scorecardresearch

सूरजागडविषयी काँग्रेसच्या भूमिकेने संभ्रम ?

ऐनवेळी भूमिका बदलल्याने नाना पटोलेंना देखील सत्ताधाऱ्यांप्रमाणे खाणीमुळे झालेला ‘अदृश्य’ विकास दिसला की काँग्रेस नेत्याच्या दीडशे ट्रक्समुळे काँग्रेसने ‘ट्रॅक’ बदलला, अशा चर्चा सुरू झाली आहे.

Surajgarh, Gadchiroli, Congress , Nana Patole
सूरजागडविषयी काँग्रेसच्या भूमिकेने संभ्रम ? ( छायाचित्र – लोकसत्ता टीम )

सुमित पाकलवार

गडचिरोली : बहुचर्चित सूरजागड प्रकल्पामध्ये सर्वच आलबेल नसून अवैध उत्खनन तसेच वृसक्षतोड झाली आहे. वाहतुकीमुळे रस्त्यांची अवस्था वाईट आहे. प्रदूषण वाढत आहे. एवढ्यावरच न थांबता यामुळे नक्षलवादाला बळ मिळत आहे. असे अनेक गंभीर आरोप करून काही महिन्यांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खळबळ उडवून दिली होती. याविरोधात आपण सूरजागड येथे जाऊन आंदोलन करणार असे दोनदा जाहीर देखील केले. परंतु अद्याप ते आले नाही. यामुळे त्यांच्या भूमिकेविषयी नागरिकांमध्ये संभ्रम पाहायला मिळत आहे.

हेही वाचा… चंद्रशेखर राव यांना राज्यात पाठिंबा मिळणार?

नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे आणि आदिवासी नागरिकांच्या विरोधामुळे सूरजागड टेकडीवर उत्खनन सुरू करायला प्रशासनाला तब्बल दोन दशके वाट पाहावी लागली. उच्च दर्जाचे लोह खनिज असल्याने यावर अनेकांचा डोळा होता. मागील दीड वर्षांपासून लॉयड मेटल्स कंपनीने सूरजागड टेकडीवर उत्खनन सुरू केले आहे. मात्र, विविध आरोपांनी हे उत्खनन चर्चेत आहे. मागील वर्षी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे अतिवृष्टीची पाहणी करण्याकरिता गडचिरोलीला आले होते. त्यावेळेस त्यांनी सूरजागड टेकडीवर अवैध उत्खनन सुरू आहे. तेथे अवैध वृक्षतोड झाली. रस्त्यांची अवस्था वाईट आहे. प्रदूषण वाढत आहे. असे अनेक आरोप केले. त्यामुळे येत्या काही दिवसात प्रदेश काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांसह सूरजागड येथे जाऊन आंदोलन करणार असे सांगितले. तशी तारीख देखील जाहीर केली होती. मात्र, काही कारणांनी ती पुढे ढकलण्यात आली. त्यांनतर हिवाळी अधिवेशनात तर नानांनी इतर मुद्द्यांसह या प्रकल्पामुळे नक्षलवादाला बळ मिळत आहे. असा गंभीर आरोप केला होता. तेव्हा देखील काँग्रेसकडून सूरजागड येथे आंदोलनाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यांनतर मात्र पाणी कुठे मुरले, हे कुणालाच ठाऊक नाही.

हेही वाचा…सावरकरांच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला टोचले आणि भाजपला दिले प्रत्युत्तर

सूरजागडमुळे खराब झालेले रस्ते, वाढेलेले प्रदूषण, स्थानिक रोजगाराचा प्रश्न आणि अवजड वाहतुकीमुळे नागरिक त्रस्त आहेत. अशात नेत्यांनी किमान त्यांची बाजू ऐकून घ्यावी एवढी अपेक्षा आहे. मात्र, मोठे नेते केवळ आश्वासन देतात आणि खाण पर्यटन करून जातात. असे नागरिकांचे म्हणणे आहे. पण नानांनी ज्या ठामपणे सांगितले होते. त्यामुळे येथील लोकांचा मनात आशा पल्लवित झाली होती. मात्र, ऐनवेळी भूमिका बदलल्याने नानांना देखील सत्ताधाऱ्यांप्रमाणे खाणीमुळे झालेला ‘अदृश्य’ विकास दिसला की काँग्रेस नेत्याच्या दीडशे ट्रक्समुळे काँग्रेसने ‘ट्रॅक’ बदलला, अशा चर्चा सुरू झाली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-03-2023 at 13:41 IST

संबंधित बातम्या