कर्नाटकमध्ये निवडणूक जाहीर झाल्यावर आता प्रमुख पक्ष उमेदवार जाहीर करत आहेत. यात काँग्रेसने आघाडी घेतली. निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होण्यापूर्वीच प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने १२४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. यात दावणगिरी दक्षिण मतदारसंघातील उमेदवार शमनूर शिवशंकराप्पा यांची उमेदवारी लक्षवेधक आहे. उद्योजक, शिक्षणमहर्षी असा लौकीक असलेले शिवशंकराप्पा हे ९१ वर्षांचे आहेत. गेली तीन दशके कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे ते खजिनदार असून वीरशैव महासभेचे अध्यक्ष आहेत. त्यांचे पुत्र शमनूर मल्लिकार्जुन हे दावणगिरी उत्तरमधून पक्षाचे उमेदवार आहेत. एकूणच ९१ व्या वर्षी विधानसभेला उभे राहून प्रचारात सक्रीय सहभाग देणे वैशिष्ठ्यपूर्ण म्हटले पाहिजे. काँग्रेसच्या उमेदवारी यादीतील आणखी एक वैशिष्ठ्यपूर्ण नाव म्हणजे रघुनाथ विश्वनाथ देशपांडे या सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्त्याचे. कायद्याचे पदवीधर असलेले आर.व्ही. देशपांडे आतापर्यंत आठ वेळा विजयी झाले आहेत. हलियाल मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळाली आहे. राज्याचे १३ वर्षे ते उद्योगमंत्री होते. ७६ वर्षीय आर.व्ही. देशपांडे हे नवव्यांदा विजयी होणार काय? याबाबत उत्सुकता आहे. तसेच शिक्षणखाते सांभाळताना कर्नाटकच्या नव्या शैक्षणिक धोरणातही त्यांचा मोलाचा वाटा आहे. राज्यातील एक अभ्यासू राजकीय नेते अशी त्यांची ओळख आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचे देशपांडे हे व्याही आहेत. हेही वाचा - Karnataka : बंगळुरूवर कोणाची पकड? आर्थिक राजधानीवर झेंडा रोवण्यासाठी काँग्रेस-भाजपा-जेडीएसकडून शर्थीचे प्रयत्न हेही वाचा - “सर्वात मोठा हिंदू कोण? भाजपा आणि तृणमूल काँग्रेसच्या स्पर्धेमुळे रामनवमीला हिंसाचार भडकला,” काँग्रेस नेत्याचा आरोप सोराब मतदारसंघात माजी मुख्यमंत्री दिवंगत एस. बंगाराप्पा यांच्या पुत्रांमध्येच लढत होण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसकडून मधू बंगाराप्पा यांना उमेदवारी मिळाली आहे. तर भाजप विद्यमान आमदार व बंगरप्पा यांच्या दुसऱ्या पुत्राला पुन्हा उमेदवारी देईल अशी चिन्हे आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र व विद्यमान आमदार प्रियंक यांचा चित्तपूरमधून उमेदवारी मिळाली आहे. २०१६ मध्ये सिद्धरामैय्या यांच्या मंत्रिमंडळात सर्वात तरुण मंत्री म्हणून त्यांचा समावेश होता. तसेच माहिती तंत्रज्ञान या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. राजधानी बंगळुरूचा या क्षेत्रातील नावलौकीक लक्षात घेता मंत्रिमंडळातील या खात्याचे महत्त्व ध्यानात येते. राज्याच्या राजकारणात भाजप व काँग्रेस व्यतरिक्त धर्मनिरपेक्ष जनता दल रिंगणात आहे. माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्याकडे सारी प्रचाराची धुरा आहे. कुमारस्वामींचे पुत्र निखिल यांना रामनगर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे, तर कुमारस्वामी हे चेन्नपट्टणममधून नशिब आजमावणार आहेत. हा मतदारसंघ बंगळुरूहून ६८ किमी लांब आहे. निखिल हे माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांचे नातू आहेत. आतापर्यंत काँग्रेस तसेच जनता दलाने पहिली उमेदवारी यादी जाहीर केली आहे. आता भाजपची यादी या आठवड्याअखेरीस येण्याची अपेक्षा आहे. मात्र आतापर्यंत प्रमुख दोन पक्षांची उमेदवारी यादी पाहता घराणेशाहीचे प्राबल्य कर्नाटकच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात दिसून येते.