मुंबई : काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पक्ष, कम्युनिस्ट पक्ष अशा सर्वपक्षीयांचे झेंडे घेतलेले शेकडो कार्यकर्ते, फटाक्यांचा दणदणाट, तुतारीचा निनाद, दुकानदार, व्यापारी संघ, विविध संस्थांचे पदाधिकारी यांच्याकडून पाटील यांना अभिवादन व सत्कार, हे उत्तर मुंबईतील महाविकास आघाडीचे उमेदवार भूषण पाटील यांच्या शनिवारच्या प्रचारफेरीतील चित्र. स्थानिक नेते असलेल्या पाटील यांच्या प्रचारफेरीत सर्व जातीधर्मीयांचा सहभाग, हे वैशिष्ट्य होते.

अगदी शेवटच्या टप्प्यात उमेदवारी जाहीर झाली, तरी स्थानिक नेते असलेल्या पाटील यांच्या प्रचारयात्रेत दांडगा उत्साह आणि काँग्रेसबरोबरच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा सहभाग लक्षणीय. मालाड (पूर्व) मधील वागीश्वरी मंदिरात दर्शन घेऊन पाटील शनिवारी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास निघाले. दत्तमंदिर मार्गाने ही प्रचारफेरी मालाड रेल्वेस्थानक परिसरातून, बाजारपेठेतून हळूहळू पुढे सरकत होती. फेरीवाले, दुकानदार, आजूबाजूच्या इमारतींमधील नागरिक आपल्या घराच्या खिडक्या, बाल्कनीमध्ये येऊन हात उंचावून अभिवादन करीत होते. हा मतदारसंघ हा तसा भाजपचा गड आणि प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी निवडणूक लढविली, तेव्हा त्यांच्या प्रचारफेरीच्या ठिकाणी अनेकदा नागरिक मोदींच्या घोषणा देत होते. पण आता बदललेल्या वातावरणातील फरक जाणवण्यासारखा असल्याचे एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा – इंदूरमध्ये काँग्रेसचा ‘NOTA’साठी प्रचार; भाजपा अडचणीत?

वाटेत भाजी विक्रेते, व्यापारी संघ यांनी पाटील यांचे अभिनंदन केले. मशिदीतील मौलवी, व्यापारी संघाचे पदाधिकारी आदींचे सत्कार प्रचार रथावरून खाली उतरून पाटील यांनी आशीर्वाद घेतले. मराठी, हिंदी, गुजरातीतून पाटील यांचा प्रचार करण्यात येत होता. काँग्रेसने पाच ‘ न्याय ‘ जनतेला देण्यासाठी दिलेली गॅरंटी, गॅस सिलेंडरचे काँग्रेस काळात असलेले दर आणि आजचे दर, भाजीपाला, डाळींचे वाढलेले दर अशा विविध मुद्द्यांवर प्रचार करण्यात येत होता. मालाड येथील पुलाचे काम, फेरीवाल्यांच्या अडचणी अशा विविध मुद्द्यांचा उल्लेख केल्यावर नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता.

दत्तमंदिर रोडने रेल्वे व मेट्रो स्थानक परिसरातून ही प्रचारफेरी कांदिवली पूर्वपर्यंत गेली आणि तिला उत्साही प्रतिसाद मिळत होता. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर हेही पाटील यांच्या प्रचारात सहभागी झाले. दरवर्षी दीड कोटी रोजगार देण्याचे आश्वासन मोदी सरकारने दिले होते. पण ते झाले नाही व बेरोजगारी वाढत आहे. करांचे व महागाईचे ओझे सर्वसामान्यांवर वाढले आहे. गेल्या दहा वर्षांत देशाची वाट लावली असल्याची टीका थरूर यांनी केली. पाटील हे स्थानिक उमेदवार असून काँग्रेसचा हात, विकासाला साथ, असा नारा असल्याचे थरूर यांनी नमूद केले.

हेही वाचा – ना बालाकोट, ना राम मंदिराचा प्रभाव; मोदींनी विरोधकांसमोर गुडघे टेकल्याचा अधीर रंजन चौधरींचा दावा

भाजपचा गड असलेल्या मतदारसंघात पाटील हे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याशी तुल्यबळ लढत देवू शकणार नाहीत, असे अंदाज वर्तविले गेले. पण पाटील यांनी जनसामान्यांशी थेट संपर्क असलेला आणि जनतेच्या प्रश्नांची जाण असलेला स्थानिक उमेदवार या मुद्द्यावर प्रचार गुंफला आहे. बोरीवली (प.) तील प्रचाराच्या मुख्य कार्यालयातून सर्व नियोजन होत असून प्रचारसाहित्य व अन्य बाबी मतदारसंघात पदाधिकाऱ्यांकडे पोहोचविल्या जात आहेत. सकाळी नऊपासून दुपारी एक आणि सायंकाळी पाच ते दहा वाजेपर्यंत प्रचारफेऱ्या, सभांचे नियोजन असून नियमित संपर्क असल्याने मतदारसंघात प्रचारफेरीचा एक टप्पा पूर्ण झाला असल्याचे पाटील यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. माझ्याकडे गेली वर्षानुवर्षे नागरिक आपल्या समस्या घेऊन येतात व मी त्यांना मदत करीत आहे. काँग्रेसबरोबर, ठाकरे गट, आम आदमी पक्षाचे व मुस्लिम कार्यकर्ते प्रचारात उतरले असून मी शिवसेनेच्या प्रत्येक शाखेत भेट देत आहे आणि ते जोमाने तयारी करीत आहेत, असे पाटील यांनी नमूद केले. सर्वधर्मीय आणि सर्वपक्षीय कार्यकर्ते कामाला लागले असल्याचा प्रत्यय प्रचारफेरीतही येत होता.