देशभरात गुरूवारी (दि. १९ फेब्रुवारी) छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी केली गेली. मात्र महाराष्ट्राच्या बाहेरील राज्यांमध्ये जयंतीच्या कार्यक्रमात काही अप्रिय घटना घडल्या. कर्नाटक, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेशमध्ये मिरवणुकीदरम्यान दोन गटात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रातही मिरवणुकीच्या दरम्यान काही ठिकाणी हुल्लडबाजी पाहण्यास मिळाली. तर पुणे जिल्ह्यात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या व्याख्यानास विरोध करण्यात आला. राजकीय व्यक्ती व्याख्यान देत असल्यामुळे राजकीय स्वरूप प्राप्त होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. तर दोन दिवसांपूर्वी शिवाजीनगर जिल्हा न्यायालयात आयोजित केलेल्या श्रीमंत कोकाटे यांच्या व्याख्यानालाही विरोध करण्यात आला होता.

कर्नाटकमध्ये काय घडले?

कर्नाटकच्या बागलकोट येथे जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. मात्र मिरवणूक एका मशिदीसमोरून जात असताना मिरवणुकीवर दगडफेक झाल्याचा आरोप करण्यात आला. यानंतर या भागात जातीय तणाव निर्माण होत दंगल उसळली. पोलिसांनी या भागात कलम १४४ लागू करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.

हिंदू गटाने आरोप केला की, मशिदीच्या परिसरात मिरवणूक पोहोचली असता दगडफेक करण्यात आली, ज्यामुळे अशांतता निर्माण झाली. यापैकी एक दगड पोलीस अधीक्षक सिद्धार्थ गोयल यांना लागला असून त्यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली. मिरवणूक मशिदीजवळ येताच काही अंतरावरून आमच्यावर दोन दगड फेकण्यात आले, असे गोयल यांनी माध्यमांना सांगितले.

दुसऱ्या एका वृत्तानुसार, मिरवणुकीदरम्यान डीजेवर वाजवलेल्या गाण्याला मुस्लीमांच्या गटाने आक्षेप घेतला. त्यानंतर इथे तणाव निर्माण झाला. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत दोन्ही गटांना पांगवले. बागलकोट शहरात पुढील चार दिवसांसाठी कलम १४४ लागू करण्यात आला आहे.

हैदराबादमध्ये काय घडले?

कर्नाटकच्या शेजारी आंध्र प्रदेश राज्यातील हैदराबाद येथील अंबरपेट येथेही रमजानच्या नमाज दरम्यान शिवजयंतीची मिरवणूक एका मशिदीजवळून जात असताना किरकोळ जातीय दंगल घडली. मिरवणुकीदरम्यान मोठ्या आवाजात गाणी वाजवण्याला आणि घोषणाबाजीला मुस्लीम समुदायाने आक्षेप घेतला. ज्यामुळे वाद निर्माण होऊन काही काळ तणाव पसरला.

अंबरपेट येथे ३० टक्के मुस्लीम लोकसंख्या असल्यामुळे हा भाग सांप्रदायिक दृष्टीने संवेदनशील मानला जातो. यामुळेच घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी गर्दी पांगवली. शुक्रवारी हा तणाव आणखी वाढू नये, यासाठी अतिरिक्त पोलीस कर्मचारी या भागात तैनात करण्यात आले होते.

जबलपूरमध्ये काय घडले?

मध्य प्रदेश राज्यातील जबलपूरच्या संवेदनशील अशा सिहोरा तहसीलमध्येही जातीय तणाव निर्माण झाला होता. सिहोरामधील दुर्गा मंदिरात संध्याकाळची आरती आणि जवळच्या मशिदीत प्रार्थना एकाच वेळी सुरू झाल्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. यावेळी एका तरूणाने मंदिराच्या ग्रीलचे नुकसान केल्याचा आरोप केला. ज्यामुळे वाद वाढला. पुढे दगडफेक आणि हाणामारीपर्यंत प्रकरण पोहोचले.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवून कायदा व सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न केला. मंदिर आणि मशिदीजवळ मोठा पोलीस फौजफाटा तैनात करून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली. जिल्हाधिकारी राघवेंद्र सिंह आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी संपत उपाध्याय यांनी म्हटले की, या घटनेत कोणत्याही धार्मिक वास्तूचे नुकसान झालेले नाही. तसेच कुणीही जखमी झाल्याची नोंद नाही. तर २० लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

महाराष्ट्रात काय परिस्थिती?

नांदेडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीदरम्यान पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. विनापरवाना लावण्यात आलेला डीजे हटविण्यासाठी पोलीस गेले होते, त्यावेळी तरुणांनी त्याला विरोध केला. पोलिसांनी यानंतर सौम्य लाठीमार केला. युवकांनी मात्र त्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप केला.

बुलढाणा जिल्ह्यातील जामोद तालुक्यातील एका गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरून दोन गटात वाद झाला. यावरून पोलिसांना हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली.

कोल्हापूरच्या पन्हाळ गडावर काही तरूणांनी हुल्लडबाजी केली. पन्हाळ गडावरून ज्योत घेऊन जात असताना काही तरूणांनी दुचाकीचा सायलेन्सर काढून हुल्लडबाजी केली. यानंतर संतापलेल्या स्थानिकांनी संबंधित दुचाकी फोडल्या. कर्णकर्कश सायलेन्सवर वाजविणाऱ्या या अतिउत्साही तरुणांमुळे शिवाजी महाराजांच्या जयंतीला गालबोट लागत असल्याची भावना शिवप्रेमींनी व्यक्त केली.

कोल्हापूर जिल्ह्यातीलच करवीर तालुक्यातील वडणगे गावातही एक संतापजनक प्रकार घडला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला पुतळ्यासमोर स्टेज उभारत अश्लील नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या अश्लील नृत्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त करण्यात आला.

खासदार डॉ. अमोल कोल्हेंच्या व्याख्यानाला विरोध

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेते आणि आता खासदार असलेल्या डॉ. अमोल कोल्हेंच्या पुणे विद्यापीठातील व्याख्यानाला विरोध करण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आज (२० फेब्रुवारी) डॉ. अमोल कोल्हे यांचे व्याख्यान होत आहे. या पार्श्वभूमीवर काही विद्यार्थ्यांनी कुलगुरूंना पत्र लिहून या व्याख्यानाला राजकीय व्यक्ती येत असल्यामुळे राजकीय स्वरूप प्राप्त होईल, असा आक्षेप घेतला. तर कोल्हे यांच्या समर्थनार्थही विद्यार्थ्यांचा एक गट उतरला होता.