नीट पेपरफुटीबाबतचा आंदोलकांमधील राग सोमवारी दिल्लीतील रस्त्यांवर दिसून आला. आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या घटनेनंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत या मुद्द्यावर संसदेत चर्चेची मागणी केली. अनेक विरोधी नेत्यांनी सांगितले की, सरकारला घेराव घालण्याची ही एक संधी आहे. तसेच, आंदोलकांच्या प्रमुख मागण्यांपैकी एक असलेल्या केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी येत्या काही दिवसांत संसदेचे कामकाज रोखून धरण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

“पंतप्रधान मोदी अँटी-यूथ” – राहुल गांधी

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत त्यांना “युवक-विरोधी” (अँटी-यूथ) म्हटले. “पंतप्रधान मोदी हे भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे युवकविरोधी पंतप्रधान आहेत. ते इतके युवकविरोधी आहेत की एका अपयशी शिक्षण मंत्र्यांच्या म्हणजेच धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीसुद्धा ते करू शकत नाहीत.”

राहुल गांधी पुढे म्हणाले, १५२ पेपर लीक आणि “७.५ कोटी विद्यार्थ्यांचे नुकसान” होऊनही कोणालाही शिक्षा झालेली नाही. “शिक्षा कोणाला मिळाली? कष्टकरी तरुणांना. आणि जेव्हा या मुलांनी शिक्षणाबद्दल रास्त प्रश्न विचारले तेव्हा त्यांच्या प्रश्नांना लाठीमार आणि अटकेने उत्तर दिले गेले. पेपर लीक करणारे गुन्हेगार मोकाट फिरत आहेत आणि रास्त मुद्दे मांडणाऱ्या विद्यार्थ्यांना ओढले जात आहे, मारले जात आहे. हे सरकार केवळ तरुणांना अपयशी ठरवत नाहीए, तर त्यांच्यावर चाल करून जात आहे.”

विरोधी पक्षांचे नेते संसदेत आपली रणनीती आखण्यासाठी सोमवारी (२० जुलै) सकाळी एकत्र आले होते. तेव्हा काँग्रेसने शिक्षण व्यवस्थेशी संबंधित मुद्द्यांवर स्वतः देखील आंदोलन सुरू केल्याचे निदर्शनास आणून दिले. मित्रपक्षांशी चर्चा केल्यानंतर दिल्लीतील रस्त्यांवर पोलिसांच्या कारवाईचा सामना करणाऱ्या आंदोलकांचा मुद्दा अधिक आक्रमकपणे मांडण्यावर विरोधी पक्षांचे एकमत झाले.

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी राज्यसभेच्या सभापतींना सांगितले की, त्यांना पेपर लीक आणि ‘नीट’ परीक्षेच्या घोटाळ्याच्या मुद्द्यावर बोलायचे आहे. खर्गे म्हणाले, “हा विद्यार्थ्यांचा आणि लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा मुद्दा आहे. याविरोधात जंतरमंतरवर हजारो विद्यार्थी एकत्र जमले आहेत, आणि सरकार त्यांच्यावर लाठीचार्ज करत आहे, तसेच त्यांना चिरडण्याचा आणि मारहाण करण्याचा प्रयत्न करत आहे”, असे ते म्हणाले.

प्रियांका गांधी-वाड्रा काय म्हणाल्या?

संसद भवन परिसरात काँग्रेस खासदार प्रियांका गांधी – वाड्रा यांनी आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्जवर टीका केली. प्रियांका गांधी – वाड्रा म्हणाल्या, “हे हास्यास्पद आहे … ती आपलीच मुले आहेत … ती या देशाचे भविष्य आहेत. ही संसद त्यांची आहे. ही कोणाचीही वैयक्तिक जहागीर नाही.”

केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातील खासदार प्रियांका गांधी – वाड्रा म्हणाल्या, “शिक्षणाच्या धोरणात त्रुटी असल्याने यावर चर्चा व्हायला हवी, असे आम्ही सांगत आलो आहोत. तुम्ही चर्चा करायला तयार नाही आणि मुलांवर अश्रूधुराच्या नळकांड्या सोडत आहात व त्यांना मारहाण करत आहात. कशासाठी? ती आपलीच मुले आहेत.” नंतर ‘X’ (ट्विटर) वरील एका पोस्टमध्ये त्यांनी भाजपाप्रणीत सरकारला त्यांच्या धोरणांचे आणि त्रुटींचे पुनरावलोकन करण्याचे आवाहन केले तसेच लोकसभेत या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्याची मागणी केली. पंतप्रधानांनी देशातील लाखो तरुणांच्या समस्या ऐकून घेतल्या पाहिजेत आणि त्यांना उत्तरे दिली पाहिजेत, असेही प्रियांका गांधी – वाड्रा म्हणाल्या.

CJP च्या मुद्द्यावर विरोधी पक्षांची एकजूट

‘द इंडियन एक्सप्रेस’ने चर्चा केलेल्या अनेक विरोधी नेत्यांनी मोदी सरकारविरोधात रस्त्यावर उतरलेला हा “उत्स्फूर्त राग” ही एक दुर्मिळ घटना असल्याचे मानले आणि याचा राजकीय फायदा घेण्याच्या गरजेवर भर दिला. नेत्यांनी सांगितले की, ते संसदेचे कामकाज रोखून धरणे सुरूच ठेवतील आणि पेपर लीकवर चर्चेची मागणी करणारे स्थगन प्रस्ताव सादर करतील.

