नांदेड : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि त्यांचा परिवार भाजपावासी झाल्यामुळे चव्हाण कुटुंबाने प्रतिनिधित्व केलेल्या भोकर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रथमच वाव मिळाला असून चव्हाण यांनी भाजपाच्या उमेदवारीसाठी मुंबईत वास्तव्य केलेल्या आपल्या कन्येचे नाव पुढे आणल्यानंतर काँग्रेस पक्षातील तरुण कार्यकर्त्यांनी भोकरचा आमदार भूमिपुत्रच हवा, असा नारा देत प्रचार सुरू केला आहे. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर भोकर विधानसभेचे प्रतिनिधित्व चव्हाण, गोरठेकर आणि किन्हाळकर या तीन राजकीय घराण्यांकडेच राहिले. गेल्या ६० वर्षांत तेथे काँग्रेससह कोणत्याही पक्षाकडून कार्यकर्त्यास संधी मिळालीच नाही. २००९ साली नव्या रचनेसह आकारास आलेल्या या मतदारसंघाचा सातबारा आपल्या नावावरच राहील याची दक्षता अशोक चव्हाण यांनी घेतली. सहा महिन्यांपूर्वी त्यांनी रिक्त केलेल्या या मतदारसंघांतून विधानसभेवर जाण्यासाठी काँग्रेस पक्षात आता अनेक कार्यकर्ते समोर आले आहेत. त्यांत काही अनुभवी कार्यकर्त्यांसह उच्चशिक्षित तरुणांचाही समावेश आहे.२०१४च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसश्रेष्ठींनी तत्कालीन जिल्हाध्यक्ष बी.आर.कदम यांचे नाव उमेदवारीसाठी निश्चित केले होते; पण ऐनवेळी त्यांच्यावर दबावतंत्राचा प्रयोग करून त्यांची लेखी असमर्थता घेण्यात आल्यानंतर शेवटी अमिता अशोक चव्हाण काँग्रेसतर्फे उभ्या राहिल्या आणि निवडून आल्या. २०१९ मध्ये अशोक चव्हाण यांचा लोकसभेला पराभव झाल्यामुळे पुढे त्यांनी भोकरमधूनच विधानसभेमध्ये आपले पुनर्वसन करून घेतले. हेही वाचा - भंडारा जिल्ह्याला महिला आमदाराचे वावडे! चव्हाण कुटुंब भाजपात गेल्यानंतर श्रीजया अशोक चव्हाण यांनी भोकरमधून विधानसभेची तयारी सुरू केल्यामुळे भाजपात मागील अनेक वर्षांपासून काम करणार्या कार्यकर्त्यांची संधी हिरावली गेली. पक्षाने चव्हाण यांना राज्यसभेवर पाठविल्यानंतर भोकरमध्ये त्यांच्या भक्कम पाठिंब्याने कार्यकर्त्यांतून एखाद्यास विधानसभेची उमेदवारी मिळणे अपेक्षित असले, तरी आतापर्यंतच्या घडामोडींत भाजपा नेतृत्वाकडून तशा हालचाली नसल्यामुळे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. श्रीजया चव्हाण यांच्या प्रचार मोहिमेत भाजपा पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांस कोठेही वाव राहिला नसल्याच्या मुद्यावर जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख यांनी आपली नाराजी व्यक्त केली, तर त्यांच्याच कार्यकारिणीतील सुहास पाटील डोंगरगावकर यांनी भाजपाला रामराम ठोकत नुकताच काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. त्यांचे ज्येष्ठ बंधू चव्हाणांच्या कारखान्यात कार्यकारी संचालक असले, तरी सुहास पाटील काँग्रेसच्या उमेदवारीसाठी शर्यतीत उतरले आहेत. हेही वाचा - आंध्र, बिहारच्या अर्थसंकल्पीय निधी वाटपावरून वाद; गेल्या काही वर्षांत राज्यांना पैश्यांचे वाटप कसे केले गेले? भोकर मतदारसंघात चव्हाण कुटुंबाचा कधीच पराभव झाला नाही. जनतेने त्यांना नेहमीच भरभरून पाठींबा दिला. १९७८ साली बिकट परिस्थिती असतानाही शेवटी शंकरराव चव्हाण निवडून आले होते. पण ज्या काँग्रेस पक्षाने चव्हाण कुटुंबाला साथ आणि सत्ता दिली, त्या पक्षाच्या विरोधात आपल्या परिवारातील चौथा प्रतिनिधी उभा करण्याचे पाऊल चव्हाण दाम्पत्याने टाकल्यानंतर भोकर मतदारसंघात काँग्रेस पक्षासोबत खंबीरपणे उभ्या राहणार्या कार्यकर्त्यांनी ‘भूमिपुत्र’ हे कार्ड बाहेर काढत समाजमाध्यमांतून मोहीम सुरू केली आहे. बारडमधील संदीपकुमार देशमुख या तरुणाने मागील एक महिन्यांपासून सुरू केलेली ही मोहीम हळूहळू प्रभावी होत आहे. भोकरमध्ये काँग्रेसच्या उमेदवारीसाठी आतापर्यंत आठ कार्यकर्त्यांनी पक्षाकडे अर्ज सादर केले असून त्यांत देशमुख यांचाही समावेश आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी.आर.कदम, माजी आमदार दिवंगत साहेबराव बारडकर यांचे नातू संदीप देशमुख बारडकर, सुभाष पाटील किन्हाळकर, युवक काँग्रेसचे बालाजी पाटील गाढे, भोकरचे गोविंदबाबा गौड तसेच प्रकाश देशमुख कल्याणकर यांचाही उमेदवारी मागणार्यांत समावेश आहे. भोकर मतदारसंघात प्रस्थापित नेत्याविरुद्ध लढण्यासाठी अनेक भूमिपुत्र पुढे येत आहेत, ही बाब समृद्ध लोकशाहीसाठी पोषक असल्याचे संदीपकुमार देशमुख यांनी नमूद केले. काँग्रेस पक्षाचे नेते एकंदर परिस्थितीचा साकल्याने विचार करून इच्छुकांपैकी एखाद्यास उमेदवारी देतील; पण जनतेने विशेषतः युवा वर्गाने भूमिपुत्रच आमदार झाला पाहिजे, ही भूमिका उचलून धरावी अशी अपेक्षा देशमुख यांनी व्यक्त केली आहे.