मुंबई : भिवंडी आणि चंद्रपूरमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही पक्षांतर्गत वाद आणि राजकीय परिस्थिती हाताळण्यात नेतृत्वाला आलेले अपयश यातून काँग्रेस पक्ष सत्तेपासून दूर राहिला आहे. काँग्रेसच्या प्रदेश नेतृत्वाचे हे मोठे अपयश मानावे लागेल. राज्यातील महानरपालिका निवडणुकांमध्ये अमित देशमुख यांच्या प्रयत्नांमुळे काँग्रेसला बहुमत मिळाले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूरमध्ये माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या विरोधात केलेले वक्तव्य भाजपच्या चांगलेच अंगलट आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलगिरी व्यक्त करूनही भाजपचे नुकसान झालेच. भिवंडी – निजामपूर आणि चंद्रपूरमध्ये काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. दोन्ही ठिकाणी योग्य नियोजन केले असते तर महापौरपद मिळणे शक्य होते.

भिवंडी-निजामपूरमध्ये काँग्रेसचे सर्वाधिक ३० तर शरद पवार गटाचे १२ असे एकूण संख्याबळ ४२ होते. सहा नगरसेवकांची आवश्यकता असताना भाजपमधून फुटून बाहेर पडलेल्या नारायण चौधरी यांना महापौरपदाच्या निवडणुकीत पाठिंबा देण्याची नामुष्की काँग्रेसवर ओढवली. वास्तविक, काँग्रेसने प्रयत्न केले असते तर महापौर निवडून आला असता. पण काँग्रेसच्या प्रदेश तसेच स्थानिक पातळीवरील नेत्यांनी भाजपच्या बंडखोराल महापौरपदी निवडून आणण्यासाठी साथ दिली.

भिवंडीत काँग्रेसचे सर्वाधिक मुस्लीम नगरसेवक निवडून आले आहेत. काँग्रेसने भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्या उमेदवाराला महापौरपदासाठी पाठिंबा दिल्याने मुस्लीम समाजात चुकीचा संदेश गेला आहे. काही नगरसेवकांनी ही बाब प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या कानावर घातली होती. भिवंडी विकास आघाडी तसेच अपक्षांना बरोबर घेऊन महापौरपद मिळविता आले असते. पण काँग्रेसच्या नेत्यांनी अक्षरश: माघार घेतली. महापौरपदी निवडून आलेले चौधरी हे अधिकृतपणे भाजपचे नगरसेवक आहेत. भाजपने अद्याप त्यांच्या विरोधात काहीही कारवाई केलेली नाही. भिवंडीतील जनतेने लागोपाठ दोनदा काँग्रेसवर विश्वास व्यक्त केला होता. पण दोन्ही वेळा आपापसातील वादातून काँग्रेसला महापौरपदावर पाणी सोडावे लागले. काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे उद्या न्यायालयात तारखेला उपस्थित राहण्यासाठी भिवंडीत येत आहेत. त्यांची भेट मिळाल्यास त्यांच्या कानावर साऱ्या बाबी घालण्याचा स्थानिक पदाधिकाऱ्यांचा प्रयत्न आहे.

चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार आणि प्रतीभा धानोरकर यांच्या वादात आधी पक्षाचे नुकसान झाले. नेतेमंडळी आपापसात वाद घालत राहिले. दोन्ही गटांनी विभागीय आयुक्तांकडे स्वतंत्र गटाची नोंदणी करण्यापर्यंत मजल गेली होती. या गोंधळात शिवसेना ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्यांना भाजपने गळाला लावले. ठाकरे गटाच्या पाठिंब्यावर भाजपचा महापौर चंद्रपूरमध्ये निवडून आला. चंद्रपूर व भिवंडीमध्ये दोन्ही ठिकाणी सत्तेसाठी सहा मते कमी पडत होती.

जनतेचा काँग्रेसला पाठिंबा असला तरी त्याचा लाभ उठविण्यात पक्षाच्या नेतृत्वाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. भिवंडीमध्ये अल्पसंख्याक समाजाची मोठ्या प्रमाणावर मते काँग्रेसला मिळाली होती. पण तेथे भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्याला काँग्रेसने पाठिंबा दिला. या अशा राजकीय खेळीतून भविष्यात भिवंडीत अल्पसंख्याकांची मते काँग्रेसला मिळतीलच याची काही खात्री देता येत नाही.

अंबरनाथमध्येही काँग्रेसच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांनी परिस्थिती योग्यपणे हाताळली नसल्याने १२ नगरसेवक निवडून येऊनही पक्षाची पाटी आता कोरी झाली. कारण सर्व नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

भिवंजीत समाजवादी पार्टीने पाठिंबा दिला असता तर काहीच प्रश्न निर्माण झाला नसता. पण त्यांनी वेगळी भूमिका घेतल्याने आमच्यापुढे प्रश्व होता. भाजपमध्ये बंड करून बाहेर पडलेल्या गटाला आम्ही पाठिंबा दिला. काँग्रेसने भाजपच्या उमेदवाराला महापौरपदी निवडून आणलेला नाही. महापौरपदी निवडून आलेल्या चौधरी यांनी धर्मनिरपेक्ष गटात प्रवेश केला आहे. चंद्रपूरमध्ये ठाकरे गटाच्या नरेसवकांनी वेगळी भूमिका घेतल्याने महापौरपद पक्षाला मिळाले नाही. चंद्रपूरमध्ये काही झाले तरी आम्ही परभणीत आघाडीचा धर्म पाळला. – हर्षवर्धन सपकाळ,. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष