scorecardresearch

काँग्रेसनिष्ठा खुंटीला टांगून धर्मण्णा सादूल भारत राष्ट्र समितीत

धर्मण्णा सादूल यांना त्यांच्या पाच दशकांच्या राजकीय आयुष्यात काँग्रेस पक्षाने भरभरून दिले होते. दोनवेळा नगरसेवकपदासह महापौरपद आणि दोनवेळा खासदारपद दिले होते.

Solapur, Congress, former MP, Dharmanna Sadul, Bharat Rashtra Samithi
काँग्रेसनिष्ठा खुंटीला टांगून धर्मण्णा सादूल भारत राष्ट्र समितीत

एजाज हुसेन मुजावर

सोलापूर : सोलापुरात अनेक वर्षे प्राबल्य राहिलेल्या तेलुगु भाषक विणकर समाजाचे प्रतिनिधित्व करणारे आणि संपूर्ण हयात काँग्रेस पक्षात घालविलेले ८० वर्षांचे वयोवृध्द नेते, माजी खासदार धर्मण्णा सादूल यांनी ‘ नाही नाही ‘ म्हणत अखेर तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीचा झेंडा हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. वृध्दापकाळ, आजारपण, मर्यादित आर्थिक स्थिती आणि तुटलेला लोकसंपर्क पाहता सादूल यांनी आयुष्याच्या संध्याकाळी काँग्रेस सोडणे आणि भारत राष्ट्र समितीमध्ये जाणे हे त्यांच्या स्वतःसाठी आणि एकूणच स्थानिक तेलुगु समाज आणि सोलापूरच्या विकासासाठी कितपत फलदायी ठरेल, हे नजीकच्या काळात दिसून येईल.

सादूल यांना त्यांच्या पाच दशकांच्या राजकीय आयुष्यात काँग्रेस पक्षाने भरभरून दिले होते. दोनवेळा नगरसेवकपदासह महापौरपद आणि दोनवेळा खासदारपद दिले होते. काँग्रेसनेच उभारलेल्या सहकार चळवळीतून साकार झालेल्या बँकांसह सूतगिरण्या आदी संस्थांमध्ये नेतृत्व करण्याची संधीही सादूल यांना दिली. त्याबद्दल काँग्रेस पक्षाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारे हेच सादूल वयाच्या ऐंशीव्या वर्षी एका झटक्यात पक्षनिष्ठा खुंटीला टांगून बीआरएस पक्षात जाण्याचा निर्णय कसा घेतात, याबद्दल सोलापूरच्या राजकीय व सामाजिक वर्तुळात प्रश्नार्थक चर्चा ऐकायला मिळते.

हेही वाचा… मालेगावात मुस्लीम समुदायाबरोबर जोडण्याचा उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाचा विस्तार करण्यासाठी महाराष्ट्रात पाय रोवण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्याची सुरूवात नांदेडपासून झाली आहे. पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोलीतही त्यांचे पाऊल पडत आहे. तेलुगुभाषकांच्या सोलापूरकडे त्यांचे लक्ष जाणे साहजिक होते. त्यादृष्टीने त्यांनी माजी खासदार धर्मण्णा सादूल यांच्याशी गेल्या जानेवारीपासून संपर्क ठेवला होता. परंतु सादूल यांनी आपली काँग्रेसवर अखंड निष्ठा असल्याचे स्पष्ट करीत बीआरएसमध्ये प्रवेश करण्याचा चंद्रशेखर राव यांचा प्रस्ताव नम्रपणे नाकाराला होता. तरीही चंद्रशेखर राव यांनी सादूल यांचा पिछा सोडला नव्हता. त्यांना भेटीसाठी राव यांनी हैदराबादला बोलावले होते. त्यानंतर सादूल यांची भूमिका बदलल्याचे दिसून येते.

हेही वाचा… संभाजीनगर की औरंगाबाद ? महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्येच मतभिन्नता

सोलापुरात ५० वर्षांपूर्वी लिंगायत समाजाचे वर्चस्व कमी झाल्यानंतर विणकर पद्मशाली समाजाचा राजकीय, सहकार, उद्योग आदी क्षेत्रात प्रभाव वाढला होता. यशवंतराव चव्हाण यांच्या कृपेने याच विणकर पद्मशाली समाजाच्या विकासासाठी देशातील एकमेव जिल्हा उद्योग सहकारी बँक उभारली गेली. जिल्हा नागरी औद्योगिक बँक, सहकारी रूग्णालय, सोलापूर, यशवंत आणि शारदा या तीन सहकारी सूतगिरण्या, विव्हको प्रोसेस अशा एक ना अनेक संस्थांच्या बळावर पद्मशाली समाजातून राजकीय नेतृत्व निर्माण झाले. माजी खासदार गंगाधर कुचन, धर्मण्णा सादूल, ईरय्या बोल्ली, सत्यनारायण बोल्ली हे त्यापैकीच. गंगाधर कुचन हे १९८० वा १९८४साली सलग दोनवेळा खासदार होते. कुचन यांनीही काँग्रेसशी फारकत घेऊन थेट भाजपमध्ये प्रवेश केला. ते सध्या राजकारणात सक्रिय नाहीत.

हेही वाचा… सूरजागडविषयी काँग्रेसच्या भूमिकेने संभ्रम

धर्मण्णा सादूल हे खासदार असताना तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदाची संधी चालून आली होती. परंतु काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष सुशीलकुमार शिंदे यांची खप्पामर्जी नको म्हणून त्यांनी मंत्रिपद नाकारले. नंतरच्या १९९६ सालच्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा दारूण पराभव झाला. पुढे सुशीलकुमार शिंदे यांच्याविषयीच्या नाराजीतून त्यांनी १९९९ साली राष्ट्रवादीची स्थापना होताच, त्या पक्षात उडी मारली खरी; परंतु पुढे पुन्हा काँग्रेसमध्ये परतणे त्यांना भाग पडले. तरीही त्यांचा राजकीय प्रभाव घटतचा गेला. अलीकडे वाढत्या वयाबरोबर आजारपण, आर्थिक परिस्थिती आणि घटलेला लोकसंपर्क यामुळे सादूल यांची राजकीय सद्दी संपल्यातच जमा असल्याचे मानले जात असताना अखेर आयुष्याच्या सायंकाळी त्यांनी बीआरएसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय आपण जड अंतःकरणाने घेतल्याचे सांगताना सुशीलकुमार शिंदे यांच्याविषयी सादूल हे कृतज्ञताही व्यक्त करतात. त्याचवेळी काँग्रेसमध्ये आपणांस कोणी विचारत नसल्याची खंत बोलून दाखवितानाच बीआरएसच्या माध्यमातून सोलापूर महापालिका निवडणुकीत किमान दहा नगरसेवक निवडून आणण्याचा संकल्पही सोडला. सादूल यांचा बीआरएसला कितपत लाभ होईल आणि सादूल यांचेही नेतृत्व वयाच्या ऐंशीव्या वर्षात किती फलदायी ठरेल, याचे उत्तर काही दिवसांत मिळणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-03-2023 at 11:05 IST

संबंधित बातम्या