राजेश्वर ठाकरे
नागपूर : उदयपूर चिंतन शिबिरात काँग्रेसने केलेल्या ‘एका कुुटुंबातील एकाच सदस्याला उमेदवारी’ या ठरावातील काही पळवाटांमुळे या ठरावाचा कोणताही परिणाम विदर्भातील काँग्रेसच्या घराणेशाहीवर होणार नाही आणि कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना पटापट उमेदवारी खुली होणार नाही, असे सध्याचे चित्र समोर आले आहे.
काँग्रेसचे नुकतेच उदयपूर येथे चिंतन शिबीर पार पडले. त्यात पक्षातील घराणेशाहीला पायबंद घालण्यासाठी एका कुुटुंबातील एकाच सदस्यला निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याचा ठराव घेतला. मात्रकुटुंबातील सदस्य पाच वर्षांपासून राजकारणात सक्रिय असेल तर त्याला हा ठराव लागू होणार नाही, अशी पळवाटही त्यात घालण्यात आली. या पळवाटेचा फायदा विदर्भातील काँग्रेसच्या राजकीय घराण्यांना होण्याची शक्यता आहे. कारण बहुतांश आमदार, खासदार, मंत्री, माजी मंत्र्यांची मुले-मुली एनएसयूआय, युवक काँग्रेसमध्ये पाच वर्षे किंवा त्याहून अधिक काळापासून सक्रिय आहेत, पदाधिकारी आहेत. त्यामुळे आगामी कोणत्याही निवडणुकांसाठी उमेदवारी मागताना त्यांना उदयपूर ठराव लागू होणार नाही, असे दिसते.
ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत त्यांचे पुत्र कुणाल, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार त्यांची कन्या शिवानी यांच्यासाठी त्यांचे वडील पुढील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळवण्याचे प्रयत्न करतील. कुणाल राऊत यांची अलीकडेच प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली तर शिवानी वडेट्टीवार या युवक काँग्रेसच्या पदाधिकारी आहेत. महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांची लेक आकांक्षा ठाकूर एनएसयूआयच्या पदाधिकारी आहेत तर आमदार विकास ठाकरे यांचे पुत्र केतन ठाकरे युवक काँग्रेसचे पदाधिकारी आहेत. माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांचे सुपुत्र विशाल मुत्तेमवार, माजी आमदार वीरेंद्र जगताप यांचे पुत्र परीक्षित जगताप हे देखील पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीवर आहेत. माजी मंत्री माणिकराव ठाकरे यांचे पुत्र राहुल ठाकरे यांना यापूर्वी विधानसभेची उमेदवारी मिळाली आहे. माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या पुत्र राहुल पुगलिया यांनी विधानसभा निवडणूक लढवली आहे.
अकोला जिल्ह्यात माजी मंत्री अजहर हुसेन यांचे पुत्र जिशान हुसेन आणि माजी आमदार सुधाकरण गणगणे यांचे पुत्र महेश गणगणे, माजी आमदार लक्ष्मणराव तायडे यांचे पुत्र प्रकाश तायडे गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत. अमरावती जिल्ह्याचा विचार केला तर विद्यमान आमदार सुलभा खोडके, माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख यांचे पुत्र अद्यापतरी पक्ष संघटनांमध्ये सक्रिय नाहीत. मात्र, ज्या नेत्यांची पुढची पिढी पूर्वीपासून पक्षात सक्रिय असेल, त्यांना उमेदवारी देण्यात हा ठराव बाधा ठरू शकणार नाही. त्यामुळे काँग्रेसमधील बहुतांश ज्येष्ठ नेत्यांना व त्यांच्या घराण्यातील वारसदारांना या ठरावाचा फटका बसण्याची शक्यता नाही.
राज्यातील काँग्रेसच्या एकमेव खासदाराची पत्नी आमदार
सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आले आणि खासदार झाले. ते काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार आहेत. त्यांच्या पत्नी प्रतीक्षा धानोरकर या काँग्रेसच्या आमदार आहेत. पण २०२४ मध्ये दोघांनाही कॉंग्रेसमध्ये येऊन पाच वर्षे झालेली असतील व त्यामुळे कदाचित त्यांनाही खासदारकी व आमदारकी आपल्याच घरात ठेवण्यात या ठरावाचा अडथळा येणार नाही, अशी शक्यता आहे.