होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महायुतीने तयारी सुरू केली आहे. फेब्रुवारीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यभर दौरा करणार आहेत. फडणवीस यांची सर्व मतदारसंघांमध्ये एक तरी सभेचे नियोजन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्याला ६ जानेवारीपासून सुरुवात होत आहे. शिवसंकल्प अभियान असे या संपर्क अभियानाला नाव देण्यात आले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले होते. यापैकी १३ खासदार यांनी शिंदे यांना साथ दिली आहे. गेल्या वेळी निवडून आलेल्या सर्व १८ जागांवर शिंदे गटाने दावा केला आहे. पण एवढ्या जागा शिंदे गटाला सोडण्याची भाजपची तयारी नाही. शिंदे गटाचे १३ खासदार असल्याने तेवढ्या तरी जागा पदरात पाडून घेण्याचा शिवसेना शिंदे गटाचा प्रयत्न असेल. हेही वाचा : येडीयुरप्पांवर ४० हजार कोटींच्या कोविड घोटाळ्याचा आरोप करणाऱ्या भाजपाच्या नेत्यावर पक्ष कारवाई करणार? मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसंकल्प अभियानात गेल्या वेळी शिवसेनेने जिंकलेल्या किंवा लढविलेल्या मतदारसंघांमध्येच दौरा होणार आहे. यानुसार गेल्या वेळी जिंकलेल्या यवतमाळ-वाशीम, रामटेक, बुलढाणा, अमरावती, हिंगोली, उस्मानाबाद (धाराशिव), परभणी, छत्रपती संभाजीनगर, शिरुर, मावळ, रायगड, सिंधुदुर्ग-रत्नागिरी, शिर्डी, नाशिक, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघांमध्ये शिंदे यांच्या जाहीर सभा होणार आहेत. मुंबई व ठाण्याचा दौरा नंतर केला जाणार आहे, असे सांगण्यात आले. मुख्यमंत्री शिंदे यांचा दौरा होणार असलेल्या मतदारसंघांपैकी रायगडमध्ये राष्ट्रवादीचे सुनील तटकरे खासदार आहेत. यामुळे ही जागा शिंदे गटाला सुटणे शक्यच नाही. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी भाजपशी जुळवून घेतले असून, त्यांना भाजपची उमेदवारी हवी आहे. त्यामुळे अमरावतीबाबतही साशंकताच आहे. औरंगाबामध्ये म्हणजेच छत्रपती संभाजीनगरमध्ये केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी लोकसभा लढण्याची आधीपासूनच तयारी केली आहे. भाजप हा मतदारसंघ सोडण्याची शक्यता नाही. हेही वाचा : कर्नाटक : दुकानांच्या पाट्यांवर आता ६० टक्के मजकूर कन्नड भाषेत, सिद्धरामय्या सरकारकडून अध्यादेश! गेल्या वेळी शिवसेनेने जिंकलेल्या आणि लढविलेल्या जागांवरच शिंदे यांनी पहिल्या टप्प्यात भर दिला आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणे आणि या मतदारसंघांतील नेते आणि कार्यकर्ते जागा सुटणार नसल्याने पुन्हा ठाकरे गटाकडे वळू नयेत या उद्देशानेच या मतदारसंघांची निवड करण्यात आली आहे. शिरुर कोणाला मिळणार ? राष्ट्रवादीने गेल्या वेळी जिंकलेल्या सर्व जागा लढविण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. शिरुरमध्ये शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे पुन्हा निवडून येणार नाहीत, अशी भविष्यवाणीही पवार यांनी वर्तविली आहे. या मतदारसंघात शिंदे गटाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे इच्छूक आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांचा शिरुर मतदारसंघात दौरा होणार असल्याने या मतदारसंघावर शिंदे व पवार गटात धुसफूस होण्याची चिन्हे आहेत.