Parliament dog controversy दिल्लीच्या राजकारणात पुन्हा एकदा कुत्र्यांचा विषय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. सोमवारी (१ डिसेंबर) संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेस खासदार रेणुका चौधरी यांनी संसदेच्या आवारात कुत्रा आणल्याने वाद निर्माण झाला. सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने (भाजपा) राज्यसभा खासदाराच्या या कृतीबद्दल त्यांना फटकारले. मात्र, चौधरी यांनी सुरक्षा किंवा शिष्टाचाराचा भंग झाल्याचा दावा फेटाळून लावत आपल्या कृतीचा बचाव केला. नक्की काय घडलं? प्राणी संसदेत आणण्याविषयी नियम काय सांगतात?

नेमकं काय घडलं?

तेलंगणामधील राज्यसभा खासदार रेणुका चौधरी यांनी सोमवारी संसदेत त्यांच्याबरोबर कुत्रा आणला होता. या कुत्र्याला रस्त्यावरून वाचवण्यात आल्याचे त्यांनी म्हटले. रेणुका चौधरी यांच्या म्हणण्यानुसार, वाहनाच्या धडकेनंतर तो रस्त्यावर फिरताना दिसला. तो वाहनाच्या चाकाखाली येण्याची भीती असल्याने, चौधरी यांनी त्याला पशुवैद्याकडे नेले, असे त्या म्हणाल्या. एएनआयच्या माहितीनुसार, रेणुका चौधरी संसदेत उतरल्यानंतर, तो कुत्रा गाडीतच होता आणि थोड्याच वेळात त्याला तेथून नेण्यात आले.

भाजपाची काँग्रेस खासदारावर टीका

संसदेच्या आवारात प्राणी आणल्याबद्दल भाजपाने आक्षेप घेतला. भाजपाचे खासदार जगदंबिका पाल यांनी चौधरी यांच्यावर नाटक करण्याचा आरोप केला. काँग्रेस खासदारांवर कारवाई करण्याची मागणी करताना त्यांनी म्हटले की, खासदारांना योग्य कागदपत्रे असल्याशिवाय कोणालाही संसदेच्या आत आणता येत नाही. पीटीआयच्या वृत्तानुसार पाल म्हणाले, “तुम्ही समस्यांवर वादविवाद करण्याबद्दल गंभीर नाही. तुम्ही अशा नाटकांनी संसदेची थट्टा करीत आहात. त्या सभागृहाच्या सदस्य आहेत आणि त्यांनी अशा नाटकात गुंतण्याऐवजी महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले पाहिजेत.” त्यांच्यावर सभागृहाच्या अध्यक्षांनी कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. भाजपा नेत्याने म्हटले की, संसदेच्या आवारात कुत्रे किंवा प्राणी आणता येत नाहीत.

भाजपाचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी दावा केला की, काँग्रेस खासदारांनी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांची आणि संसदीय कर्मचाऱ्यांची तुलना कुत्र्याशी केली. ‘एनडीटीव्हीने दिलेल्या माहितीनुसार पूनावाला म्हणाले, “रेणुका चौधरी यांनी संसद आणि खासदारांचा अपमान केला आहे. त्या संसदेत कुत्रा घेऊन येतात आणि विचारल्यावर त्या म्हणतात की, जे चावतात ते आत आहेत. याचा अर्थ त्यांच्या मते- संसद, संसदीय कर्मचारी आणि खासदार हे कुत्रे आहेत. यापूर्वी त्यांनी ऑपरेशन महादेव आणि ऑपरेशन सिंदूरची खिल्ली उडवून आपल्या जवानांचाही अपमान केला होता.” काँग्रेसवर टीका करताना ते म्हणाले की, पक्ष संसदेत नाटक करण्याचे नवीन मार्ग शोधत आहे. हा आंबेडकरजींच्या संविधानाचा खूप मोठा अपमान आहे. रेणुका चौधरी आणि काँग्रेसने माफी मागावी.”

नियम काय सांगतात?

संसदेच्या आवारात कोणत्याही अनधिकृत व्यक्तीला किंवा वस्तूला परवानगी नाही. सुरक्षा कर्मचारी नियमांची अंमलबजावणी करीत असल्याने पाळीव प्राण्यांवर बंदी आहे, असे ‘न्यूज९’च्या वृत्तात म्हटले आहे. सुरक्षा किंवा शिष्टाचाराला धोका निर्माण करू शकेल अशी कोणतीही वस्तू, सामग्री किंवा प्राणी लोकसभेत किंवा संसदेच्या आवारात आणू शकत नाही.

रेणुका चौधरी काय म्हणाल्या?

रेणुका चौधरी यांचा कारमधून कुत्रा घेऊन आल्याचा व्हिडीओ समोर आला होता, यावरून आरोप केला गेला की, हे प्रोटोकॉलचे थेट उल्लंघन आहे. त्याबद्दल चौधरी यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना त्या म्हणाल्या, “कोणत्या प्रोटोकॉलचे उल्लंघन? कुठे कायदा तयार करण्यात आलेला आहे का? मी रस्त्याने येत होते, तेथे एक स्कूटरवाला आणि कारवाल्याची धडक झाली. त्याच्यापुढे हे छोटे पिल्लू रस्त्यावर फिरत होते. मला वाटलं की, ते चाकाखाली येईल. म्हणून मी त्याला उचलून गाडीत ठेवलं आणि संसदेत आले आणि त्याला परत पाठवून दिले. गाडी आणि कुत्रा दोन्ही गेले. मग कशाची चर्चा सुरू आहे? खरे दंश करणारे आणि चावणारे संसदेत बसले आहेत. सरकार चालवतात, त्यावर कोणाची तक्रार नाही.”

त्या पुढे म्हणाल्या, “आम्ही एखाद्या मुक्या जनावराची देखभाल करतो, तर हा मुद्दा चर्चेचा विषय बनला. सरकारकडे दुसरं काही नाही का? मी संसदेत आहे, आणि त्याला (कुत्र्याला) घरी पाठवून दिलेय. माझ्याकडे असे भरपूर इंडी कुत्रे आहेत. गरज पडल्यास मी फोटोदेखील दाखवेन… संसदेत बसून जे आम्हाला दररोज चावतात, त्यांच्याबद्दल कोणी बोलत नाही.”