Hirabhai Jotva in mgnrega scam : गुजरातमधील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) करण्यात आलेल्या कामात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचं काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून, भाजपाचे मंत्री बच्चुभाई खाबड यांच्या दोन्ही मुलांना अटक केली होती. आता या घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी काँग्रेसमधील पिता-पुत्रांना शुक्रवारी (२७ जून) अटक केली. हिराभाई जोतवा व दिग्विजय, अशी अटक करण्यात आलेल्या या काँग्रेसच्या नेत्यांची नावं आहेत. या कामात एकूण सात कोटी ३० लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. गुजरातमधील गीर सोमनाथ जिल्ह्यातील सुपासी गावचे रहिवासी असलेले ५८ वर्षीय हिराभाई जोतवा हे सौराष्ट्रातील काँग्रेसचे एक लोकप्रिय नेते मानले जातात. शेती व्यवसायासोबतच त्यांनी सौराष्ट्र विद्यापीठातून कला शाखेत पदवी घेतली आहे. वाहतूक, पशुपालन, पेट्रोल पंप, तसेच बांधकाम व्यवसायातही हिराभाई यांनी गुंतवणूक केली आहे.
हिराभाईंच्या निकटवर्तीयांनी काय सांगितलं?
जुनागढ जिल्हा काँग्रेस अध्यक्ष व हिराभाई यांचे निकटवर्तीय भरतभाई हिरपरा यांनी सांगितले, “मी आणि हिराभाई बालपणापासूनचे मित्र आहोत. त्यांचे वडिलही काँग्रेस कार्यकर्ते होते. हिराभाई यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात सरपंच म्हणून केली आणि नंतर त्यांनी तालुका पंचायत व जिल्हा पंचायत स्तरावरील निवडणुका जिंकल्या. त्यांनी जुनागढ जिल्हा पंचायतीमध्ये विरोधी पक्षनेते म्हणूनही काम पाहिले.” पुढे बोलताना हिरपरा म्हणाले, “पक्षाच्या राज्य आणि केंद्रीय नेतृत्वाकडून उमेदवार निवडीसाठी हिराभाईंचे मत कायम विचारात घेतले जात असे.”
आणखी वाचा : हिंदीसक्ती ते मराठी शक्ती- काय घडलं नेमकं आणि कसा झाला निर्णय?
दरम्यान, रोजगार हमी योजनेच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराप्रकरणी पोलिसांनी हिराभाई जोतवा यांना अटक केल्यामुळे काँग्रेससाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. कारण- या घोटाळ्यानं आधीच संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिली असून, अनेकांचं लक्ष वेधून घेतलंय. या घोटाळ्यातील आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करून त्यांना तुरुंगात टाकावं, अशी मागणी ग्रामीण स्तरातून केली जात आहे.
हिराभाई जोतवा यांची राजकीय कारकीर्द
- गुजरातमधील २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत हिराभाई यांनी केशोद मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला होता.
- गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी जुनागढ मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.
- लोकसभा व विधानसभा निवडणूक लढवूनही हिराभाई जोतवा यांना विजय मिळवता आला नाही, ते दोन्ही निवडणुकांत पराभूत झाले.
- दुसरीकडे त्यांचे पुत्र दिग्विजय यांनी नुकत्याच झालेल्या सरपंच निवडणुकीत सुपासी गावातून विजय मिळवला.
- विशेष बाब म्हणजे यापूर्वी सुपासी गावच्या सरपंचपदाची सूत्रे ही हिराभाई जोतवा यांच्याकडेच होती.
- हिराभाई जोत्वा यांचे दोन्ही पुत्र दिग्विजय आणि त्याचे मोठे बंधू अभय यांनी लंडनमधून शिक्षण घेतलं आहे.
- दिग्विजय हे दोन वर्षांपूर्वीच भारतात परतले आणि त्यांनी कुटुंबीयांच्या पारंपरिक बांधकाम व्यवसायात काम सुरू केले.
