छत्रपती संभाजीनगर : लोकसभेत मराठवाड्यात यश मिळाल्यानंतर मराठवाड्याच्या काँग्रेसचे नेतृत्व अमित देशमुख यांनीच करावे, असा आग्रह केला जात आहे. नांदेड, लातूर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या आढावा बैठकीत सतेज पाटील यांनी ही मांडणी केली. त्याला काँग्रेसच्या इतर नेत्यांनीही साथ दिली. मराठवाड्यातील निवडणुकीमध्ये आता त्यांनीच जातीने लक्ष घालावे असे सांगण्यात आले. बैठकांमधून नेतृत्व धुरा सांभाळा असे सांगितले जात असल्याने अमित देशमुख यांनीही अशोक चव्हाण यांचे नाव न घेता त्यांच्या भाजपमध्ये जाण्याचा निर्णय लोकांना कसा आवडला नाही, हे सांगायला सुरूवात केली. तसेच विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांची नावेही त्यांनी भाषणातून पेरायला सुरुवात केली.

काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथल्ला यांच्या उपस्थितीमध्ये मराठवाड्यात काँग्रेस नेत्यांच्या बैठका व मेळावे सुरू आहेत. नांदेड व लातूर येथील मेळाव्यात अमित देशमुख यांनी आता मराठवाड्याचे नेतृत्व करावे अशा अशायाची भाषणे करण्यात आली. सतेज पाटील यांनी मराठवाड्यातील निवडणुकांमध्ये अमित देशमुख यांनी जातीने लक्ष घालावे अशी विनंती केली. अमित देशमुख यांनीही मराठवाड्यातून कोण कोठून इच्छूक आहे याची माहिती आपल्याकडे असल्याचे आवर्जून दाखवून दिले. जालन्यामधून राजाभाऊ देशमुख, सुरेश जेथलिया यांची नावे त्यांनी घेतलीच शिवाय छत्रपती संभाजीनगरमधून शक्तीप्रदर्शन करणाऱ्या नामदेवराव पवार, जितेंद्र देहाडे यांचीही नावे भाषणात घेतली. मराठवाड्यात ४६ जागा आहेत. त्यापैकी १८, २० किंवा २५ जागांपैकी काँग्रेसच्या वाट्याला किती जागा येतील ते नक्की झाल्यावर या सर्व जागा निवडून आणण्याचे काम करायचे आहे, असेही ते आपल्या भाषणात म्हणाले. मराठवाड्यातील सामाजिक व राजकीय विषयात अमित देशमुख यांनी लक्ष घालण्याची विनंती जाहीर भाषणातून होत असतानाच छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांच्या समर्थकांनी त्यांचे शहरभर फलकही लावले.

हेही वाचा : भाजपा-संघामध्ये तब्बल पाच तासांची बैठक; नव्या अध्यक्षाच्या निवडीबरोबरच ‘या’ विषयावर झाली खलबतं

जालन्याचे खासदार कल्याण काळे हे विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काम करत. त्यांनी लोकसभा निवडणूक जिंकावी हे विलासराव देशमुख यांचे स्वप्न हाेते. ते पूर्ण झाले आहे, असे ते म्हणाले. मेळाव्यातील भाषणांमध्ये त्यांनी अशोक चव्हाण यांचे नाव न घेता टीका केली. ते म्हणाले, काही जणांनी पक्ष सोडला. मलिकार्जून खरगे, सोनिया गांधी यांची साथ सोडली. पण सर्वसामांन्यांना ते मान्य झाले नाही. जातनिहाय जनगणनाच हा आरक्षण प्रश्नावरचा तोडगा असल्याची काँग्रेसची भूमिका असल्याचे मतही त्यांनी आवर्जून मांडले. निवडून येणाऱ्या मुस्लिम समुदायातील व्यक्तीलाही उमेदवारी दिली जाईल असेही त्यांनी आवर्जून सांगितले. विभागीय बैठकीमध्ये अमित देशमुख यांचे नेतृत्व पुढे आणावे असा प्रयत्न असल्याचे काँग्रेसच्या बैठकीतून दर्शविण्यात आले. अमित देशमुख यांनीही त्यास आपण सकारात्मक असल्याचे संकेत दिले.