scorecardresearch

Premium

भारत जोडो यात्रेसाठी उत्तर महाराष्ट्रातूनही रसद, पण काँग्रेसला लाभ कितपत ?

काँग्रेसमध्ये चैतन्य आणण्यासाठी अशा एखाद्या यात्रेची गरज होतीच. अर्थात भारत जोडो यात्रा नाशिक जिल्ह्यातून जाणार नसली तरी या यात्रेच्या अनुषंगाने होणाऱ्या हालचालींमुळे स्थानिक पातळीवरील पदाधिकारी, नेत्यांमध्ये काही का असेना धावपळ होत आहे.

Congress from North Maharashtra going to join Bharat Jodo Yatra with full strength, but how much benefit to Congress?
भारत जोडो यात्रेसाठी उत्तर महाराष्ट्रातूनही रसद, पण काँग्रेसला लाभ कितपत ?

अविनाश पाटील

नाशिक : भारत जोडो यात्रेचा उद्देश राजकीय नसल्याचे कितीही सांगण्यात येत असले तरी काँग्रेसला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्याचा ही यात्रा म्हणजे एक प्रयत्न असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. पुढील आठवड्यात महाराष्ट्रात प्रवेश करणारी ही यात्रा राज्यातील इतर अनेक भागांप्रमाणेच उत्तर महाराष्ट्रासाठी लाभदायक ठरावी, यासाठी त्या त्या जिल्हा काँग्रेस समित्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अधिकाधिक काँग्रेसजनांसह इतरही समविचारी नागरिकांना या यात्रेत कसे सहभागी करून घेता येईल, यासाठी बैठकांचे सत्र सुरू आहे.

narendra modi Supriya sule
“सर्वात जास्त पैसेवाले लोकही या देशात ४० टक्के कर भरत नाहीत, मात्र…”, सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल
bjp jagar yatra
गोंदिया : भाजपच्या जागर यात्रेकडे ओबीसी बांधव, कार्यकर्त्यांची पाठ
flood in Nagpur city
पूर ओसरला, वेदना कायम! नागपुरातील सध्याची स्थिती काय? जाणून घ्या…
prakash-ambedkar
राज्यात मैत्री अन् अकोला जिल्ह्यात कुरघोडी, स्थानिक पातळीवर समन्वयाचा अभाव

हेही वाचा… सत्तेविना यश संपादन करण्याचे राष्ट्रवादीपुढे आव्हान

भारत जोडो यात्रेला उत्तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून अधिकाधिक रसद कशी पुरविण्यात येईल, यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत. नाशिक जिल्ह्यातून या यात्रेत जाणाऱ्यांचे नियोजन करण्याच्यादृष्टीने बैठका घेण्यात येत आहेत. जिल्ह्यात १५ पैकी एकाच विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडे एकच आमदार आहे. नाशिक महापालिकेतही काँग्रेस गलितगात्र स्थितीत आहे. विशेष म्हणजे या परिस्थितीत सुधारणा होण्याच्या दृष्टीने पुरेसे प्रयत्नही ना स्थानिक पातळीवर करण्यात येत आहेत, ना वरिष्ठ पातळीवरून. त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये चैतन्य आणण्यासाठी अशा एखाद्या यात्रेची गरज होतीच. अर्थात भारत जोडो यात्रा नाशिक जिल्ह्यातून जाणार नसली तरी या यात्रेच्या अनुषंगाने होणाऱ्या हालचालींमुळे स्थानिक पातळीवरील पदाधिकारी, नेत्यांमध्ये काही का असेना धावपळ होत आहे. जिल्हा मिळून दोन हजारांपेक्षा अधिक कार्यकर्ते या यात्रेत सहभागी होण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे उपाध्यक्ष तथा जिल्हा निरीक्षक प्रशांत पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. काँग्रेसजनांसह समाजवादी विचारसरणी असलेल्यांनाही यात्रेत सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती विभागाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे यांनी दिली.

हेही वाचा… देवानंद पवार : शेतकऱ्यांसाठी लढणारा नेता

जळगावात काँग्रेस पक्ष औषधापुरता उरला आहे. १५ पैकी केवळ एकाच मतदारसंघात त्यांचा आमदार आहे. जळगाव महापालिकेत तर त्यांची पाटी कोरी आहे. अशा स्थितीत भारत जोडो यात्रेसाठी रसद कशी पोहचवायची, हाच त्यांच्यापुढे प्रश्न आहे. धुळे जिल्ह्यातील पाचपैकी काँग्रेसचा केवळ एकच आमदार आहे. धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या उपस्थितीत यात्रेसंदर्भात बैठक झाली. विशेष म्हणजे या बैठकीस काँग्रेसजनांव्यतिरिक्त समविचारी पक्ष आणि विविध क्षेत्रातील संघटनांचे पदाधिकारीही उपस्थित होते. जिल्ह्यातून काँग्रेससह समविचारी पक्ष आणि इतर असे हजारो कार्यकर्ते सहभागी होतील, असा दावा करण्यात आला. भारत जोडो यात्रेचे जिल्हा समन्वयक आ. शिरीष चौधरी यांनी राहुल गांधीसोबत विचारांनी आणि कृतीनेही या लढ्यात सामील होण्याचे आवाहन केले. उत्तर महाराष्ट्रात पूर्वापार काँग्रेसला साथ करणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेस अजूनही बऱ्या स्थितीत आहे. चारपैकी दोन आमदार काँग्रेसचे आहेत. अर्थात भाजपच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी जिल्ह्यातील काँग्रेसलाही अशा यात्रेचा आधार हवाच आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Congress from north maharashtra going to join bharat jodo yatra with full strength but how much benefit to congress print politics news asj

First published on: 03-11-2022 at 12:06 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×