हिराभाईंचे दोन्ही पुत्र राजकारणात
हिराभाई यांचे धाकटे पुत्र अभय जोतवा हेदेखील काँग्रेसचे नेते असून, सध्या ते गीर सोमनाथ जिल्हा पंचायतीमध्ये विरोधी पक्षनेते म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या वडील आणि भावाला अटक झाल्यानंतर अभय म्हणाले, “माझं शिक्षण पूर्ण केल्यावर मी वडिलांना म्हणालो की, मला राजकारणात येऊन जनसेवा करायची आहे. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की, हे फारच कठीण आहे. जनसेवा करताना कायदेशीर अडचणी येऊ शकतात. तुला जर खरंच राजकीय क्षेत्रात यायचं असेल, तर तुरुंगातही जायचीही तयारी ठेवावी लागले. त्यावेळी मी त्यांना सांगितलं की, मी सर्व गोष्टींसाठी तयार आहे… मला खात्री आहे की, माझे वडील आणि भाऊ निर्दोष सिद्ध होतील.” अभय यांनी असंही सांगितलं की, काँग्रेसमधील नेते व पक्षाचे कार्यकर्ते त्यांना सर्वतोपरी मदत करीत आहेत.

हिराभाई व त्यांच्या पुत्रावर आरोप काय?
मनरेगा (MGNREGA) योजनेंतर्गत कामे मिळवणाऱ्या ‘जलाराम एंटरप्राइझ’ आणि ‘मुरलीधर एंटरप्राइझ’ या दोन कंपन्यांमध्ये ‘स्लीपिंग पार्टनर्स’ असल्याचा हिराभाई आणि त्यांच्या मुलावर आरोप आहे. ही सर्व कामं भरुच जिल्ह्यात करण्यात आली होती आणि त्यामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी गुजरातचे मंत्री बच्चुभाई खाबड यांच्या दोन्ही मुलांना अटक केली. त्यानंतर शुक्रवारी हिराभाई आणि त्यांच्या मुलाला ताब्यात घेण्यात आले.
हेही वाचा : सिंधुदुर्गात शिवसेना शिंदे गटाकडून भाजपवर दबाव टाकण्याचे प्रयत्न सुरू
पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार, २०२१ ते २०२५ दरम्यान या दोन्ही कंपन्यांना जंबुसर, आमोद व हंसोत या तीन तालुक्यांतील ५६ गावांमध्ये रस्तेबांधणी आणि इतर कामांसाठी कंत्राटे मिळाली होती; पण यातील बहुतांश कामं प्रत्यक्षात पूर्ण न करता, त्याची बिलं काढण्यात आली. तसेच ज्या ठिकाणी कामं झाली आहेत, तिथे निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरण्यात आलं, असा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सुमारे २५० लोकांची चौकशी केली आणि ५०० बँक खात्यांची तपासणी केल्यानंतर जोत्वा पिता-पुत्रांना अटक केली आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते म्हणतात- या घोटाळ्याचे सूत्रधार भाजपामध्येच
गुजरातचे काँग्रेसचे प्रवक्ते मनीष दोशी म्हणाले, “हिराभाई जोतवा हे त्यांच्या भागातील लोकप्रिय नेते आहेत. अलीकडील विसावदर पोटनिवडणुकीदरम्यान त्यांच्यावर आम आदमी पक्ष (आप) आणि भाजपकडून मोठा दबाव होता. भाजपाचे खासदार मनसुख वसावा यांनी या घोटाळ्यात सरकारी अधिकारी आणि राजकीय नेत्यांचा सहभाग असल्याचा आरोप केला आहे. भरुचमधील भाजपाचे वरिष्ठ नेतेच या घोटाळ्यात सामील आहेत. खाबड यांच्या मुलांच्या अटकेनंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलत, काँग्रेस नेत्यांना लक्ष्य केलं आहे. जर या प्रकरणात स्वतंत्र आणि पारदर्शकपणे चौकशी झाली, तरच या घोटाळ्याचं खरं स्वरूप समोर येईल. या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी आम्ही सरकारकडे विशेष तपास पथकाची (SIT) नेमणूक करावी, अशी मागणी केली आहे.”