सोमवारी (२० जुलै) सकाळी विरोधी पक्षांच्या संसदीय नेत्यांच्या बैठकीत काँग्रेसने सुरुवातीला अयोध्या राम मंदिरातील देणग्यांच्या कथित चोरीचा मुद्दा उपस्थित करावा यावर भर दिला. दरम्यान, काँग्रेसच्या मित्रपक्षांनी कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन आणि कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबद्दल बोलण्याचा विचार करण्याचे दडपण काँग्रेसवर आणले. त्यानंतर काँग्रेस आंदोलनाचा मुद्दा उपस्थित करण्यावर सहमत झाली, असे सूत्रांनी सांगितले. तसेच, येत्या काही दिवसांत विरोधी पक्षांची आघाडी पेपर लीक आणि राम मंदिराचा मुद्दा उपस्थित करणे सुरूच ठेवेल आणि सरकार शिक्षण सुधारणांवर चर्चेसाठी तयार होत नाही तोपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, असा निर्णयही घेण्यात आला.

एका काँग्रेस नेत्याने सांगितले की, मुख्य विरोधी पक्ष असताना पक्ष अशा जनआंदोलनापासून दूर राहू शकत नाही, याची जाणीव पक्षाला हळूहळू झाली आहे. “सुरुवातीला आमच्या मनात साशंकता असली, तरी आता आम्ही हळूहळू अशा टप्प्यावर पोहोचत आहोत जिथे आम्हाला ठाऊक आहे की आपण या आंदोलनापासून किंवा या प्रसंगापासून लांब राहू शकत नाही”, असे पक्षाच्या एका वरिष्ठ खासदाराने सांगितले. काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राम मंदिराचा मुद्दा विसरून जाणार नाही याची खात्री करण्यावर काँग्रेसचा भर होता. “आम्हाला असे वाटते की राम मंदिराचा मुद्दा हा असा आहे जो या CJP आणि ‘नीट’ (NEET) च्या मुद्द्यांमध्ये वाहून जाऊ शकत नाही”, असे काँग्रेसचे एक खासदार म्हणाले.

“पेपर लीकच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी” – समाजवादी पक्ष

लोकसभेतील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी सांगितले की, राम मंदिरापेक्षा पेपर लीकचा मुद्दा अधिक तातडीचा आहे आणि राम मंदिराच्या मुद्द्यावर काही दिवसांनी लक्ष केंद्रित केले जाऊ शकते.

‘द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना समाजवादी पक्षाच्या एका खासदाराने सांगितले, निषेध म्हणून संसदेचे कामकाज ठप्प करण्याची वेळ आता विरोधी पक्षावर आली आहे. “आम्ही सभागृहात या पेपर लीकच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी करण्यासाठी स्थगन प्रस्ताव आणि रणनीती तयार करत आहोत. आज जे काही घडले त्यानंतर सरकारला याची झळ पोहोचवणे ही आता आमची जबाबदारी आहे”, असे खासदार म्हणाले. समाजवादी पक्षाचे खासदार इक्रा चौधरी यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’ला सांगितले, “आम्ही या आंदोलनात सक्रिय सहभागी आहोत आणि पुढेही राहू.”

“काँग्रेस या आंदोलनापासून दूर राहू शकत नाही” – सीपीआय

सीपीआयच्या एका खासदाराने सांगितले की, काँग्रेस या आंदोलनापासून दूर राहू शकत नाही. “हा असा प्रसंग आहे ज्याकडे काँग्रेस किंवा विरोधी पक्ष दुर्लक्ष करू शकत नाहीत. आम्ही काँग्रेसलाही हे पटवून देऊ आणि ते नक्कीच आमच्यासोबत असतील याची आम्हाला खात्री आहे. रस्त्यावर तरुणांचे रक्त सांडत असताना आपण शांत बसू शकत नाही, याची जाणीव त्यांनाही होत आहे”, असे खासदार म्हणाले.

सीपीआय(एम)चे राज्यसभा खासदार जॉन ब्रिटास म्हणाले की, विरोधी पक्षांनी एकत्रितपणे या युवा आंदोलनाला समजून घेणे आणि त्याला सहकार्य करणे गरजेचे आहे. “इतके तरुण गंभीर जखमी झाले आहेत. हे सरकार इतके असंवेदनशील कसे असू शकते?” असा सवाल त्यांनी केला.

तृणमूल काँग्रेसची भूमिका काय?

तृणमूल काँग्रेसच्या (TMC) खासदार सागरिका घोष यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’ला सांगितले की, त्यांच्या पक्षाने पहिल्या दिवसापासून CJP ला पाठिंबा दिला आहे आणि पुढेही तो सुरूच राहील. टीएमसीच्या दुसऱ्या एका खासदाराने सांगितले की, गैर-काँग्रेस पक्ष CJP ला पाठिंबा देण्याबाबत ठाम होते आणि या मुद्द्यावर आता कोणतीही तडजोड होऊ शकत नाही.

“उत्तर प्रदेश निवडणुकांमुळे काँग्रेस राम मंदिराच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करू इच्छिते आणि तेही ठीक आहे. पण आता या मुद्द्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. सरकारला कोंडीत पकडण्यासाठी वापरता येऊ शकेल असा हा एक प्रसंग आहे, असे आम्ही मानतो. या सरकारच्या काळात सगळे आनंदी असल्याचा त्यांचा सर्व दावा फसला आहे आणि आपण हे असेच सोडू शकत नाही. सोमवारी एवढ्या मोठ्या संख्येने लोक एकत्र येतील अशी अपेक्षा विरोधी पक्ष किंवा सरकारमधील कोणालाही नव्हती. आणि आता हे आंदोलन इतके मोठे झाले असल्याने, आपल्याला या तरुणांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावेच लागेल”, असे एका खासदाराने सांगितले.