महेश सरलष्कर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काँग्रेसचे मुखपत्र ‘’नॅशनल हेराल्ड’’शी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना सोमवारी चौकशीसाठी बोलावले. हे निमित्त साधून काँग्रेसने भाजपविरोधात जबरदस्त शक्तिप्रदर्शन करण्याची संधी घेतली. दिल्लीतील अकबर रोडवरील मुख्यालयातून एक किमीची पदयात्रा काढून राहुल गांधी अब्दुल कलाम आझाद रोडवरील परिवर्तन भवनातील ईडीच्या कार्यालयात जातील, हा निर्णय घेण्यात आला. या पदयात्रेला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर काँग्रेसने भाजपची तुलना ब्रिटिशांशी तर, पदयात्रेची तुलना स्वातंत्र्यसंग्रामाशी करून राहुल गांधी यांच्या चौकशीला नैतिकेचे आवरण देण्याचा प्रयत्न केला.

राहुल गांधी वाजतगाजत ईडी कार्यालयात जाणार असल्याने काँग्रेसने खासदारांना आणि अन्य पदाधिकाऱ्यांना दिल्लीत पाचारण केले. सोमवारी सकाळपासून काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते मुख्यालयाबाहेर जमले होते. त्यांनी प्रचंड निदर्शन केली, घोषणाबाजी केली. काँग्रेसच्या मुख्यालयाबाहेर ‘’सत्यमेव जयते’’चे मोठ-मोठे फलक लावण्यात आले होते. पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली व बसगाड्यांमध्ये बसवून त्यांना ताब्यात घेण्यात आले. नुपूर प्रकरणानंतर देशभर धार्मिक तणाव असल्याने दिल्लीत सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून अशा परिस्थिती पदयात्रा काढण्यास परवानगी दिली जाऊ शकत नाही, असे पत्र रविवारी दिल्ली पोलीस उपायुक्त अमृता गुगुलाथी यांनी काँग्रेसला पाठवले होते. काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या अकबर रोड परिसरातील रस्त्यांची नाकाबंदी करण्यात आली. ईडी कार्यालयाच्या परिसरातही नाकाबंदी केली गेली व तिथे जमाव बंदी लागू करण्यात आली. दोन्ही ठिकाणी चार-पाच किमीच्या अंतरात पोलीस बंदोबस्तही वाढण्यात आला. राहुल गांधींचे निवासस्थान असलेल्या तुघलक लेन भागांतही पोलीस तैनात केले गेले. पोलिसांकडून झालेली धरपकड आणि बंदोबस्तामुळे ल्युटन्स दिल्लीला छावणीचे स्वरूप आले. एकप्रकारे काँग्रेसच्या मोर्चाला आणि शक्तिप्रदर्शनला केंद्र सरकारकडून चाप लावण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसले.

सोमवारी सकाळी कार्यकर्त्यांच्या धरपकडीमुळे संतप्त झालेल्या काँग्रेसने भाजपची तुलना ब्रिटिशांशी तर राहुल गांधींच्या पदयात्रेची तुलना स्वातंत्र्यसंग्रामाशी केली. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सकाळी ९ वाजता पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर शाब्दिक हल्लाबोल केला. स्वातंत्र्यसंग्रामात ‘’नॅशनल हेराल्ड’’ची महत्त्वाची भूमिका होती म्हणूनच ब्रिटिशांनी या वृत्तपत्रावर १९४२-४५ या  काळात बंदी घातली होती. ब्रिटिशांचे वंशज (भाजप) आताही नॅशनल हेराल्डचा आवाज दाबू पाहात आहे. शांततेने आणि गांधीवादी पद्धतीने पदयात्रा काढणे हा गुन्हा आहे का? वृत्तपत्र चालवणे गुन्हा आहे? स्वातंत्र्यसंग्रामाची थोर परंपरा चालू ठेवणे गुन्हा आहे का? असे गुन्हे काँग्रेस पुन्हा करेल. भाजपच्या पूर्वजांनी (सावरकर) ब्रिटिशांसमोर विनवणी केली, माफी मागितली पण, काँग्रेस भाजपसमोर झुकणार नाही, माफी मागणार नाही, सत्यासाठी काँग्रेस लढत राहील, अशी आक्रमक भूमिका रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत घेतली.

केंद्र सरकार भ्रष्टाचारी असून या देशाचे पंतप्रधान उद्योजकांना कंत्राट मिळवून देण्यासाठी फ्रान्स आणि श्रीलंकेच्या सरकारांना शिफारशी करतात. निवडणुका जिंकण्यासाठी ‘’ईडी’’चा गैरवापर करतात. ईडी म्हणजे निवडणूक जिंकण्याचे यंत्र झाले आहे. ब्रिटिश पोलिसांच्या मागे लपून स्वातंत्र्यसंग्रामातील कार्यकर्त्यांची गळचेपी करत असत. आत्ता भाजप पोलिसांच्या आणि ईडीच्या मागे लपून सत्या मांडू पाहणाऱ्या काँग्रेसची गळचेपी करत आहेत. पण, गोडसेचे वंशज (भाजप) गांधीवादाला संपवू शकणार नाहीत, असा नैतिक पवित्रा सुरजेवाला यांनी घेतला.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Comparison of bjp with british and comparison of congress with freedom fight march print political news pkd
First published on: 13-06-2022 at 13:43 IST