Congress MLA swims across creek for demand of bridge in gujarat spb 94 | Loksatta

Gujarat Election 2022 : एकीकडे निवडणुकीचा प्रचार शिगेला, दुसरीकडे काँग्रेसच्या आमदाराची चर्चा, पुलाच्या मागणीसाठी केलं खास आंदोलन

काँग्रेस नेते आणि अमरेलीचे आमदार अंबरीश डेर यांनी गेल्या काही वर्षांपूर्वी त्यांच्या मतदारसंघातील वेक्टर पोर्ट ते चंच बंदर या खाडीदरम्यान पूल बांधण्याची मागणी केली होती.

Gujarat Election 2022 : एकीकडे निवडणुकीचा प्रचार शिगेला, दुसरीकडे काँग्रेसच्या आमदाराची चर्चा, पुलाच्या मागणीसाठी केलं खास आंदोलन
फोटो सौजन्य – द इंडियन एक्सप्रेस

काँग्रेस नेते आणि अमरेलीचे आमदार अंबरीश डेर यांनी गेल्या काही वर्षांपूर्वी त्यांच्या मतदारसंघातील वेक्टर पोर्ट ते चंच बंदर या खाडीदरम्यान पूल बांधण्याची मागणी केली होती. मात्र, गुजरात सरकारने ही मागणी पूर्ण न केल्याने त्यांनी थेट वेक्टर पोर्ट ते चंच बंदर पोहत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.

हेही वाचा – गुजरातमधील मराठी बहुल मतदारसंघांमध्ये अशोक चव्हाण यांच्या प्रचारसभा

अंबरीश डेर यांनी रविवारी राजौला किनारपट्टीवर असलेल्या वेक्टर पोर्ट ते चंच बंदर या खाडीदरम्यान पोहत प्रवास केला आहे. गुजरात सरकार कशा प्रकारे आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करते आहे, हे दाखवून देण्यासाठी मी या खाडीतून प्रवास केल्याचे डेर यांनी म्हटलं आहे. ”मी गेल्या १५ वर्षांपासून वेक्टर पोर्ट ते चंच बंदर दरम्यान पूल बांधावा, अशी मागणी करतो आहे. मात्र, गुजरात सरकार आमच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष करते आहेत. येथील नागरिकांना पुलाची आवश्यकता आहे, हे मी वारंवार राज्य सरकारच्या लक्षात आणून दिले आहे आहे. हा ३५० मीटर पुलाचा खर्च केवळ ५० कोटी असून हा पूल बांधला, तर वेक्टर पोर्ट ते चंच गावातील अंतर २५ किलोमीटरने कमी होईल”, अशी प्रतिक्रिया अंबरीश डेर यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी १५ वर्षांपासून करत असलेली मागणी गुजरात सरकारने अद्याप का पूर्ण केली नाही? असा जाबही विचारला आहे.

हेही वाचा – ‘काँग्रेसच्या ‘फोडा आणि राज्य करा’ नीतीचा गुजरातला फटका,’ नरेंद्र मोदींचे टीकास्र

अमरेली मतदारसंघातून २०१७ मध्ये अंबरीश डेर यांनी भाजपाच्या हिरा सोलंकी यांचा पराभव करत विजय मिळवला होता. दरम्यान, यंदा पुन्हा सोलंकी हे डेर यांच्या विरोधात भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. तसेच आम आदमी पक्षाचे भारत भालदांडियादेखील यावेळी निवडणुकीच्या रिंगणात असतील.

हेही वाचा – काँग्रेस अध्यक्षांच्या विधानानंतर भाजपा आक्रमक, नरेंद्र मोदींची रावणाशी केली तुलना!

अंबरीश डेर यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरूवात नगरसेवक म्हणून केली होती. २००० साली पहिल्यांदा ते समाजवादी पक्षाच्या तिकीटावर नगरसेवक म्हणून निवडून आले होते. २००३ आणि २००७ मध्ये ते राजौला नगरपालिकेचे अध्यक्षही राहिले. दरम्यानच्या काळात ते भाजपामध्येही होते. त्यांनी २००७ मध्ये कांग्रेसमध्ये प्रवेश केला. डेर हे अहीर समाजाचे आहेत. अमरेली मतदार संघात अहीर मतदारांची संख्या कमी असली, तरी त्यांना ओबीसीतील इतर समाजाचा पाठिंबा असल्याचे बोललं जाते आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 21:08 IST
Next Story
“अशोक गेहलोत आणि सचिन पायलट हे काँग्रेसची…”, ‘गद्दार’ प्रकरणावर राहुल गांधींची प्रतिक्रिया