पंजाबमध्ये काँग्रेसचे आमदार तथा ऑल इंडिया किसान काँग्रेसचे अध्यक्ष सुखपालसिंग खैरा यांना २०१५ सालच्या ड्रग्ज तस्करी प्रकरणात अटक करण्यात आली. या अटकेनंतर काँग्रेसने आक्रमक पवित्रा धारण केला असून पंजाबमधील आम आदमी पार्टी (आप) सरकारवर टीका केली आहे. आप पक्षाने भाजपाप्रमाणे सुडाचे राजकारण करू नये, असे पंजाब काँग्रेसने म्हटले आहे. २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांनी इंडिया नावाने आघाडी केली आहे. या आघाडीत काँग्रेस आणि आप हे दोन्ही पक्ष आहेत. या दोन्ही पक्षात इंडिया आघाडीच्या रूपात युती झालेली असताना दुसरीकडे खैरा यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. या अटकेमुळे पंजाबमध्ये आप विरुद्ध काँग्रेस असा सामना रंगला आहे.
…तर आम्ही शांत बसणार नाही- मल्लिकार्जुन खरगे
खैरा यांच्या अटकेनंतर काँग्रेसचे नेते आप पक्षाविरोधात आक्रमक झाले आहेत. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर टीका केली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीदेखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. “जी व्यक्ती अन्याय करते ती जास्त काळ टिकत नाही. कोणी आमच्यावर अन्याय करत असेल तर आम्ही शांत बसणार नाही”, असे सूचक विधान खरगे यांनी केले. छत्तीसगडच्या दौऱ्यावर असताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.




“भाजपाप्रमाणे सुडाचे राजकारण करू नये”
याच प्रकरणावर काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्यानेही प्रतिक्रिया दिली. “खैरा यांना अटक करण्यात आलेले प्रकरण खूप जुने आहे. ही अटक म्हणजे दुसरे तिसरे काहीही नसून सुडाचे राजकारण आहे. भाजपाप्रमाणे सुडाचे राजकारण करू नये, असे आम्ही आपच्या नेत्यांना स्पष्टपणे सांगितले आहे. आपण सर्वजण भाजपाच्या या वृत्तीविरोधात लढत आहोत. मात्र, आपली सत्ता असलेल्या राज्यांतही आपण एकमेकांविरोधात हेच अस्त्र वापरणार असू तर भाजपा आणि आपल्यात काय फरक उरेल?” असे या नेत्याने आप पक्षाला उद्देशून म्हटले.
आप आणि काँग्रेस यांच्यातील संघर्ष वाढणार?
२०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीच्या रुपात एकूण २८ पक्ष एकत्र आले आहेत. यात आप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचा समावेश आहे. पंजाबमधील काँग्रेसच्या नेत्यांची मात्र या आघाडीबाबत वेगळी भूमिका आहे. काँग्रेसने पंजाबमध्ये आप पक्षाशी आघाडी करू नये, असे येथील नेते म्हणत आहेत. याबाबतची भूमिका प्रदेश नेतृत्वाने काँग्रेस हायकमांडपुढे अनेकवेळा मांडली आहे. असे असतानाच खैरा यांना २०१५ सालच्या एका जुन्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्यामुळे पंजाबमधील काँग्रेसचे नेते आघाडी तसेच आप पक्षाविरोधात जास्त आक्रमक होण्याची शक्यता आहे.
आप पक्षाशी युती नको, पंजाब काँग्रेसची भूमिका
खैरा यांच्या अटकेबाबत पंजाब काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष अमरिंदरसिंग राजा वारिंग यांच्या नेतृत्वात राज्यपालांना निवेदन सादर केले आहे. वारिंग यांच्यासोबत विरोधी पक्षनेते प्रतापसिंग बाजवा तसेच काँग्रेसचे इतर नेते होते. आप पक्षाशी युती करण्याला बाजवा उघड विरोध करतात. त्यांनी खैरा यांच्या अटकेनंतर मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर सडकून टीका केली. आम्ही भगवंत मान सरकारविरोधात जोमाने लढू. सत्ता कायम नसते, असे बाजवा म्हणाले. तसेच त्यांनी पंजाब पोलिसांवरही टीका केली. दुसरीकडे वारिंग यांनी खैरा यांच्या कुटुंबीयांची भेट घेत कायदेशीर लढाईविषयी चर्चा केली. खैरा यांना जामीन मिळावा यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू, असे वारिंग म्हणाले.
खैरा आणि भगवंत मान यांच्यात पूर्वीपासून राजकीय वैर
याच महिन्यात हैदराबाद येथे काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक झाली होती. या बैठकीतही वारिंग यांनी आप आणि काँग्रेस यांच्या युतीचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांनी ही युती होऊ नये, असे मत या बैठकीत व्यक्त केले होते. खैरा आणि बाजवा यांच्यातील वैर जुनेच आहे. त्यांनी अनेकवेळा आम आदमी पार्टीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत. खैरा आप पक्षाचे आमदार असताना त्यांना २०१८ साली विरोधी पक्ष नेतेपदावरून पायऊतार व्हावे लागले होते. पंजाबमध्ये आप पक्षात फेरबदल झाले पाहिजेत, अशी मागणी करणाऱ्या गटाचे त्यांनी नेतृत्व केले होते. याच काळात मान हे संगरूर या मतदारसंघाचे खासदार होते. यावेळी मान यांनी खैरा यांच्यावर ‘ई-नेता’ म्हणत टीका केली होती. खैरा हे फक्त समाजमाध्यमांवरच सक्रिय असतात, असे मान यांना सुचवायचे होते.
भाजपा आणि काँग्रेसची आप पक्षावर टीका
खैरा यांच्या अटक प्रकरणावर भाजपानेदेखील प्रतिक्रिया दिली आहे. “आम आदमी पार्टी पंजाबला ८०-९० च्या दशकात घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे,” असे भाजपाचे राष्ट्रीय सचिव मनजिंदरसिंग सिरसा म्हणाले. आप पक्षावर काँग्रेस आणि भाजपा अशा दोन्ही पक्षांनी टीका केली आहे. काँग्रेस आणि भाजपा हे दोन्ही पक्ष भूतकाळात खैरा यांच्यावर टीका करायचे, आता हेच पक्ष खैरा यांना पाठिंबा देत आहेत, असा पलटवार आप पक्षाने केला.
कायद्यानुसारच कारवाई, आप पक्षाचा दावा
दरम्यान, आप पक्षाचे नेते अलविंदसिंग कांग यांनी खैरा यांच्या अटकेवर प्रतिक्रिया दिली. कायद्यानुसारच खैरा यांच्यावर टीका केली आहे. पोलिसांच्या विशेष तपास पथकाला ड्रग्ज तस्करी प्रकरणात नवी माहिती मिळाल्यामुळेच ही अटक करण्यात आली आहे, असे कांग यांनी सांगितले.