निवडणूक आयोगाने आज (२२ मे) १० राज्यांमधील राज्यसभेच्या २४ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. ‘कॉक्रोच जनता पार्टी’ या नावाने राजकीय व्यंग चळवळ सुरू करणारे अभिजीत दिपके यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. कॉक्रोच जनता पार्टीला एक्सवर जोरदार पाठिंबा मिळत असतानाच काल (गुरूवारी, २१ मे) एक्स अकाउंट बंद करण्यात आले. शशी थरूर यांनी विरोधकांचे कान टोचले आहेत, तर प्रशांत किशोर यांनी बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या निवासस्थानावरून टीका केली. देशातील ५ महत्वाच्या घडामोडी…
कॉक्रोच जनता पार्टीमुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका?
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी केलेल्या वक्तव्यानंतर ‘एक्स’वर कॉक्रोच जनता पार्टी नावाने अकाउंट उघडण्यात आले होते. या अकाउंटला अल्पावधीतच तरूणाईचा जोरदार प्रतिसाद मिळाला. कॉक्रोच जनता पार्टीला एक्सवर जोरदार पाठिंबा मिळत असतानाच काल (गुरूवारी, २१ मे) एक्स अकाउंट बंद करण्यात आले. गुप्तचर यंत्रणेने राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव अकाउंटला बंद करण्यात यावे असा अहवाल केंद्र सरकारला दिला होता. त्यामुळे केंद्र सरकारच्या निर्देशानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने ‘द इंडियन एक्सप्रेस’ला सांगितले. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ‘माहिती तंत्रज्ञान कायदा, २०००’ च्या कलम ६९ (अ) अंतर्गत हे अकाउंट बंद करण्याचे निर्देश ‘एक्स’ला सांगितले होते, असे सांगतानाच ही कारवाई करण्याचा सल्ला गुप्तचर यंत्रणेकडून आला होता, अशी माहितीही या अधिकाऱ्याने दिली. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६९ (अ ) नुसार केंद्र सरकार काही विशिष्ट परिस्थितीत एखाद्या माहितीवर निर्बंध घालण्याचे आदेश देऊ शकते. देशाचे सार्वभौमत्व, सुरक्षा, सार्वजनिक सुव्यवस्था व गुन्ह्यांसाठी लोक प्रवृत्त होऊ नये म्हणून माहितीच्या स्त्रोतावर प्रतिबंध घालण्याचे अधिकार केंद्र सरकारला आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले.
राज्यसभेच्या २४ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर
निवडणूक आयोगाने आज (२२ मे) १० राज्यांमधील राज्यसभेच्या २४ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. १८ जून रोजी निवडणूक होणार असल्याची घोषणा आयोगाने केली आहे. तसेच महाराष्ट्र आणि तामिळनाडू मधील प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर केली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्यासह इतर काही राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ जून आणि जुलैमध्ये पूर्ण होत आहे. त्यामुळे राज्यसभेच्या २४ जागा रिक्त होणार आहेत. आंध्र प्रदेशातील चार, गुजरात मधील पाच, झारखंड मधील दोन, मध्य प्रदेशातील तीन, मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम मधील प्रत्येकी एक आणि कर्नाटकातील चार जागांसाठी राज्यसभा निवडणूक पार पडणार आहे. महाराष्ट्र आणि तामिळनाडूतील रिक्त झालेल्या प्रत्येकी एका जागेसाठी राज्यसभेच्या पोटनिवडणुकांचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेतील सदस्यत्वाचा ६ मे रोजी राजीनामा दिला. तसेच सी. व्ही. षण्मुगम यांच्या राजीनाम्यामुळे तामिळनाडूत राज्यसभेची एक जागा रिक्त झाली आहे.
‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या अभिजीत दीपकेंना जीवे मारण्याची धमकी
‘कॉक्रोच जनता पार्टी’ या नावाने राजकीय व्यंग चळवळ सुरू करणारे अभिजीत दिपके यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्वतः अभिजीत दिपके यांनी सोशल मीडियावर “Receiving death threats now” (आता मला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत) असे लिहीत या संदर्भातील माहिती शेअर केली आहे. अभिजीत दिपके यांनी त्यांच्या पोस्टमध्ये त्यांना आलेल्या धमकीचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. गेल्या काही दिवसांत त्यांनी मांडलेल्या भूमिका व केलेल्या पोस्टमुळे त्यांना ही धमकी मिळत असल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावरील त्यांच्या पाठीराख्यांनी आणि नेटिझन्सनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. वैचारिक मतभेदांमधून थेट जीवे मारण्याची धमकी देणे अत्यंत चिंताजनक असल्याचे युझर्सचे म्हणणे आहे. अनेक पत्रकारांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणाची दखल घेण्याची मागणी केली आहे. अभिजीत दिपके यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, अशी मागणी नेटकऱ्यांकडून होत आहे.
“कॉक्रोच जनता पार्टीने दाखवलं, विरोधकांसाठी संधी आहे” – शशी थरूर
शशी थरूर म्हणाले, मला वाटतं हा जो असंतोष आहे त्याला राजकारणाच्या मुख्य प्रवाहाशी जोडलं पाहिजे. राजकीय पक्षाविनाच ही चळवळ सुरू आहे, असे होऊ नये. विरोधकांनी तरूणांमध्ये जी चीड आहे तिला राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणले पाहिजे. मतपेटीतून हा बदल दिसला पाहिजे. ज्या लोकांना बदल घडवून आणायचाय त्यांनी आपल्याला मत दिले पाहिजे, असे काहीतरी विरोधकांना करावे लागेल. मला वाटतं, अभिजीत दीपके यांनी जे करून दाखवलंय त्यातून त्यांनी एक संदेश दिला. एक संधी उपलब्ध आहे जी तुम्ही आता घेऊ शकता, असं त्यांनी आपल्याला दाखवून दिलं आहे. नीट पेपरफुटीसह इतर अनेक मुद्दे यासाठी कारणीभूत आहेत. बेरोजगारी, आयुष्यात संधींची कमतरता, शिक्षण, महागाई या गोष्टींबाबत लोकांमध्ये आधीपासूनच निराशा आहे. त्यानंतर नीट पेपरफुटीने त्यात आणखी भर पडली. लाखो विद्यार्थी नीट परीक्षेच्या तयारीत कित्येक वर्षे घालवतात आणि त्यानंतर परीक्षा पुन्हा द्यावी लागणार हे जेव्हा त्यांना सांगितले जाते तेव्हा त्याचा परीणाम खूप गंभीर होतो. चार जणांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. तसेच अनेकांना मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतोय. हे खूप गंभीर आहे, असे थरूर म्हणाले.
प्रशांत किशोर आश्रमात स्थलांतरित
प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाचे कार्यालय पाटणा शहरालगत बांधण्यात आलेल्या आश्रमात स्थलांतरित करण्यात आले आहे. आयआयटी पाटणा जवळ उभारण्यात आलेल्या आश्रमात गवत व मातीचा वापर करून पर्णकुटी उभारण्यात आल्या आहेत. हा आश्रमच आता जनसुराज पक्षाचे मुख्यालय व प्रशांत किशोर यांचे निवासस्थान असणार आहे. यामुळे प्रशांत किशोर यांच्या घराचा पत्ता बदललेला नसून त्यांच्या राजकारणाने वेगळी दिशा घेतल्याचे म्हटले जात आहे. “१९ मेच्या रात्री मी जन बिहार नवनिर्माण आश्रमात राहायला गेलो आहे. आयआयटी पाटणाजवळ असलेला हा आश्रम आता जनसुराज पक्षाचे अधिकृत कार्यालय असेल. पुढील विधानसभा निवडणुकांपर्यंत आणि जोपर्यंत जनसुराज पक्ष बिहारमध्ये बदल घडवून आणत नाही, तोपर्यंत मी तिथे राहील”, असे प्रशांत किशोर म्हणाले.
