नंदुरबार – राज्यात सत्तेसाठी एकमेकाच्या हातात हात घेऊन चालणाऱ्या शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये नंदुरबार जिल्ह्यात विस्तवही जात नसल्याची स्थिती आहे. नंदुरबारमधील सत्तेच्या संघर्षात भाजप-शिंदे गट परस्परांची उणीदुणी काढण्यात मग्न असल्याचा अप्रत्यक्ष फायदा काँग्रेसला होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नंदुरबारच्या राजकारणात आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित आणि शिवसेना शिंदे गटाचे चंद्रकांत रघुवंशी हे चाणक्य मानले जातात. जिल्ह्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्था काबीज करण्यासाठी त्यांच्यातील चढाओढ नेहमीच राजकारणाचा केंद्रबिंदू राहिली आहे. अशातच भाजपवासीय झाल्यानंतर डॉ. विजयकुमार गावित आणि शिवसेनेत प्रवेश केलेल्या चंद्रकांत रघुवंशी यांच्यात गत विधानसभेवेळी मैत्रीचे सूत जुळले. मात्र क्षणिक ठरलेल्या या मैत्रीत जिल्हा परिषद निवडणूक पुन्हा एकदा वादाचे कारण ठरली. अलीकडेच झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये जिल्ह्यातील सहापैकी तीन बाजार समित्यांवर शिवसेना पदाधिकारी सभापती म्हणून निवडून आले. या बाजार समित्यांमध्ये त्यांनी भाजप सोडून काँग्रेसशी केलेली हातमिळवणी चर्चेचा विषय ठरली. भाजप शिवसेनेच्या शिंदे गटाला सोबत घेऊन राजकारणास अनुत्सुक असल्याने त्याचा अप्रत्यक्ष लाभ काँग्रेसला होत आहे.

हेही वाचा – बुलढाण्याच्या जागेवरून आघाडी तसेच युतीतही चढाओढ

जिल्हा परिषदेत भाजपने काँग्रेसच्या फुटीर गटासोबत तसेच ठाकरे गटाला गळाशी लावून सत्ता स्थापन केली, तर बाजार समित्यामध्ये काँग्रेस आणि शिवसेनेच्या शिंदे गटाची जवळीक नंदुरबारच्या खिचडी राजकारणात भर घालत आहे. आगामी नंदुरबार नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, शिवसेना आणि भाजपमध्ये आरोपांची चिखलफेक सुरू झाली आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदीर लगतच डोमवर नगर परिषदेच्या परीविक्षाधीन अधिकाऱ्यांनी केलेली कारवाई त्याला कारणीभूत ठरली. चुकीच्या माहितीच्या आधारे भाजपच्या बड्या नेत्यांनी केलेली कारवाई नागरीकांसाठी गैरसोईची असल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे. तर भाजपने यात कोट्यवधींचा भ्रष्ट्राचार झाल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे या बाबत वास्तव काय ते पालिका प्रशासनाच्या खुलाश्यानंतर स्पष्ट होईल . मात्र स्थानिक पातळीवर भाजप आणि शिवसेनेतील वाद मिटणार की वाढत जाणार, हे पुढील काळात लक्षात येईल.

हेही वाचा – कर्नाटकचे सूत्र काँग्रेस राज्यातही राबविणार

शिवसेनेत उभी फूट पडण्याआधी भाजप-शिवसेनेत फारसे सलोख्याचे संबंध नव्हते. दोन्ही मित्रपक्षांत अनेक मुद्यांवरून मतभेद होत असत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर मात्र राज्य पातळीवर शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यातील संबंध दृढ झाले. स्थानिक राजकारणातील वास्तव मात्र वेगळेच असल्याचे नंदुरबारच्या राजकीय कुरघोड्यांवरून लक्षात येते. आदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्यातील राजकारणात सत्तेसाठी कुठल्याही तडजोडी करण्यास मागेपुढे पाहिले जात नाही. जिल्हा परिषदेत भाजपने काँग्रेस आणि ठाकरे गटातील सदस्यांना गळाला लावून सत्ता प्राप्त केली. बाजार समिती सभापती निवडणुकीत शिवसेनेने भाजपपेक्षा इतरांशी सूत जुळविण्यात धन्यता मानली. दोन्ही पक्षांच्या वादात काँग्रेसची चांदी होत असल्याचे चित्र आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress benefits from bjp shinde faction dispute in nandurbar print politics news ssb
Show comments