scorecardresearch

Video: “माझ्या भाषणातले शब्द का काढले गेले?” राहुल गांधी संतापून माध्यमांना म्हणाले, “पंतप्रधान मोदी अदाणीला…”

राहुल गांधी यांनी मंगळवारी केलेल्या भाषणातील काही भाग लोकसभा अध्यक्षांनी वगळला. त्यानंतर खवळलेल्या राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.

Rahul Gandhi on Gautam Adani
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी हा फोटो ट्विट करत पंतप्रधान मोदींवर टीका केली होती.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी लोकसभेत बोलत असताना आपल्या भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योजक गौतम अदाणी यांच्या संबंधावरुन हल्लाबोल केला होता. त्यानंतर आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधी यांच्या भाषणातला काही भाग वगळण्यात आल्याचे सांगितले. भाषण रेकॉर्डवरुन हटविल्यानंतर राहुल गांधी चांगलेच संतापले. आज ते संसदेत आले असताना माध्यमांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी माध्यमांना संतापून विचारले की, माझ्या भाषणातले मुद्दे का काढण्यात आले? पत्रकारांनी पुन्हा एकदा त्यांना प्रश्न विचारला. तेव्हा राहुल गांधी म्हणाले, “मी विचारतोय की, माझ्या भाषणाचे शब्द का काढले? तसेच माझ्या प्रश्नावर पंतप्रधान उत्तर का देत नाहीत? ते अदाणीला का वाचवू पाहत आहेत?”

हे वाचा >> “वो अब चल चुके है, वो अब आ रहे है”, पंतप्रधान नरेंद्र मोदींची राहुल गांधींवर टीका; म्हणाले, “काल रात्री…”

पंतप्रधान मोदी अदाणीला वाचवू पाहत आहेत

लोकसभेत दि. ७ फेब्रुवारी रोजी केलेल्या भाषणात राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चांगलाच हल्ला चढविला होता. राहुल गांधी आज पुन्हा म्हणाले, “माझ्या प्रश्नांची उत्तरे मोदींनी दिलेली नाहीत. जर अदाणी त्यांचे मित्र नाहीत, तर त्यांनी खुशाल सांगायला हवे होते की त्या चौकशी करण्यासाठी तयार आहेत. बोगस शेल कंपन्या बनविल्या गेल्या. बेनामी पैसा फिरवला गेला, या विषयांवर पंतप्रधान काहीच बोलले नाहीत. म्हणजे यातून हेच दिसते की, पंतप्रधान मोदी अदाणीला वाचवू पाहत आहेत.”

हे वाचा >> “२००४ ते २०१४ हे देशाच्या इतिहासातलं सर्वात वाईट दशक, कारण…” काँग्रेसचा मोदींकडून समाचार

तर काँग्रेसचे नेते आणि खासदार केसी वेणूगोपाळ म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर दिलेले नाही. ते इकडचे-तिकडचे बोलत राहिले. देशातील जनतेला आज पंतप्रधानांकडून उत्तराची अपेक्षा होती. ते अदाणींच्या व्यवहाराची चौकशी करतील का? मात्र त्यांनी याकडे सपशेल दुर्लक्ष केले. हे दुर्दैवी आहे. ते अदाणी समूहाच्या गैरव्यवहारावर उत्तर का देत नाहीत?

कालच्या भाषणानंतर आज ते झोपेतून उठले नसतील

दुसरीकडे आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर अभिनंदन प्रस्तावर सत्ताधारी-विरोधकांची चर्चा झाल्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चर्चेला उत्तर दिले. “अनेक लोकांनी भाषण करत असताना आपापले आकडे दिले. काहींनी स्वतःचा तर्क मांडला. या भाषणांवरुन कुणाची किती क्षमता आहे, कुणाची किती योग्यता आणि समज आहे, हे लक्षात येते. काल काही लोकांच्या भाषणानंतर पूर्ण इकोसिस्टिम, समर्थक उड्या मारत होते. अनेकजण भाषणाचे कौतुक करत होते. कदाचित त्यांना काल रात्री चांगली झोप लागली असेल. आज कदाचित ते उठले देखील नसतील. अशा लोकांसाठी बोलले जाते, ‘ये केह केहकर हम, दिल को बेहला रहे है, वो अब चल चुके है, वो अब आ रहे है”, अशा शब्दात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर नाव न घेता त्यांनी टीका केली.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-02-2023 at 20:45 IST