नागपूर : महाविकास आघाडीत नागपूर शहरातील दक्षिण नागपूरचा तिढा काही केल्या सुटत नसल्याने काँग्रेस आणि शिवसेनेच्या (ठाकरे) कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. काँग्रेस ही जागा सोडायला तयार नाही तर सेना आग्रह सोडायला तयार नाही. त्यामुळे आज काँग्रेसने तातडीची बैठक दुपारी बोलवली होती, पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना निरोपही देण्यात आले. पण अचानक बेठक रद्द झाली. त्यामुळे काय घडले याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
नागपूरमध्ये विधानसभेच्या एकूण सहा जागा असून आतापर्यंत या सर्व जागा काँग्रेसच लढवत आली आहे. महाविकास आघाडीतील दुसरा घटक पक्ष शिवसेना (ठाकरे) हा पक्ष लोकसभेनंतर प्रथमच विधानसभेत काँग्रेससोबत आहे. यापूर्वी शिवसेना या मतदारसंघात काँग्रेसच्या विरोधातच निवडणूक लढवत आली आहे. त्यामुळे राज्यपातळीवरील सेनेसोबतची युती स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी अद्याप मनाने स्वीकारली नाही. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ही जागा अत्यंत कमी मतांनी गमावली. त्यामुळे या जागेवर या पक्षाचा दावा कायम आहे. तर शिवसेनाही या मतदारसंघातून लढली म्हणून सेनाही आग्रही आहे. मतदारसंघात सध्या भाजपचा आमदार आहे, त्यांच्या विरोधात नाराजी आहे, पक्षातूनही त्यांना विरोध असल्याने काँग्रेससाठी ही संधी आहे.
हेही वाचा – पत्नीला ‘नको त्या’ अवस्थेत बघितले… अन् जे घडले ते धक्कादायक …
हेही वाचा – खंडणीसाठी मित्राने पातळी सोडली, झाले असे की …
२०१९ मध्ये पराभव झाल्यानंतरही या मतदारसंघात निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले व मागच्या निवडणुकीत अत्यंत कमी मताने पराभूत झालेले काँग्रेस नेते गिरीश पांडव मागील पाच वर्षापासून मतदारसंघात सक्रिय आहेत. ते उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार मानले जातात. मात्र शिवसेनेने दक्षिणवर दावा केल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ही जागा काँग्रेसनेच लढावी यासाठी कार्यकर्ते आग्रही आहे, तसे त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाही कळवले आहे. पण अद्याप निर्णय झाला नाही. शुक्रवारी जागा वाटपाच्या संदर्भात मुंबईत बैठक होणार होती. यात दक्षिणबाबत निर्णय होण्याची शक्यता होती. त्याच वेळी दक्षिण नागपूर मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्ते, शहर काँग्रेस, माजी नगरसेवक, ब्लॉक काँग्रेस समिती, महिला कॉंग्रेस, सेवादल आणि बुथ अध्यक्षांची तातडीची बैठक दुपारी चार वाजता बाकडे सभागृह मानेवाडा येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत या मतदारसंघातील कार्यकर्ते आणि नेते त्यांची भूमिका मांडणार होते. जागा शिवसेनेला सोडल्यास पुढे काय करायचे याबाबत निर्णय घेण्यात येणार होता. त्यामुळे बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मुंबईतील जागा वाटपाची बैठक रद्द झाल्याने नागपुरातील बैठकही तडकाफडकी रद्द करण्यात आली आहे. एकूणच काँग्रेस ही जागा लढण्याबाबत आक्रमक भूमिकेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.