नवी दिल्ली : काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स या दोन्ही पक्षांनी जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणूक एकत्र लढवण्याचा निर्णय घेतला असला तरी, जागावाटपावरून जबरदस्त रस्सीखेच सुरू झाली आहे. ज्या जागांवर एकमत होणार नाही तिथे, मैत्रीपूर्ण लढती झाल्या तरी चालतील, अशी आक्रमक भूमिका काँग्रेसने घेतल्याचे सांगितले जाते.
श्रीनगरमध्ये शुक्रवारी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नॅशनल कॉन्फरन्सचे सर्वेसर्वा फारूक अब्दुल्ला व ओमर अब्दुल्ला यांच्यासोबत सविस्तर चर्चा करून द्वीपक्षीय आघाडीवर शिक्कामोर्तब केले. या निवडणूक करारामध्ये जम्मू विभागात काँग्रेसने तर, काश्मीर विभागामध्ये नॅशनल कॉन्फरन्सने अधिक जागा लढवणे अपेक्षित आहे. पण, काँग्रेसने काश्मीर खोऱ्यातही जास्त जागांचा वाटा पदरात पाडून घेण्याचा खटाटोप सुरू केल्यामुळे आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा : नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेसमध्ये आघाडी; जम्मू आणि काश्मीरमधील सर्व ९० जागांचे वाटप लवकरच
विधानसभेच्या ९० जागांपैकी जम्मू विभागात ४३ तर, काश्मीर विभागामध्ये ४७ जागा आहेत. काश्मीर खोऱ्यातील किमान ११ जागांची काँग्रेसने मागणी केली आहे. यामध्ये श्रीनगर जिल्ह्यातील पाच जागांचाही समावेश असल्याचे सांगितले जाते. काश्मीर खोऱ्यामध्ये काँग्रेसची ताकद नसेल तर जास्त जागा कशासाठी द्यायचा, असा थेट प्रश्न अब्दुल्लांनी काँग्रेसच्या नेत्यांना केला. काँग्रेसने काश्मीर खोऱ्यापेक्षा जम्मू विभागात लक्ष केंद्रीत करावे, जम्मूमधील ११ पैकी ९ जागा आम्ही काँग्रेसला द्यायला तयार आहोत, असे अब्दुल्लांनी खरगे-गांधी यांना सांगितले. पण, राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेनंतर काश्मीर खोऱ्यात लोकांचा पाठिंबा मिळू शकतो असे काँग्रेसला वाटू आहे. त्यामुळे खोऱ्यात तुलनेत अधिक जागांची मागणी काँग्रेसने केली आहे.
हेही वाचा : ‘SC, ST आरक्षणात वर्गीकरण नको’, अन्यथा ‘भारत बंद’ पेक्षाही मोठे आंदोलन करू; केंद्र सरकारला संघटनांचा इशारा
काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स यांच्यामध्ये बहुतांश जागांबाबत सहमती होऊ शकते. उर्वरित जागांवर अखेरपर्यंत सामंजस्य झालेच नाही तर त्या जागांवर दोन्ही पक्षांनी मैत्रीपूर्ण लढत द्यावी, असे खरगेंनी सुचवल्याचे समजते. पण, मैत्रीपूर्ण लढती विरोधकांच्या ऐक्यासाठी घातक असून त्याचा फायदा भाजपला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काश्मीर खोऱ्यामध्ये भाजपचे अस्तित्व नगण्य असले तरी जम्मू विभागांतील जागांवर भाजपला काँग्रेसविरोधात प्रचाराचा मुद्दा मिळू शकतो. पीर-पंजाल प्रदेशामध्ये ६ जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव असून तिथे काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स याची आघाडी आणि भाजप यांच्यामध्ये तुल्यबळ लढती होण्याची शक्यता आहे. इथे आघाडीने भाजपवर मात केली तर केंद्रातील सत्ताधारी पक्षाला मोठा फटका बसू शकतो.