आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका तोंडावर असताना आसाममध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. नागाव लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार प्रद्युत बोरदोलोई यांनी आपल्या सर्व पदांचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे त्यांनी मंगळवारी आपल्या राजीनाम्याचे पत्र पाठवले आहे. आसाममध्ये ९ एप्रिल २०२६ रोजी विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्याआधीच बोरदोलाई यांनी राजीनामा दिल्याने काँग्रेसला बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे. यापार्श्वभूमीवर दीड वर्षांपूर्वी भाजपाचे अनेक आमदार काँग्रेसमध्ये सामील होणार असल्याचा दावा करणाऱ्या बोरदोलाई यांनी अचानक राजीनाम्याचा निर्णय का घेतला? त्याविषयीचा हा आढावा….
कोण आहेत प्रद्युत बोरदोलोई
प्रद्युत बोरदोलोई हे आसाममधील नागाव लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. त्यांनी २०१९ आणि २०२४ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर या मतदारसंघातून विजय मिळवला आहे. २८ एप्रिल १९५९ रोजी आसाममधील मार्गेरिटा जिल्ह्यात जन्मलेल्या बोरदोलाई यांनी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून आपले उच्च शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. बोरदोलाई हे आसाम काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मानले जातात. त्यांनी जवळपास ३० वर्षे राज्यात काँग्रेसमध्ये सक्रियपणे काम केले आहे. खासदार होण्यापूर्वी ते आसाम विधानसभेचे सदस्य होते. २००१ ते २०१५ या काळात तरुण गोगोई यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये त्यांनी उद्योग, वाणिज्य आणि ऊर्जा यांसारख्या महत्त्वाच्या विभागांचे कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहिले आहे. बोरदोलाई हे सलग चार वेळा मार्गेरिटा विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते.
आणखी वाचा : ठाकरेंचा नगरसेवक अखेर शिंदे गटात; भाजपाला फटका देण्याची दोन्ही शिवसेनेची तयारी? वाचा ५ घडामोडी…
बोरदोलाई यांच्या राजीनाम्याचे कारण काय?
गेल्या काही दिवसांपासून बोरदोलोई आणि आसाम प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गौरव गोगोई यांच्यात तीव्र मतभेद समोर आले होते. लाहोरीघाट विधानसभा मतदारसंघातून डॉ. आसिफ नजर यांना उमेदवारी देण्याच्या पक्षश्रेष्ठींच्या निर्णयावर त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. या संदर्भात त्यांनी आसामचे प्रभारी जितेंद्र सिंह यांना पत्रही लिहिले होते. विशेष म्हणजे, बोरदोलोई यांनी राजीनामा दिला असतानाच काँग्रेसने त्यांचे पुत्र प्रतीक बोरदोलोई यांना मार्गेरिटा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खर्गे यांना लिहिलेल्या पत्रात बोरदोलोई म्हणाले की- आज मी अत्यंत जड आणि दुःखी अंतःकरणाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि सर्व पदांचा राजीनामा देत आहे. माध्यमांशी संवाद बोरदोलोई यांनी सांगितले की, पक्षात मिळणाऱ्या अपमास्पद वागणुकीमुळे त्यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. २०२२ मध्ये काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शशी थरूर यांना पाठिंबा दिल्यापासून पक्षश्रेष्ठींकडून आपल्याला पद्धतशीरपणे बाजूला सारले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

प्रद्युत बोरदोलोई भाजपाच्या वाटेवर?
काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतर प्रद्युत बोरदोलोई हे भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा आसामच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. बोददोलाई यांना आगामी निवडणुकीत दिसपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाऊ शकते, असे तर्कवितर्क लावले जात आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमांता बिस्वा सरमा यांनी बोरदोलोई यांच्या निर्णयाचे स्वागत केले असून त्यांना भाजपामध्ये येण्याचे उघड निमंत्रण दिले आहे. जर त्यांची इच्छा असेल तर ते भाजपामध्ये प्रवेश करू शकतात. आम्ही त्यांना कोणत्याही विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीचे तिकीट देऊ शकतो. कोणताही स्वाभिमानी सनातनी हिंदू काँग्रेसमध्ये राहू शकत नाही, असे मुख्यमंत्री बिस्वा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमच्या पक्षाची बैठक झाली असून, लवकरच जागावाटपाचा कार्यक्रम जाहीर केला जाईल, असेही ते म्हणाले.
हेही वाचा : महाआघाडीचे चार आमदार बेपत्ता? भाजपाने राज्यसभेच्या अतिरिक्त जागा कशा जिंकल्या? निवडणुकीत काय घडले?
आसाममध्ये काँग्रेसला एकपाठोपाठ एक धक्के
आसाममध्ये विधानसभेच्या एकूण १२६ जागांसाठी पुढील महिन्यात निवडणूक होणार आहे. राज्यात सध्या भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार असून त्यांना सत्तेतून खाली खेचण्यासाठी विरोधकांनी जोरदार तयारी केली आहे. मात्र, त्याआधी काँग्रेसला एकापाठोपाठ एक धक्के बसण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या महिन्यात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष भूपेन कुमार बोरा यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता. तीन दशकांपासून अधिक काळ राजकारणात सक्रिय असलेल्या बोरा यांनी काँग्रेसला अचानक सोडचिठ्ठी दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. राजीनाम्यानंतर दी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पक्ष सोडण्याची कारणेही सांगितली होती.
भूपेन बोरा यांनी काय आरोप केला होता?
फक्त विचारधारेमुळेच मी काँग्रेसमध्ये ३२ वर्षे घालवली; पण पक्षाने माझी प्रतिष्ठा आणि आत्मसन्मान पूर्णपणे पायदळी तुडवण्याचे काम केले. जर मी आणखी काही दिवस काँग्रेसमध्ये थांबलो असतो तर पक्षानेच मला बाहेरचा रस्ता दाखवला असता. राजीनाम्यानंतर काँग्रेस वरिष्ठ नेत्यांनी माझी मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधी हेदेखील फक्त भावनिक मुद्द्यांच्या आधारे माझ्याबरोबर बोलत होते. राजीनामा देण्यामागील कारणांवर त्यांनी चर्चा करावी, अशी माझी अपेक्षा होती, पण माझ्या पत्रातील तक्रारी आणि मुद्द्यांवर त्यांनी एक शब्दही उच्चारला नाही, असे भूपेन कुमार बोरा यांनी स्पष्ट केले होते. यादरम्यान भाजपामध्ये कधी प्रवेश करणार? असा प्रश्न विचारला असता बोरा यांनी ठोस तारीख सांगितली नाही. मात्र, विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांचा भाजपात प्रवेश होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.
