अमरावती : प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष, माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मशाल आंदोलनाच्या निमित्ताने शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. बच्चू कडू यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निवासस्थानासमोर मशाल पेटवून सरकारला इशारा दिला. आगामी काळात हा संघर्ष आणखी पेटण्याचे संकेत मिळाले आहेत.
रायगड येथील दिव्यांगांच्या प्रश्नावरील आंदोलनानंतर मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर गेल्या सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांगांच्या विविध मागण्यांसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. बच्चू कडू यांच्या एकूण २२ पैकी १९ मागण्या मंजूर झाल्याने आंदोलनाला यश मिळाल्याचा दावा प्रहार जनशक्ती पक्षातर्फे करण्यात आला होता.
पण, शेतकरी कर्जमाफीची मागणी मान्य न झाल्याने बच्चू कडू यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार शुक्रवारी रात्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात प्रहारच्या कार्यकर्त्यांनी राज्यात ठिकठिकाणी मंत्री आणि सत्तारूढ आमदारांच्या निवासस्थानासमोर मशाल पेटवून आंदोलन केले. बच्चू कडू यांनी स्वत: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या घरासमोर आंदोलन केले.
निवडणूक काळात महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. सत्ता मिळाल्यानंतर संबंधिताना त्याचा विसर पडला. विविध कारणांनी अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची आवश्यकता असल्याचे बच्चू कडू यांचे म्हणणे आहे.
विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुतीसोबत असलेल्या बच्चू कडू यांनी थेट सरकारविरोधी भूमिका घेतली. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला, पण आक्रमक नेता म्हणून त्यांनी आपली ओळख जपली आहे. बच्चू कडू हे चार वेळा निवडून आले. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात ते शालेय शिक्षण राज्यमत्री होते. नंतर ते गुवाहाटीला पोहचले आणि एकनाथ शिंदे यांच्या सरकारला पाठिंबा जाहीर केला. त्यावरून त्यांच्यावर टीका देखील झाली. पण, सरकारमध्ये असूनही ते अस्वस्थ होते.
निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे बच्चू कडू यांच्या घरी जाऊन भेटले, त्याचीही वेगळी चर्चा रंगली. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर बच्चू कडू यांनी दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियानाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. उद्या आंदोलनाची वेळ आल्यास अडचण नको म्हणून माझी व्यक्तिगत सुरक्षा काढून घ्या, असे पत्र त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे.
सरकारला कर्जमाफीची आठवण देण्यासाठी बच्चू कडू यांनी रंगपंचमीच्या दिवशी रस्ते रंगवून आंदोलन केले होते. महायुती सरकारने आपल्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केली होती, परंतु अद्याप ती पूर्ण न झाल्याने बच्चू कडू यांनी शासनाविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती. शेतकऱ्यांची कर्जमाफी केव्हा करणार? की भगवा, हिरवा, निळा या रंगातच राजकारण करणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी योग्यवेळी कर्जमाफीचा निर्णय सरकार घेईल, असे वक्तव्य केले, त्यावर कर्जमाफीसाठी मुहूर्त शोधत आहे का, असा सवाल करीत बच्चू कडू यांनी सरकारवर टीका केली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न धसास लावण्याचा बच्चू कडू यांचा प्रयत्न राहणार आहे. त्यात सरकार आणि प्रहार जनशक्ती पक्षात संघर्ष वाढत जाण्याची चिन्हे आहेत.