काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसचे वरिष्ठ नेते सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि अधीर रंजन चौधरी यांनी अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण नाकारले. याच निर्णयाचा परिणाम सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन तयार केलेल्या इंडिया आघाडीवर होताना दिसत आहे. राम विरोधी दिसू म्हणून काँग्रेसच्या नेत्यांनी पक्षीय निर्णयाच्या विरोधात जाऊन जे काँग्रेस नेते राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित होते, त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. परंतु, राम मंदिराचे निमंत्रण नाकारल्याने नाराज असल्याचे कारण देत अनेक नेते इंडिया आघाडीतून बाहेर पडले. रविवारी काँग्रेस आमदार आराधना मिश्रा आणि वीरेंद्र चौधरी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक यांच्यासह अयोध्येला भेट दिली. काँग्रेस आमदारांच्या या भेटीमुळे चर्चांना उधाण आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२२ जानेवारीला पार पडलेल्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाण्यास काँग्रेसने नकार दिला होता, तेव्हापासून भाजपाकडून काँग्रेस राम विरोधी असल्याचा आरोप केला जात आहे. याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसने राम सर्वांचा आहे, श्रद्धेसंदर्भात कोणतेही राजकारण करू नये, अशी भूमिका स्पष्ट केली आहे. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय म्हणाले की, पक्ष नेतृत्वाने या कार्यक्रमाला जाण्यास नकार दिला; कारण हा एका राजकीय पक्षाने आयोजित केलेला मेगा शो होता. याचा श्रद्धेशी काहीही संबंध नाही, आम्हा सर्वांची रामावर श्रद्धा आहे. राय यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले, प्रभू राम सर्वांचे आहेत. आमचीही त्यांच्यावर श्रद्धा आहे, या विषयावर कोणतेही राजकारण करू नये. तर दुसरीकडे रविवारचे निमंत्रण स्वीकारण्याचे कारण स्पष्ट करताना काँग्रेस आमदार आराधना मिश्रा म्हणाल्या की, हा राजकीय विषय नाही. “आम्ही निमंत्रण स्वीकारले आणि अनेक जण आपल्या कुटुंबासह आले. हा राजकारणाचा विषय नसून श्रद्धेचा विषय आहे, ” असे त्यांनी संगितले. पक्षांतर्गतच हे मतमतांतरं पाहायला मिळत आहे.

एका ज्येष्ठ काँग्रेस नेत्याने सांगितले की, “एकीकडे आपण अल्पसंख्याक समुदायाच्या हक्कांसाठी लढू, हे पटवून देण्यासाठी इम्रान मसूदसारख्या नेत्यांना आणतो; तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षाच्या जाळ्यात अडकत जातो. मंदिरांना भेटी देतो आणि याचा समतोल राखण्यासाठी निवडणुकीपूर्वी दर्ग्यात आणि मशिदींमध्ये जातो. आपल्याला आपल्या अजेंडाबद्दल अधिक स्पष्ट असणे आवश्यक आहे.”

काँग्रेस आमदारांची अयोध्येला भेट हा त्यांचा सर्वस्वी निर्णय

हेही वाचा : बिहारमध्ये रंगले सत्तानाट्य; बहुमत चाचणीवेळी राजदचे तीन आमदार बसले सत्ताधारी बाकावर, नक्की काय घडले?

दुसरीकडे सपा नेत्यांनीही राम मंदिर भेटीवर आपली प्रतिक्रिया दिली. काँग्रेस आमदारांची अयोध्येला भेट ही त्यांची निवड होती. याचा परिणाम आमच्यावर होणार नाही, असे सपा नेते राजेंद्र चौधरी म्हणाले. “आमचे पक्षप्रमुख (अखिलेश यादव) म्हणाले की, ते नंतर त्यांच्या कुटुंबासह अयोध्येला भेट देतील. पक्षाचे नेते पक्षप्रमुखांच्या निर्णयासोबत आहेत. काँग्रेसला काय करायचे आहे, हे त्यांच्यावर अवलंबून आहे. त्यांच्या भूमिकेचा आमच्यावर काहीही परिणाम होणार नाही,” असेही त्यांनी सांगितले. सूत्रांनी सांगितले की, काँग्रेस नेते राहुल गांधी त्यांच्या भारत न्याय जोडो यात्रेदरम्यान काशी विश्वनाथ मंदिर आणि प्राचीन काल भैरव मंदिराला भेट देण्याची शक्यता आहे. ही यात्रा १६ फेब्रुवारी रोजी चंदौली जिल्ह्यातून उत्तर प्रदेशमध्ये प्रवेश करेल आणि दुसऱ्या दिवशी वाराणसीला येथे पोहोचेल.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress in a divided house on mla make pilgrimage to ayodhya rac
First published on: 13-02-2024 at 18:36 IST