मध्य प्रदेशमध्ये आगामी काही महिन्यांत विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. सध्या येथे भाजपाची सत्ता असून शिवराजसिंह चौहान हे मुख्यमंत्री आहेत. येथे काँग्रेस विरुद्ध भाजपा असा सामना होणार असून या निवडणुकीची तयारी दोन्ही पक्षांनी सुरू केली आहे. सध्या या दोन्ही पक्षांनी आपापल्या यात्रा काढल्या आहेत. या यात्रांच्या माध्यमातून दोन्ही पक्ष जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपाने आपल्या यात्रेला ‘जन आशीर्वाद यात्रा’ असे नाव दिले आहे, तर काँग्रेसच्या यात्रेचे नाव ‘जन आक्रोश यात्रा’ असे आहे. भाजपाची यात्रा सुरू झाली असून ती शेवटच्या टप्प्यात आहे. काँग्रेसची यात्रा अद्याप चालू आहे.

भाजपाची यात्रा १० हजार किमी अंतर पार करणार

काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांची सध्या यात्रा सुरू असली तरी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या दोन्ही पक्षांनी वेगवेगळी रणनीती आखली आहे. भाजपाने राज्याच्या नेतृत्त्वावर अवलंबून न राहता केंद्रातील नेत्यांना या यात्रेत सहभागी होण्याची विनंती केली आहे. या यात्रेच्या रणनीतीमागे केंद्रीय मंत्री तथा भाजपाचे नेते अमित शाह असल्याचे म्हटले जात आहे. त्यांनीच या यात्रेला २ सप्टेंबर रोजी हिरवा झेंडा दाखवला. ही यात्रा साधारण मध्य प्रदेशमधील २३० मतदारसंघांतून जाणार असून एकूण १० हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहे. येत्या २५ सप्टेंबर रोजी या यात्रेचा भोपाळमध्ये समारोप होणार आहे. यात्रेच्या समारोप कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

शिवराजसिंह प्रखर हिंदुत्त्ववादी नेता असल्याची प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न

काँग्रेसने आपल्या यात्रेची सुरुवात १८ सप्टेंबर रोजी सुरू केली आहे. काँग्रेसच्या जन आक्रोश यात्रेत मात्र केंद्रीय नेते दिसत नाहीयेत. स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीतच ही यात्रा पुढे जात आहे. काँग्रेसची ही यात्रा १५ दिवसांत एकूण ११ हजार ४०० किमी अंतर पार करणार आहे. भाजपा आपल्या यात्रेच्या माध्यमातून सध्या मध्य प्रदेशमध्ये असलेल्या सत्ताविरोधी भावनेला थोपवण्याचा प्रयत्न करत आहे. यात्रेदरम्यान शिवराजसिंह चौहान यांच्या ‘लाडली बहना’ योजनेबद्दल जनतेला सांगितले जात आहे. या योजनेअंतर्गत महिलांना १२५० रुपये प्रतिमहिना दिला जात आहे. या यात्रेच्या माध्यमातून चौहान प्रखर हिंदुत्त्ववादी नेता असल्याची प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांना मध्य प्रदेशमध्ये सध्या बुलडोझर मामा म्हटले जाते. या यात्रेदरम्यान शिवराजसिंह चौहान यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी बुलडोझरच्या कमानी उभारलेल्या पाहायला मिळत आहेत.

भाजपाच्या यात्रेत मोदीच केंद्रस्थानी

आतापर्यंत या यात्रेत एक कोटी लोकांनी सहभाग नोंदवल्याचा दावा भाजपाकडून केला जात आहे. या यात्रेच्या माध्यमातून भाजपा काँग्रेस आणि विरोधकांच्या इंडिया आघाडीवर टीका करत आहे. डीएमकेचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्मावर केलेल्या विधानाचा आधार घेत काँग्रेस आणि इंडिया आघाडी हिंदूविरोधी आहे, असा प्रचार भाजपाकडून केला जात आहे. भाजपाच्या अंतर्गत सूत्रांनुसार या यात्रेचे सारथ्य फक्त केंद्रातील नेत्यांनीच करावे, अशी योजना आखण्यात आली आहे. शिवराजसिंह चौहान हे पाचव्यांदा मुख्यमंत्री झालेले आहेत. त्यामुळे सत्ताविरोधी लाट निर्माण होऊन लोकांत भाजपाविरोधी मत तयार होऊ नये, यासाठी ही खबरदारी घेतली जात आहे. वेगवेगळे सर्वेक्षण करून सत्ताविरोधी लाट निर्माण होण्याची शक्यता लक्षात आल्याने या यात्रेसाठी अन्य राज्यांतील नेत्यांनादेखील बोलावले जात आहे. या यात्रेसाठी तयार करण्यात आलेले गाणे हे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच केंद्रस्थानी ठेवून रचण्यात आलेले आहे.

काँग्रेसच्या यात्रेत स्थानिक नेते, कर्नाटकप्रमाणे दिली जातायत आश्वासनं

दुसरीकडे काँग्रेस पक्षाच्या यात्रेत फक्त स्थानिक नेते दिसत आहेत. लोकांमध्ये शिवराजसिंह चौहान सरकारबद्दल असलेल्या असंतोषाचा फायदा घेण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षाकडून केला जात आहे. काँग्रेस पक्षाने कर्नाटक राज्यात जशी रणनीती आखली होती, अगदी तशीच रणनीती मध्य प्रदेशमध्येही आखण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जात आहे. कर्नाटकप्रमाणेच महिलांना प्रतिमहिना १५०० रुपये, मोफत गॅस सिलिंडर, १०० युनिटपर्यंत मोफत वीज अशी आश्वासने काँग्रेसकडून दिली जात आहेत. मध्य प्रदेशमध्ये दलित, आदिवासी समाजावर झालेला कथित अत्याचार, शेतकऱ्यांचे हाल, बेरोजगारी यांचाही उल्लेख काँग्रेसकडून यात्रेदरम्यान केला जात आहे.

Story img Loader