नवी दिल्ली : मतदानामध्ये झालेल्या कथित महाघोटाळ्यासंदर्भात काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाद मागितली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रभारी रमेश चेन्नीथाला आणि महासचिव मुकुल वासनिक यांनी आयोगाकडे अधिकृत तक्रार केली असून याप्रकरणी सुनावणी घेण्याची मागणी केली आहे.
काँग्रेसच्या मुख्यालयात शुक्रवारी कार्यसमितीच्या बैठकीमध्येही महाराष्ट्रातील निवडणुकीतील कथित गैरप्रकाराबाबत चर्चा करण्यात आली. यासंदर्भात मांडलेल्या ठरावामध्ये राज्यामध्ये संपूर्ण निवडणूक प्रक्रियेतच गफलती झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. निवडणुकीत होणाऱ्या घोटाळ्याबाबत देशभर जनजागृती केली जाणार असून, त्यासाठी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रीय आंदोलन उभे केले जाईल, असे ठरावात नमूद करण्यात आले आहे.
महाराष्ट्रामध्ये अंतिम मतटक्क्यात ७.८३ टक्के वाढ शंकास्पद आहे. सायंकाळी पाचनंतर लांबलचक रांगा लागल्याचा दावा निवडणूक आयोगाने केला असून, त्यासंदर्भातील चित्रफितीसह पुरावे जाहीर करावेत. २० नोव्हेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजेपर्यंत ६५.२ टक्के मतदान झाले होते. २१ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत ही आकडेवारी ६६.०५ टक्के झाली. ही १.०३ टक्क्यांची तफावत कुठून आली? एकादिवसात ९ लाख ९९ हजार ३५९ मतांची वाढ कशी झाली, अशा अनेक शंका काँग्रेसने पत्राद्वारे उपस्थित केल्या आहेत.
मतदानयंत्रासंदर्भातील भूमिका संदिग्धच!
● काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर शंका घेतल्या असल्या तरी, शुक्रवारी झालेल्या कार्यसमितीच्या बैठकीमध्ये संमत झालेल्या ठरावात मतदानयंत्रांविरोधाचा उल्लेखही नाही.
● खरगेंनी मतदानयंत्रांमध्ये फेरफार झाल्याचा व ही प्रक्रिया सदोष असल्याचा उल्लेख भाषणामध्ये केल्याचे समजते. पण, मतदान यंत्राविरोधात काँग्रेसने अधिकृतपणे कोणतीही भूमिका घेतलेली नाही.
● तीन दिवसांपूर्वी तालकटोरा स्टेडियममध्ये झालेल्या संविधान बचाव कार्यक्रमात खरगेंनी मतदानयंत्राविरोधात भूमिका घेतली होती.